जगभरात नोकरीतील मोठी मोठी पदे अथवा नेतृत्वावर आजवर पुरूषांचीच मक्तेदारी होती. मात्र आता एकविसाव्या शतकात हळू हळू हे चित्र बदलताना दिसत आहे. बॉलीवूडमध्ये पूर्वी याबाबत काही वेगळं चित्र नव्हतं. पुरूष आणि महिला कलाकारांच्या मानधनातही नेहमीच तफावत असायची. त्यामुळे महिला प्रधान चित्रपट असूनही महिलांच्या वाट्याला हवं तसं यश कधीच आलं नाही. मात्र आता ही परिस्थिती नक्कीच बदणार आहे. आपण आज महिला दिन 2021 साजरा करत आहोत आणि हा दिवस महिलांच्या समान हक्क आणि संधीच्या लढ्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यासाठी जाणून घ्या महिला दिनाबाबत सविस्तर माहिती यंदाच्या महिला दिनाची थीम आहे. ‘Women in leadership: Achieving an equal future in a COVID-19 world’ अर्थात ‘महिला नेतृत्व: कोविड 19 च्या जगाच समान भविष्य साध्य करणे’ यासाठीच या महिला दिनानिमित्त आम्ही तुमच्यासोबत अशा काही खास बॉलीवूड अभिनेत्रींचा प्रवास शेअर करत आहोत. ज्यांनी या पुरूषप्रधान क्षेत्रातही आपली पाळंमुळं रोवत ‘अभिनेत्री ते निर्माती’अशी स्वतःची ओळख निर्माण केली.
त्याचप्रमाणे या महिलादिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील खास महिलांना द्या जागतिक महिला दिनानिमित्त या शुभेच्छा आणि सांगा जगभरातील महिलांच्या या यशोगाथा ज्यामुळे त्यांनाही मिळेल यशाची प्रेरणा
प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा आता फक्त बॉलीवूड अभिनेत्रीच नाही तर ग्लोबल आयकॉन झाली आहे. एखादी जेव्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा कसं उंच उंच यशाच्या शिखर गाठू शकते याचं प्रियांका उत्तम उदाहरण आहे. कारण ती जे काही करते ते परफेक्टच करते. ‘पर्पल पेपल पिक्चर’ या प्रॉडक्शन हाऊसमधून तिने 2015 साली ‘व्हेटिंलेटर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आणि निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केलं. व्हेटिंलेटर हा एक मराठी चित्रपट होता आणि त्याला तीन नॅशनल पुरस्कार मिळाले होते. सध्या ती अनेक चित्रपट ओटीटी माध्यमावरही निर्माण करत आहे.
दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोणनेही 2018 मध्ये निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःचं दमदार पाऊल ठेवलं. तिच्या ‘का प्रॉडक्शन हाऊस’च्या माध्यमातून तिने मेघना गुलझारच्या दिग्दर्शनाखाली ‘छपाक’ नावाचा स्त्री प्रधान भूमिका असलेला चित्रपट निर्माण केला. छपाक हा अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मी अग्रवालवर आधारित बायोपिक होता. या चित्रपटातून दीपिका आणि मेघनाने दाखवून दिलं की जेव्हा कर्तबगार महिला एकत्र येतात तेव्हा ग्लॅमरस दुनियेतही असे संवेदनशील विषय त्या उत्तमरित्या हाताळू शकतात.
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा ही एक उत्तम अभिनेत्री आहे यात वादच नाही मात्र ती एक सक्षम निर्माती आहे हे तिने सिद्ध केलं आहे. अनुष्काने तिचा भाऊ कर्णेशच्या मदतीने 2014 मध्ये ‘क्लिन स्लेट फिल्मस’ची निर्मिती केली. त्यानंतर तिने मेहनतीने परि, एन १०, फिल्लोरी असे अनेक चित्रपट प्रोड्युस केले. सध्या ओटीटी माध्यमावर तिचा ‘पाताललोक’ आणि ‘बुलबुल’ या सिरिज चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत.
आलिया भट
आलिया भटनेही इतक्या लहान वयात निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यासाठी नुकतंच तिने तिचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस इटर्नल सनशाईन सुरू केलं आहे. तिने ही गोष्ट तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करत लिहिलं होतं की, ” मला हे जाहीर करायला अतिशय आनंद होत आहे… प्रॉडक्शन!! इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन, तेव्हा तुमच्या कथा सांगा, आनंदी कथा, कुणालाच कधी न सांगितलेल्या कथा, खऱ्या कथा, छोटयाशा कथा” तिच्या या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली रेड चिलीज सोबत ती लवकरच तिचा पहिला चित्रपट ‘डार्लिंग’ बनवणार आहे. ज्याचं दिग्दर्शन जसमित के रीन करणार आहे.
दिया मिर्झा
दिया मिर्झाने अनेक चित्रपटातून तिच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. मात्र फार कमी लोकांना माहीत असेल की ती एक उत्तम निर्मातीदेखील आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे बॉर्न फ्री इंटरटेंटमेंट. तिचा पहिला चित्रपट होता लव्ह ब्रेकअप जिंदगी जो 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने महिला प्रधान बॉबी जासूस हा चित्रपट विद्या बालनसह 2014 मध्ये बनवला होता. तिने काही महिन्यांपूर्वीच मांईड दी मल्होत्रा ही वेबसिरिज ओटीटी माध्यमावर बनवली होती.
माधुरी दीक्षित
नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षित ओळखली जाते. या धक धक गर्लचे आजही अनेक चाहते आहेत. मात्र ती अचानक लग्न करून अमेरिकेत सेट झाली आणि बॉलीवूडकडे तिने पाठच फिरवली. मात्र जेव्हा ती परत भारतात आली तेव्हा तिने निर्माती ही नवी ओळख पुन्हा निर्माण केली. 2011 मध्ये तिने आरएनएम मुव्हीज नावाचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. तिने आणि प्रियांका चोप्राने मिळून काही इंटरनॅशनल प्रोजेक्ट एकत्र निर्माण केले. मराठीत ‘बकेट लिस्ट’ सारखा एक चांगला चित्रपट निर्माण केला. ’15 ऑगस्ट’ हा ओटीटी माध्यमावर तयार केला.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje