Diet

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात मुळा खाणं ठरेल फायदेशीर

Trupti Paradkar  |  Nov 24, 2020
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात मुळा खाणं ठरेल फायदेशीर

हिवाळ्यात वातावरणात होणारे बदल आजारपण जवळ आणतात. मात्र काही पदार्थ जाणिवपूर्वक खाण्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती नक्कीच वाढू शकते. ज्यामुळे थंडीतही तुम्ही इनफेक्शनपासून दूर राहू शकता. मुळ्याची भाजी खाणं सर्वांनाच आवडतं असं नाही. पण जर तुम्ही हिवाळ्यात आहारात मुळ्याचा समावेश केला तर आजारी पडण्याचा धोका कमी होऊ शकतो. कारण मुळ्यामध्ये व्हिटॅमिन ई, ए, सी , बी 6 आणि के भरपूर प्रमाणात असते. शिवाय यात अॅंटि ऑक्सिडंट, फायबर्स, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, लोह, कॅल्शिअम, मॅगनीज अशी खनिजेही पुरेशा प्रमाणात असतात. यासाठीच जाणून घ्या मुळा खाण्याचे फायदे

प्रतिकार शक्ती वाढते –

कोणतेही आजारपण अथवा कोरोनाचे संकट दूर ठेवायचं असेल तर तुमची प्रतिकार शक्ती मजबूत असायला हवी. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषधे, आयुर्वेदिक काढा यासोबतच पोषक आहार घेणं गरजेचं आहे. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार कमी होतात. मुळ्याने तुमची प्रतिकार शक्ती तर वाढतेच शिवाय शरीरावर येणारी सूज आणि दाहदेखील कमी होऊ शकतो. त्यामुळे थंडीत मुळ्याचा  आहारात जरूर समावेश करा.

रक्तदाब नियंत्रित राहतो –

मुळा खाण्याने तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोटॅशियमचा पुरवठा होतो. पोटॅशियममुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहू शकतो. जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर आहारातून नियमित मुळा खाणं तुमच्या फायद्याचं ठरेल. आर्युवेदानुसार मुळा खाण्याने शरीराला थंडावा मिळतो ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहू शकतो. थंडीत रक्तदाबाची समस्या वाढते यासाठी या सिझनमध्ये मुळा खाणं तुमच्या फायद्याचं ठरेल. 

मधुमेह नियंत्रित राहतो –

मधुमेहींनी आहाराबाबत सावध राहायलाच हवं शिवाय कोरोनाचं संक्रमण होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. थंडीत यासाठी मधुमेहींनी मुळा खायला हवा. कारण मुळ्यामध्ये भरपूर अॅंटि डायबेटिक घटक असतात. ज्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. एका संधोधनात असं आढळलं आहे की, मुळा खाण्यामुळे रक्तातील इन्सुलीनची पातळी नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे तुम्ही जर मधुमेही असाल तर नियमित मुळा खाणं हा इनफेक्शन टाळण्यासाठी तुमच्याकडे एक चांगला पर्याय आहे.

ह्रदयविकारांचा धोका कमी होतो –

मुळ्यातील पोषक घटकांमुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत होते. तज्ञ असं सांगतात की दररोज मुळा खाण्यामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. थंडीत या आजारपणापासून दूर राहण्यासाठी मुळा खायला हवा कारण मुळ्यात फॉलिक अॅसिड आणि फ्लैवोनॉईड भरपूर असतात. मुळा खाण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. यासाठीच ह्रदयविकारांपासून दूर राहण्यासाठी आहारात मुळ्याचा समावेश करणं आवश्यक आहे.

पचनशक्ती सुधारते –

आजारपणाची  सुरुवात पोटातील बिघाड पासून सुरू होते. त्यामुळे पोट नियमित स्वच्छ होणं गरजेचं आहे. थंडीत भूक खूप लागत असल्यामुळे सतत काहीतरी खाल्लं जातं ज्यामुळे पचनाच्या समस्या  वाढतात म्हणूनच नियमित मुळा खावा. कारण मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे मुळ्याचा आहारात समावेश केल्यामुळे तुमची पचनशक्ती नक्कीच सुधारते. मुळा खाण्यामुळे तुमचे यकृत आणि पित्ताशय व्यवस्थित काम करू लागते. ज्यामुळे पोटाचे विकार नक्कीच कमी होतात.

रक्तवाहिन्या मजबूत होतात –

मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोलेजीनचे प्रमाण आढळते. कोलेजीन तुमच्या रक्तवाहिन्यांना मजबूत करते. रक्तवाहिन्या कमजोर असतील तर ह्रदय आणि रक्तासंबधित आजार होण्याची शक्यता वाढते. यासाठीच संक्रमण टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी मुळा खाणं गरजेचं आहे. 

मुळ्यामध्ये असलेले पोषक घटक तुमची प्रतिकार शक्ती वाढवतात आणि तुम्हाला आजारपणापासून दूर ठेवतात. यासाठीच हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याची भाजी, पराठा, कोशिंबीर, सलाड यांचा समावेश जरूर करा. 

फोटोसौजन्य –

अधिक वाचा –

निरोगी जीवनशैलीसाठी जाणून घ्या गाजर खाण्याचे फायदे

हे नॅचरल ड्रिंक्स पिऊन तुमच्या चेहऱ्यावर येईल महिन्याभरात ‘ग्लो’

जाणून घ्या कंदमूळं खाणं आरोग्यासाठी कसं आहे फायदेशीर

Read More From Diet