देवांचा देव महादेव असे आपण नेहमीच म्हणतो. भक्ती केल्यास सर्वात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे शिवशंकर. आज महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी सर्वात आधी महाशिवरात्रिच्या शुभेच्छा (mahashivratri wishes in marathi) आपल्याकडे भारतामध्ये महादेवाची 12 ज्योतिर्लिंग (12 Jyotirling Names In Marathi) आहेत. हिंदू धर्मातील पुराणात सांगण्यात आल्यानुसार भगवान शिव जिथे जिथे स्वतः प्रकट झाले त्या स्थानांवर ही ज्योतिर्लिंग स्थापण्यात आली आहेत. हिंदू संस्कृतीच्या मानण्यानुसार, जी व्यक्ती दिवसरात्र या बारा ज्योतिर्लिंगाच्या (12 Jyotirlinga In Marathi) नामाचा जप करते त्याचे सात जन्माचे पाप निघून जाते. शिव महापुराणात या सर्व ज्योतिर्लिंगाच्या कथाही सांगण्यात आल्या आहेत. आपण या लेखातून देशातील या 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थळाची नावे (12 Jyotirlinga List In Marathi), माहिती आणि महत्त्व जाणून घेऊया. श्रीसोमनाथ, श्रीमल्लिकार्जुन, श्रीमहाकाल, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, श्रीभीमशंकर, त्र्यंबकेश्वर, श्रीकेदारनाथ, श्रीरामेश्वर, श्रीनागेश्वर, काशी विश्वनाथ, श्रीघृणेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगाची ठिकाणे आहेत. श्रावण महिन्यात अनेक सणवार आपण साजरे करत असतो. पण श्रावण महिना हा शिवशंकराचा सर्वात आवडता महिना समजण्यात येतो. त्यामुळे श्रावण महिन्यात या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भेट देणे पवित्र मानले जाते. जाणून घेऊयात या ज्योतिर्लिंगांविषयी.
श्रीक्षेत्र सोमनाथ (Somnath)
गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये वेरावळच्या जवळ सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग आहे. श्रीशंकाराचे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून सोमनाथ याच्या अग्रस्थानी आहे. अथांग अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे सोमनाथाचे मंदिर अत्यंत आकर्षक दिसते. याठिकाणी साधारण 8-9 वाजता संध्याकाळी अप्रतिम लायटिंग शो करण्यात येतो. याठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात.
गझनीच्या मेहमूदने आणि अनेकांनी या मंदिराला उद्धस्त करण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वातून पुन्हा एकदा त्याच ताकदीने हे मंदीर उभे राहिले असा इतिहास आहे. अनेकदा या मंदिराची पुनर्निमिती करण्यात आल्याचेही सांगण्यात येते. जवळच त्रिवेणी घाट असून हिरण्या, कपिला आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम या मंदिराजवळ होतो. त्याशिवाय सोमनाथाजवळ पाच पांडवाचे वास्तव्य होते असाही इतिहास आहे. प्राचीन हिंदू ग्रंथांनुसार सोम अर्थात चंद्राने दक्ष राजाच्या 27 कन्यांसह विवाह केला. पण रोहिणीवरील त्याच्या अधिक प्रेमामुळे इतरांवर अन्याय होत असल्याचे पाहून दक्षाने त्याला शाप दिला. पण चंद्राने शिवशंकाराची भक्ती करून या शापाचे निराकरण करून घेतले आणि म्हणूनच या मंदिराचे नाव सोमनाथ असे पडले अशी आख्यायिका आहे. चंद्राने निर्माण केलेल्या या मंदिराचा ऋग्वेदामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. म्हणूनच हे शिवशंकराचे अत्यंत पवित्र मंदिर मानण्यात येते.
कसे पोहचाल
जवळचे रेल्वे स्टेशन – वेरावळ
विमानतळ – केशोड
यासाठी खास अहमदाबाद ते वेरावळ येते सोमनाथ एक्सप्रेस जाते. तसंच जुनागढ, भावनगर, पोरबंदर आणि मुंबई यासारख्या शहरातून बसदेखील जातात.
शिवशंकराबाबत जाणून घ्या ‘या’ रहस्यमय गोष्टी
श्री शैलम् मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (Mallikarjun)
भारतातील आंध्रप्रदेश राज्यातील दक्षिणेच्या भागात श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर असून हे अत्यंत प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. दक्षिणेचा कैलाश या नावानेदेखील हे स्थळ ओळखण्यात येते. माता पार्वती अर्थात मलिका आणि भगवान शिव अर्थात अर्जुन म्हणून या मंदिराला मल्लिकार्जुन नाव देण्यात आले आहे.
सातवाहन राजवटीतील शिलालेख पुरावे या मंदिराच्या बाबतीत सापडले असून इतिहासानुसार, दुसऱ्या शतकापासून हे ज्योतिर्लिंग अस्तित्वात आहे. विजयनगर साम्राज्याचा पहिला राजा हरिहरच्या काळातील हे मंदिर असून येथील मुखमंडपही याच काळात बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. शिवपुराणानुसार या मंदिराची स्थापना कशी झाली, याची आख्यायिका कार्तिकेय आणि गणपतीशी निगडीत आहे.
शिवपार्वती पुत्र गणेश हे आपला मोठा भाऊ कार्तिकेयाच्या आधी लग्न करू इच्छित होते. मात्र त्यानंतर जो पृथ्वीची प्रदक्षिणा पहिले करून येईल त्याचे लग्न प्रथम करून देण्यात येईल अशी युक्ती शिवपार्वतीने केली. यानंतर कार्तिकेय आपले वाहन मोरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालू लागला. मात्र गणपती बाप्पाने माता पार्वती आणि भगवान शिव यांना प्रदक्षिणा घालत तेच आपल्यासाठी पृथ्वी असल्याचे सांगितले. ही हार कार्तिकेयला सहन झाली नाही आणि त्यानंतर तो पळून गेला. त्याला समजावण्यासाठी पार्वती गेली असता तिथून कार्तिकेय निघून गेले. पार्वती हताश झाली आणि तिथेच शिवशंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले तेच स्थान म्हणजे श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर.
कसे पोहचाल
जवळचे रेल्वे स्टेशन – मर्कापूर
विमानतळ – बेगमपेट
रेल्वे स्टेशन अथवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुम्हाला याठिकाणी पोहचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही याठिकाणी जाऊ शकता.
श्री महाकालेश्वर (Mahakaleshwar)
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे स्थळ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. मध्यप्रदेशातील उज्जैनमधील हे मंदीर अत्यंत प्रसिद्ध आहे. रूद्र सागर सरोवराच्या किनारी असणारे हे मंदीर अप्रतिम असून भगवान शिव स्वतः लिंगामध्ये स्वयंभू रूपात स्थापित आहेत असा समज आहे. या मंदिरातील मूर्ती बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखली जाते. ही मूर्ती दक्षिणमुखी असल्याने त्याला असे नाव देण्यात आले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात जास्त आस्थेचे ठिकाण म्हणूनही याची ओळख आहे. पार्वती, कार्तिकेय आणि गणेशाच्याही प्रतिमा येथे आहेत. इथे बनविण्यात आलेले नागचंद्रेश्वर मंदिराचे कपाट केवळ नागपंचमीच्या दिवशीच उघडण्यात येते असे म्हटले जाते. महाकवी कालिदासांनी या मंदिराची प्रशंसा केल्याचे उल्लेख आहेत. तसंच या मंदिरात पूजा केल्यास, स्वप्नपूर्ती होते असाही समज आहे कारण या ठिकाणी माता स्वप्नेश्वरीचा वास आहे असे म्हटले जाते.
शिवपुराणानुसार एकदा ब्रम्हा, विष्णू आणइ महेश यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना शिवाच्या मनात विष्णू आणि ब्रम्हदेवाची परीक्षा घ्यावी असे आले. त्यांनी दोघांनाही प्रकाशाचा अंत कुठे आहे हे शोधण्यास सांगितले. त्यासाठी शिवशंकराने एक मोठा स्तंभ उभारला. दोघांनीही शोध घेतला पण अखेर थकून विष्णूने हार मानली तर ब्रम्हदेवाने टोक सापडले असे खोटे सांगितले. खोटेपणामुळे शिवशंकरानी ब्रम्हदेवाला कोणीही कधीच तुम्हाला पूजणार नाही असा शाप दिला. तेव्हा ब्रम्हदेवानी माफी मागितली आणि शिवाची विनवणी करत त्या स्तंभात विराजमान व्हायला सांगितले. हाच स्तंभ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. स्तंभाचे रूपांतर लिंगात झाल्यापासून त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
कसे पोहचाल
जवळचे रेल्वे स्टेशन – उज्जैन
विमानतळ – उज्जैन
रेल्वे स्टेशन अथवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुम्हाला याठिकाणी पोहचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही याठिकाणी जाऊ शकता.
ओंकारेश्वर (Omkareshwar)
उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून केवळ दोन ते तीन तासाच्या अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर हे मध्यप्रदेशात असून द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात पोहचणे सोपे आहे. ओंकारेश्वरला जाताना अनेक लोकांचा भ्रम असतो की, केवळ मंदिराची परिक्रमा करावी लागते. पण तसे नाही. संपूर्ण ओंकार पर्वत हा परिक्रमेचा मार्ग आहे आणि ही परिक्रमा तब्बत 7 किमी इतकी आहे. त्यामुळे तुम्हाला परिक्रमा करायची असेल तर तुम्हाला सोबत पाणी अथवा फळांचा रस असे काही ना काहीतरी ठेवणे गरजेचे आहे. सदर मंदिर हे तीन वेळा बंद असते. सकाळी आरतीची वेळ 7 ते 8 असते, दुपारच्या जेवणानंतर अर्थात 12.20 ते 1.20 आणि ध्यानाची वेळ संध्याकाळी 4 ते 5 या वेळात मंदिरा बंद असते. त्यामुळे तुम्ही दर्शन घ्यायला जाताना हे नक्की लक्षात ठेवा.
राजा माधांताने नर्मदेच्या किनारी असणाऱ्या या पर्वतावर घोर तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि भगवान शिवाने इथे राहावे असा वर मागितला. त्यामुळेच या ठिकाणाला ओंकार मधांता असेही नाव प्राप्त झाले. या मंदिरात शिवभक्त कुबेरने तपस्या करून शिवलिंगाची स्थापना केली आणि कुबेराच्या स्नासाठी शिवशंकराने आपल्या जटेतून कावेरी नदी उत्पन्न केली अशी आख्यायिका आहे. त्यामुळे कुबेर मंदिराच्या बाजूने ही कावेरी वाहते आणि नर्मदेला जाऊन मिळते असे सांगण्यात येते. इथे नर्मदा आणि कावेरीचा संगम पाहता येतो.
कसे पोहचाल
जवळचे रेल्वे स्टेशन – उज्जैन
विमानतळ – उज्जैन
रेल्वे स्टेशन अथवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुम्हाला याठिकाणी पोहचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही याठिकाणी जाऊ शकता.
भगवान शिव शंकरावर आधारित बॉलीवूड गाणी
केदारनाथ (Kedarnath)
सर्वात सुंदर आणि अप्रतिम असे ज्योतिर्लिंगाचे स्थळ म्हणजे केदारनाथ असे म्हटले जाते. अत्यंत सुंदर निसर्ग आणि तितकेच सुंदर आणि मनाला शांतता देणारे हे मंदिर आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये असून हिमालय पर्वताच्या गडवाल रांगांमध्ये असणाऱ्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित पर्वत शिखरांच्यामध्ये वसलेले आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरण पाहायला मिळते.
केदारनाथची यात्रा म्हणजे चारधाम यात्रा असे नेहमी आपण ऐकतो. हे मंदिर चारधामांपैकी एक असून समुद्रसपाटीपासून 3583 मीटर उंचीवर वसलेले आहे. भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक मंदिर म्हणून केदारनाथ मंदिर ओळखण्यात येते. बारा ज्योतिर्लिंगापैकी केदारनाथे ज्योतिर्लिंगाचे हे मंदीर म्हणजे सर्वात उंच ठिकाणी बांधलेले आहे.हे मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असूनही अनेक भाविक येथे दर्शनाला जातात. केदारनाथ अर्थात भगवान शंकर. याचा अर्थ रक्षक असा असून केदारनाथाचे दर्शन ज्या व्यक्ती घेतात त्यांना स्वर्गाची दारे खुली होतात असा समज आहे.
याचा इतिहास हा पौराणिक आहे. कुरूक्षेत्र येथे ज्यावेळी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये महायुद्ध झाले आणि त्यात पांडवांचा विजय झाला. त्यावेळी आपल्या भावांचा पराभव केला म्हणून पांडव स्वतःला दोषी मानत होते. या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराची तपश्चर्या करणे आवश्यक आहे असे समजून सर्व पांडव पहिल्यांदा काशीला गेले. त्यानंतर त्यांना हिमालय पर्वतावर जाऊन तपश्चर्या करण्याचा आदेश प्राप्त झाला. भगवान शंकर पांडवांना या पापातून सहजासहजी मुक्त करणार नव्हते म्हणून त्यांनी एका म्हशीचे रूप घेतले आणि गुप्तकाशी येथे पोहचले. इतर म्हशीपेक्षा वेगळी दिसणारी म्हैस पाहून भीमाने या म्हशीची शेपटी पकडली. पण भीमाच्या शक्तीमुळे या म्हशीच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तिच्या पाठीकडचा भाग केदारनाथ इथे पडला आणि केदारनाथ मंदिराचा जन्म झाला असे सांगण्यात येते. तसेच शरीराचा इतर भाग हा तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर मध्य महेश्वर याठिकाणी पडले. या पाचही ठिकाणांवर शिवाचा वास असून पंच केदार(Panch Kedar) या नावाने ओळखली जातात. या घटनेनंतर भगवान शिवानेने पांडवांना पापातून मुक्त केले आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपाने केदारनाथ धाम येथे निवास करण्याचा निश्चय केला अशी आख्यायिका आहे.
कसे पोहचाल
जवळचे रेल्वे स्टेशन – ऋषीकेश
विमानतळ – डेहरादून जॉली ग्रँट
रेल्वे स्टेशन अथवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुम्हाला याठिकाणी पोहचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही याठिकाणी जाऊ शकता. दिल्लीच्या काश्मिरी गेटमधील बस स्थानकातून ऋषिकेशपर्यंत भरपूर बसेस सुटतात. ऋषिकेशमधून गौरीकुंडसाठी जाण्यासाठी भरपूर टॅक्सी आणि बसेस मिळतात.
श्रीक्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar)
12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर. पण हे पर्यटनस्थळ म्हणून अधिक नावारूपाला आले आहे. पुणे जिल्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते. सह्याद्रीच्या प्रमुख रांगेतील हे ठिकाण घनदाट अरण्याने वेढले असून 1984 मध्ये याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भीमाशंकर हे अत्यंत सुंदर ठिकाण असून भीमा नदीचा उगम पाहणे हा अविस्मरणीय आनंद आहे.
हेमाडपंथी असणारे हे मंदिर सुमारे 1200-1400 वर्षांपूर्वीचे आहे. मात्र आता याचे नवे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाजी महाराजदेखील येथे दर्शनाला जात असत असे म्हटले जाते. आता येथे आधुनिक कॅमेरा लावण्यात आले असून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येते.
भीमाशंकर नाव का प्राप्त झाले याची एक अप्रतिम आख्यायिका आहे. कुंभकर्णाच्या पत्नीने कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर मुलगा भीमाला देवदेवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. मोठा झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजल्यानंतर देवांचा बदला घ्यायचे ठरवले आणि ब्रम्हदेवाची कठोर तपस्या केली. त्याच्याकडून सर्वात बलशाली होण्याचे वरदान घेतले. एकदा असेच जात असताना राजा कामरूपेश्वराला महादेवाची भक्ती करताना पाहून आपली भक्ती करण्यास भीमाने सांगितले. मात्र राजाने नकार दिल्यावर त्याने त्याला बंदिस्त केले. कारागृहात राजाने शिवलिंग तयार करून पूजा करायला सुरूवात केली. भीमाने रागाने हे तलवारीने तोडण्याचा प्रयत्न केला असता त्यातून महादेव प्रकट झाले. त्यानंतर शिव आणि भीममध्ये युद्ध झाले आणि त्यात भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर महादेवांना तिथेच वास्तव्य करण्याची राजाने विनंती केली. भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले.
कसे पोहचाल
जवळचे रेल्वे स्टेशन – पुणे
पुण्याहून भीमाशंकरसाठी दर अर्ध्या तासाने नियमित बस सोडण्यात येतात. तसंच इथून तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सी अथवा कारही करता येते.
काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath)
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सर्वात पवित्र स्थान म्हणजे काशी विश्वेश्वर. उत्तर प्रदेशातील वाराणसी शहारामध्ये हे मंदिर स्थित असून काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर हे क्रूर आणि आक्रमक अशा कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले आणि तिथे मशीद उभारली. पण अकबराच्या काळात तोरडमलांनी पुन्हा एकदा या मंदिराचे पुनर्निमाण केले. पण औरंगजेबाने पुन्हा हे मंदिर पाडले. पुन्हा अहिल्याबाई होळकर यांनी त्यानंतर हे मंदिर बांधून जीर्णोद्धार केला.
कैलासावर भस्म फासून राहणाऱ्या भगवान शंकराची सगळेच टिंगलटवाळी करत होते. त्यामुळे पार्वतीने मला कोणाही चिडवणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला अशी विनंती शंकराला केली. त्यामुळे वाराणसीच्या ठिकाणी शंकर येऊन राहू लागले अशी आख्यायिका सांगितली जाते. या शहरात साधारतः 1654 मंदिरे आहेत. त्यामुळे याला मंदिराचे शहर असेही म्हटले जाते. मात्र प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे. विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज आणि ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे.
कसे पोहचाल
विमानतळ – वाराणसी
जवळचे रेल्वे स्टेशन – वाराणसी जंक्शन, काशी रेल्वे स्टेशन. इथे उतरून तुम्ही स्थानिक वाहनाने मंदिरापर्यंत पोहचू शकता.
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar)
श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर हे नाशिकपासून 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असणाऱ्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसविण्यात आले आहे. अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे. हे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले असून अनेक भाविक येथे दर्शनाला येत असतात.
त्र्यंबकेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे, पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या चारही बाजूला चार दरवाजे आहेत. पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्य असेल तेव्हाच उघडला जातो, बाकी दिवस भक्त इतर तीन दरवाज्यांतून प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात. त्र्यंबकेश्वर येथे असलेल मंदिर हे काळ्या शिळेपासून बनलेलं आहे. मंदिराची रचना अप्रतिम असून आकर्षक आहे. मंदिरात असलेल्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे. हे शिवलिंग आपल्याला डोळ्यांच्या आकाराचे दिसतात आणि त्यामध्ये पाणी भरलेले असते जेव्हा आपण लक्षपूर्वक बघितले तर त्यामध्ये आपल्याला तीन छोटे छोटे लिंग दिसतात त्या लिंगांना ब्रम्हा,विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जाते. हे मंदिर कालसर्प पूजेसाठी आणि निधनानंतरच्या विधीसाठी जास्त प्रसिद्ध आहे.
प्राचीन काळी त्र्यंबक ऋषीची ही तपोभूमी होती. गोहत्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी गौतम ऋषींनी येथे कठरो तपस्या करून शिवशंकराकडून गंगा नाशिकला आणण्याचे वरदान मागितले. या वरदानामुळेच गंगा अर्थात गोदावरीचा येथे उगम झाला असे सांगण्यात येते. गोदावरीच्या उगमासह शिवशंभून आपल्या वास्तव्यासाठीही होकार दिला. त्र्यंबक ऋषींमुळेच या मंदिराला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले.
कसे पोहचाल
विमानतळ – ओझर
जवळचे रेल्वे स्टेशन – नाशिक
तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकता.
वैद्यनाथ (Vaidyanath)
वैद्यनाथ अर्थात परळी वैजनाथ. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे स्थान बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे. भारताच्या झारखंड राज्यात संथाल परगण्यातील देवघर गावातही अजून एक वैजनाथ मंदिर असून हेदेखील ज्योतिर्लिंगापैकी एक आहे अशी मान्यत आहे. परळी येथील हे मंदीर जागृत देवस्थानापैकी एक असल्याचे मानण्यात येते. देवगिरी यादवांच्या काळामध्ये श्रीकरणाधिप हेमाद्रीने हे मंदिर बांधले असे सांगण्यात येते. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगाला हात लावता येत नाही. मात्र वैद्यनाथ येथे देवाच्या पायाला अर्थात देवाला स्पर्श करून तुम्हाला दर्शन घेता येते. या मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडेही आहेत.
पुराणात सांगितल्यानुसार या मंदिराच्या स्थापना रावणाद्वारे अकस्मात झाली होती. रावण भगवान शिवशंकाराला शिवलिंगाच्या रूपात स्थापित करण्यासाठी नेत असताना मार्गात परळीतील मेरूपर्वतावर शिवलिंग ठेवल्यामुळे भगवान शिव स्वयंभू शिवलिंग रूपात तिथेच स्थापित झाले.
कसे पोहचाल
जवळचे रेल्वे स्टेशन – अंबेजोगाई
तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकता. अंबेजोगाईपासून सतत वैजनाथला जाण्याची सोय आहे. वाहने अनेक मिळतात.
नागेश्वर (Nageshwar)
नागांचा ईश्वर अर्थात नागेश्वर. गुजरातमधील द्वारका येथे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थित मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगाच्या व्युत्पत्तीची कथा आणि महात्म्य जाणून घेतल्यानंतर पाप नष्ट होतात असा समज आहे.
शिव पुराणानुसार, नागेश्वर ज्योतिर्लिंग ‘द दारूकवन’ मध्ये आहे. जे भारतातील जंगलाचे प्राचीन नाव आहे. ‘द्रुकनाव’ या नावाने भारतीय महाकाव्यामध्ये याचा उल्लेख आढळतो, जसे कामकावन, द्वैतावंत, दंडकवण नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल शिव पुराणात दारुका नावाचा उल्लेख आहे. ज्याने शिवभक्त सुप्रिया नावाच्या एका भक्तावर आक्रमण केले आणि इतर अनेकांसह त्याच्या शहरातील दारुकावनातील समुद्रात अनेक राक्षसांच्यामध्ये फेकून दिले. सुप्रियाने इतर कैद्यांसह शिवाच्या पवित्र मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि तिला भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी राक्षसाला पराभूत केले. नंतर तेथे ज्योतिर्लिंगच्या रूपात स्थापित झाले अशी आख्यायिका सांगितली जाते.
कसे पोहचाल
जवळचे रेल्वे स्टेशन – बडोदा, रतलाम
तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकता.
रामेश्वरम तीर्थ (Rameshwar)
चारधामपैकी एक असणारे रामेश्वर म्हणजे अप्रतिम आणि सौंदर्याची खाण असणारे स्थळ आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे स्थळ म्हणजे कमाल समजण्यात येते. भारतात उत्तर प्रदेशात काशीला जी मान्यता आहे, तीच मान्यता दक्षिणेतील रामेश्वरमला आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये वेढलेले सुंदर शंखाच्या आकाराचे हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधते. स्वतः रामाने शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली आहे असे सांगण्यात येते. श्रीलंकेवर हल्ला करण्यापूर्वी रामाने या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली असाही समज आहे. हिंदूचे पवित्र क्षेत्र असणारे हे स्थळ तामिळनाडूमध्ये स्थित आहे.
रामेश्वरचे मंदिर हे भारतीय निर्माण कला आणि शिल्पकलेचे एक अप्रतिम नमुना असल्याचे सांगण्यात येते. याचे प्रवेशद्वारे चाळीस फूट उंच असून मंदिरात शेकडो विशाल खांब आहेत. जे दिसायला अगदी हुबेहूब आहेत. पण जवळ जाऊन पाहिल्यास, प्रत्येक खांबावर वेगवेगळी कलाकुसर केलेली दिसून येते.
रामायणातील सर्वात प्रसिद्ध युद्ध झाल्यानंतर रावणाचा वध करून पुन्हा एकदा आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी राम याचठिकाणी परत आले होते. या ठिकाणाला समाजमान्यता मिळावी म्हणून रामाने हनुमानाला काशीवरून शिवलिंग आणण्यासाठी सांगितले होते आणि त्यानंतरच इथे शिवलिंगाची स्थापना झाली अशी आख्यायिका आहे. रामाने स्थापित केल्यामुळेच याला रामेश्वर असे नाव पडले. येथे अनेक तीर्थ आहेत.
कसे पोहचाल
विमानतळ – मदुराई, तुटीकोरीन एअरपोर्ट
जवळचे रेल्वे स्टेशन – रामेश्वरम, रामनाथपुरम, पंबन
तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकता.
घृष्णेश्वर (Grishneshwar)
घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध असणारे हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असून दौलताबादपासून साधारण 11 कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ आहे. रामायण, महाभारत, शिवपुराण, स्कंदपुराण यासारख्या ग्रंथांत घृणेश्वर ठिकाणाचे उल्लेख आढळतात. सदर मंदिराचे बांधकाम हे लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. तसंच या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.
या ज्योतिर्लिंगाची आख्यायिका सांगितली जाते. घृष्णा आणि सुदेहा अशा दोन बहिणी होत्या आणि या बहिणी सख्ख्या सवतीही होत्या. दोघींचा एकाच माणसाशी विवाह झाला होता. पण दोघींनाही मूलबाळ नव्हते. घृष्णा शिवभक्त होती आणि शंकराची नित्यनेमाने पूजा व उपासना करत होती. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिला पुत्रप्राप्ती झाली. पण तिच्या बहिणीने सवती मत्सराने या मुलाला ठार मारले आणि नदीत फेकले. ही घटना घडली तेव्हा घृष्णा शिवपूजा करत होती. आपल्या मुलाला मारले जात आहे हे ऐकूनही ती विचलित झाली नाही आणि तिने पूजा तशीच चालू ठेवली. ज्याने मला पुत्र दिला आहे, तोच त्याचे रक्षण करेल असे म्हणत ती पूजा करत राहिली. तिची भक्ती पाहून शंकर भगवान प्रसन्न झाले आणि घृष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. पण त्याने आईला सांगितले की सुदेहेला तू क्षमा कर. घृष्णेने ज्योतिरूपात या स्थानी कायमचे वास्तव्य करा अशी भगवान शंकराला प्रार्थना केली आणि शंकरानेही तिची ही प्रार्थना ऐकली. घृष्णेच्या नावामुळेच या स्थानाला घृष्णेश्वर असे नाव देण्यात आले.
कसे पोहचाल
विमानतळ – औरंगाबाद
जवळचे रेल्वे स्टेशन – औरंगाबाद
या स्टेशन्सपासून राज्य परिवहन बस अथवा खासगी टॅक्सी वा कारद्वारे तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.
तुम्हीही 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायचे असा विचार करत असाल तर नक्की हा लेख वाचा. तुम्हाला कसा वाटला तेदेखील आम्हाला कळवा. श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!