आरोग्य

या लोकांनी मुळीच पिऊ नये ग्रीन टी, होऊ शकतं नुकसान

Trupti Paradkar  |  Apr 23, 2020
या लोकांनी मुळीच पिऊ नये ग्रीन टी, होऊ शकतं नुकसान

ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत. आजकाल वजन कमी करण्यासाठी ‘मसाला चहा’ ऐवजी ‘ग्रीन टी’ घेण्याला प्राधान्य दिलं जातं. ग्रीन टी हे एक ‘आरोग्यदायी पेय’ म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. सहाजिकच यामुळे जगभरात सध्या  ग्रीन टी पिण्याचे प्रमाण नक्कीच वाढलं आहे. मात्र असं असलं एक ते दोन कपपेक्षा जास्त ग्रीन टी पिणं आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. एवढंच नाही तर ग्रीन टी मुळे काही लोकांच्या समस्या अधिक वाढू शकतात. यासाठीच जाणून घ्या कोणत्या लोकांनी ग्रीन टी मुळीच पिऊ नये. 

गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या महिला –

ज्या महिला गरोदर असतील अथवा भविष्यात बाळासाठी प्रयत्न करत असतील अशा महिलांनी ग्रीन टी पिणे टाळावे. कारण ग्रीन टी पिण्यामुळे तुमच्या गर्भधारणेतील अडचणी वाढू शकतात. ग्रीन टी मधील कॅफेनचा तुमच्या बाळाच्या मेंदूच्या वाढ आणि विकासावर विपरित परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे गरोदपणातील समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते. यासाठीच गरोदरपणातील नऊ महिने आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना महिलांनी ग्रीन टी न पिणंच योग्य राहील. याचप्रमाणे स्तनपान देणाऱ्या महिलांनीदेखील ग्रीन टी पिणे टाळावे.

shutterstock

लोहाची कमतरता असलेले रूग्ण –

ज्या लोकांच्या शरीरात लोहची कमतरता असते त्यांना अॅनिमियाचा त्रास जाणवतो. अशा अशक्तपणा आलेल्या अॅनिमिक लोकांनी ग्रीन टी पिऊ नये. कारण ग्रीन टी मुळे तुमच्या शरीरातील लोह अधिक प्रमाणात शोषून घेतलं जातं आणि तुमच्या शरीरातील लोहची कमतरता अधिक वाढू शकते. वास्तविक या काळात तुम्ही लोहयुक्त आहार घेणं गरजेचं  आहे . यासाठीच ग्रीन टी पासून शक्य तितकं दूर राहा. 

पोटाच्या समस्या असलेले लोक –

ग्रीन टीमधील काही घटकांमुळे तुमच्या पोटातील अॅसिड वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुमच्या पोटात दुखणे, उलटी, मळमळ, पोटात गोळा येणे अशी लक्षणे जाणवू शकतात. ज्या लोकांना आधीच पोटाच्या समस्या आहेत अशा लोकांनी ग्रीन टी न पिणंच योग्य राहील. याचप्रमाणे इतर लोकांनीदेखील उपाशीपोटी कधीच ग्रीन टी पिऊ नये. कारण यामुळे तुमच्या पोटात दुखण्याची शक्यता आहे. ग्रीन टी नेहमी जेवणानंतर अथवा दोन जेवणाच्या मध्येच घ्या. 

shutterstock

ह्रदयविकार असणारी माणसे –

ज्यांना ह्रदय विकार अथवा रक्तदाबाची समस्या आहे अशा लोकांनी शक्य तितक्या कमी प्रमाणात ग्रीन टीचा वापर करावा. कारण ग्रीन टीमुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. जर तुम्ही ह्रदयसमस्येसाठी औषधे घेत असाल तर ग्रीन टी पिण्यामुळे या औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. 

मधुमेही –

मधुमेही वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. मात्र ग्रीन टीमुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या परिणामामध्ये फरक पडू शकतो. यासाठी ग्रीन  टी पिल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर अवश्य तपासा. दिवसभरात एकदा  ग्रीन टी पिण्यास काहीच हरकत नाही मात्र हे प्रमाण मुळीच वाढवू नका. 

लहान मुले –

ग्रीन टी मधील काही घटकांमुळे तुमच्या मुलांच्या शरीराचे पोषण कमी होऊ शकते. मुलांच्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पोषकमुल्यांमध्ये ग्रीन टीचे टॅनिन अडथळा निर्माण करू शकते. म्हणूनच लहान मुलांना ग्रीन टी पिण्यास देऊ नका. जर तुमची मुलं हट्ट करत असतील तर त्यांना याचे परिणाम समजावून सांगा.

 

 

shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक 

अधिक वाचा –

हे फायदे वाचाल तर रोज प्याल ‘गवती चहा’

उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi)

Read More From आरोग्य