घराच्या स्वच्छतेमध्ये केरसुणी किंवा झाडणी महत्त्वाची भूमिका बजावते. केरसुणीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. म्हणूनच लक्ष्मीपूजनाला नव्या केरसुणीची पूजा आवर्जून अनेक घरांत केली जाते. त्यामुळे वास्तूशास्त्रामध्ये केरसुणीशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. घराची स्वच्छता राखणे धार्मिकदृष्ट्या तसेच वैज्ञानिक दृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचे मानले जाते. असे असले तरी आपल्या शास्त्रांत प्रत्येक गोष्टीसाठी एक खास वेळकाळ पाळण्यास सांगितले जाते. पूर्वापार आपले पूर्वज आपल्याला सांगत आले आहेत की संध्याकाळच्या वेळी, खास करून दिवेलागणीला तर मुळीच केरसुणी घेऊन घर झाडून काढू नये. दिवेलागणीची वेळ म्हणजे घरात देवापाशी, तुळशीपाशी आपण दिवा लावतो, शुभंकरोति म्हणतो. हीच वेळ असते जेव्हा घरात लक्ष्मी येते असे आपण मानतो. आणि यावेळी जर केरसुणी घेऊन आपण घर झाडले तर ते अशुभ मानले जाते. संध्याकाळी दिवेलागणीला केरसुणीने घर झाडले तर लक्ष्मीदेवी आपल्यावर रुसते, रागावते आणि घरात दारिद्रय येते असे म्हणतात.
केर काढण्याची कोणती वेळ आहे
वास्तुशास्त्रानुसार दिवसाचे पहिले चार तास घर झाडून काढण्यासाठी योग्य मानले जातात. तर रात्रीचे चार प्रहर या कामासाठी अयोग्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. म्हणजेच सूर्यास्तानंतर झाडू नये. पण कधी कधी अशीही परिस्थिती उद्भवते की सूर्यास्तानंतर आपल्याला केर काढावा लागतो. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला संध्याकाळी केर काढावा लागला तर अशावेळी काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो. अनेकवेळा अशी परिस्थिती येते की नोकरीनिमित्ताने घरातले लोक दिवसभर बाहेर असतात आणि त्यांना संध्याकाळी घरी आल्यावरच घराची स्वच्छता करायला वेळ मिळतो. किंवा अनेक दिवसांनी आपण नेमके संध्याकाळीच घरी पोचल्यास घर खराब झालेले असते.अशा वेळी आपण घाणीत राहू शकत नाही म्हणून संध्याकाळी केस काढावा लागतो. जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव संध्याकाळी केर काढावा लागत असेल तर कधीही तेव्हा घरातील घाण व कचरा घराबाहेर टाकू नका, तर घरातल्या कचराकुंडीत टाका.
केर काढल्यावर होणारा परिणाम
आपण जेव्हा दिवसभर मेहनत करतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जमा होते. जर आपण संध्याकाळी केरसुणीने केर काढून घरातील कचरा बाहेर काढला तर त्यासोबतच घरातली सकारात्मक ऊर्जा देखील बाहेर पडते ज्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. याशिवाय आपण रात्री झोपल्यावर येणारा शरीराचा थकवा आणि तणाव दूर करतो. हा थकवा रात्रभर घरात साचून राहतो आणि सकाळी दिवसाच्या सुरुवातीला आपण जेव्हा केर काढतो तेव्हा ही नकारात्मकता घराबाहेर निघून जाते. असे मानले जाते की संध्याकाळी किंवा रात्री किंवा अंधार पडल्यावर केर काढल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते. रात्री घर झाडून घेतल्याने घरात नकारात्मकता पसरते आणि धनाची देवी लक्ष्मी कोपते, ज्यामुळे धनाची हानी होते.
संध्याकाळी केर न काढण्यामागची वैज्ञानिक कारणे
वैज्ञानिकदृष्ट्या बघितले तर हे लक्षात येते की जेव्हा आपण केरसुणीने झाडतो तेव्हा धूळ उडून आपल्या अंगावर बसते आणि मग आपल्याला आंघोळ करावी लागते. पूर्वी काही आतासारखे अद्ययावत बाथरूम, गिझर वगैरे नव्हते आणि लोक नदीवर आंघोळीसाठी जात असत. थंडीमुळे रात्री अंघोळ केल्याने लोक आजारी पडू शकत होते, म्हणून संध्याकाळी स्वच्छता करू नये ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. तसेच पूर्वीच्या काळी लोकांच्या घरात वीज नव्हती, त्यामुळे संध्याकाळपासूनच अंधार व्हायचा. अंधारात केर काढल्यास घरात फरशीवर पडलेल्या काही मौल्यवान वस्तू हरवण्याची व अनावधाने कचऱ्यात फेकले जाण्याची भीती होती.
म्हणूनच संध्याकाळी आणि रात्री केर काढणे टाळावे अशी प्रथा चालू झाली असावी.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक