राशीचक्रामधील पहिल्या राशीचा मान मेष (Aries) राशीला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी 2019 हे नवीन वर्ष कर्तृत्वाची नवी भरारी घेण्याचे आहे. काही काही कालखंडामध्ये थोडी सावधानता बाळगावी लागेल. ती बाळगल्यास 2019 हे वर्ष तुमचेच आहे. चला तर जाणून घेऊया मेष राशीविषयी आणि या राशीसाठी हे नववर्ष कसे राहील याविषयी..
मेष राशीचा स्वभावविशेष
मेष ही अग्नी तत्वाची असून तिचा स्वामी मंगळ तर मेंढा हे तिचं प्रतिक आहे. त्यामुळे या राशीचे लोक डोक्याने फार काम करतात. म्हणूनच त्यांच्यामध्ये शौर्य आणि धाडस हे ओतप्रोत भरलेलं असतं. अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे हा या राशीचा स्थायी भाव आहे. अगदी साधी चर्चा करीत असताना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी हे लोक भांडणापर्यंत जातात. कारण त्यांचा स्वत:वर आणि ते करत असलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास असतो. शांत बसणे मेष राशीच्या लोकांना जमत नाही. अंगात धडाडी असल्यामुळे त्याच धडाडीने कोणत्याही कामाचा श्रीगणेशा करण्यात या लोकांचा हातखंडा असतो. राशीचं प्रतिक मेंढा असल्यामुळे मेंढ्याप्रमाणे धडक मारण्यास हे लोकं चुकत नाहीत. हे करीत असतांना होण्याऱ्या परिणामांचीही त्यांना चिंता नसते.
थोडी सावधानता बाळगा
नववर्षात मेष राशीच्या लोकांना थोडी सावधानता बाळगावी लागणार आहे. उत्साहामध्ये, जोशामध्ये केलेल्या कामात अपेक्षित यश न मिळाल्यास फायदा तर होतच नाही शिवाय आत्मविश्वास खचण्याचीही भिती असते. म्हणून नववर्षातील काही कालखंडामध्ये सावध राहावे लागणार आहे. मेष राशीच्या लोकांना भावनांचे खोटे प्रदर्शनही सहन होत नाही. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी रागवतात. त्याचबरोबरच त्या रागाला चटकन दूरही सारतात. अगदी याच प्रकारे एखाद्या परिस्थितीत अपेक्षित यश न मिळाल्यास हतबल न होता पुन्हा जोशाने कामाला लागण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे.
2019 असणारं सुखकारक
2018 च्या आंबट गोड आठवणी घेऊन आपण 2019 मध्ये प्रवेश करीत आहात. आपल्यासाठी हे नववर्ष सुखकारक आहे, असे म्हणावे लागेल. कारण 2018 आपल्यासाठी अत्यंत कठीण, नौकरी आणि व्यवसायात अत्यंत त्रासदायक गेलेले आहे. आपल्या अनेक परिक्षा या वर्षाने घेतल्या आहेत. तरीही आपल्याला अपेक्षित उत्तरे म्हणजेच फळ मिळाले नाही. मात्र 2019 या येणा-या नवीन वर्षाकडून तुम्ही चांगल्या अपेक्षा करु शकता.वर्षाची सुरुवात होत आहे अष्टमेश आणि व्ययेश यांच्या परिवर्तन योगाने. मंगळ आणि गुरु या सुदृढ ग्रहांचे सहाय्य तुम्हाला विपरीत राजयोगातून प्राप्त होईल. जो तुमच्या धडक मारण्याच्या प्रवृत्तीला अधिक बळ प्राप्त करुन देणारा आहे. सोबतीला तुमचा पंचमेश भाग्यातून प्रवास करतोय. त्याचाही तुम्हाला लाभ होणारा आहे. नोकरी आणि व्यवसायात ही ग्रहस्थिती तुम्हाला प्रगतीच्या उत्तम संधी प्राप्त करुन देणार आहे. त्याच बळावर सरकारी नोकरीत असलेल्यांना प्रमोशन आणि परिवर्तन एकाच वेळी प्राप्त होण्याचे योग आहेत. सोन्याहून पिवळी गोष्ट मिळवून देण्याचे हे योग आहेत. मुख्य म्हणजे सप्तमातील स्वराशीचा शुक्र कौटुंबिक सौख्य देणार आहे. म्हणजेच घरात आणि घराच्या बाहेरही तुमच्यासाठी आनंदी-आनंदच आहे.
कर्तुत्वाला मिळणार झळाळी
दि. 6 फेब्रुवारी 2019 रोजी मेष राशीत येणारा मंगळ तुमच्या कर्तृत्वात भर पाडणारा आहे. म्हणजेच मंगळामुळे या कालखंडात मंगल घटना आपल्या आयुष्यात घडण्याचे योग आहेत. चहूबाजूंनी यश मिळवण्याचे हे दिवस आहेत. मात्र मिळवलेल्या या यशामुळे आपल्यातल्या आत्मविश्वासासह गर्वाचीही वाढ होऊ शकते. म्हणून या काळात ‘मी’ पणात वाढ होऊ शकते. तसे झाल्यास नाती दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालखंडात मेष राशीच्या लोकांनी अत्यंत सावध राहायला हवे.
कर्म करा फळाची चिंता नको
18 महिने कर्म स्थानात असलेला केतू दि. 23 मार्च 2019 रोजी भाग्य स्थानात जाणार आहे. शुक्र आणि केतू या युतीमुळे भाग्यात कमतरता असली तरी कर्मात वाढ होणार आहे. म्हणजे काम खूप जास्त असूनही त्यामानाने फळ कमी मिळू शकते. त्यामुळे या काळात आपण गीतेतील उपदेश लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे ‘कर्म करत राहा.. फळाची अपेक्षा करु नका.’ फळाची अपेक्षा ठेवली नाही तर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये कमी पडणार नाही. आज फळ कमी मिळाले किंवा नाही मिळाले म्हणून काय झाले, आत्मविश्वास खचू न देता कर्मावर विश्वास ठेवावा. एक दिवस फळ नक्कीच मिळेल. याची प्रचिती तुम्हाला लवकरच मिळणार आहे. कारण दि. 14 एप्रिल 2019 ला सुर्याचा तुमच्या राशीतील प्रवेश तुमच्यासाठी प्रगतीची दारे उघडणारा आहे. आधी प्रयत्न करीत राहिल्यामुळे याकाळात तुम्ही प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने करु शकाल. पण असे असले तरी दि. 7 मे 2019 रोजी मंगळ आणि शनी यांचा मिथुन आणि धनुतून होणारा समसप्तक योग अथक परिश्रमातून थोडेसच यश देणारा आहे. या काळात आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागणा-या घटनाही घडू शकतात. यावेळीही आपल्याला अत्यंत सावधानता बाळगावी लागणार आहे. कारण येणारे पुढील अजून काही दिवस तुमची परीक्षा पाहणारे आहेत. कारण दि. 22 जून 2019 रोजी तुमचा राशीस्वामी मंगळ निचीचा होत असल्याने आत्मविश्वासाला तडा आणि स्वभावात चिडचिडेपणा वाढू शकतो. अशावेळी आपण मनाला जेवढं शांत ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व सुरु राहील दि. 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत. कारण यानंतर शुक्राचा तूळेत प्रवेश तुमच्यासाठी व्यापार स्थानातून मालव्य योग निर्माण करणारा असून व्यावसायिक भरभराट देणारा आहे. येथून पुन्हा आपल्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार आहे.
भाग्याचं दार उघडणार
दि. 8 नोव्हेंबर 2019 ला धनू राशीत प्रवेश करणारे गुरु महाराज तुमच्यासाठी भाग्याची दारे उघडणार आहेत. दि. 21 नोव्हेंबर 2019 रोजी भाग्य स्थानात गुरु आणि शुक्र या दोन गुरुंची युती होणार आहे. म्हणजेच वर्षाअखेरपर्यंत आपल्या प्रयत्नांना नवे परिमाण लाभलेले असेल. आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ प्राप्त झालेला असेल. मात्र वर सांगितल्याप्रमाणे काही कालखंडात आपण सावधानता बाळगावी लागेल तरच हे शक्य होऊ शकतं.
२०१९ हे वर्ष आपलंच आहे, त्याचा योग्य लाभ करुन घ्यावा.
शुभं भवतू |
लेखिका : श्री ज्योतिष संशोधन केंद्र