मधुमेह हा खरंतर तुमच्या जीवनशैलीमुळे होणारा रोग आहे. जर मधुमेहाचे प्रमाण वाढल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम सर्वश्रृत आहेत. म्हणूनच जर तुम्हाला मधुमेह असेल तर तो नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो नियंत्रणात ठेवायचा म्हणजे नेमकं काय… तर मधुमेह आहार, तुमच्या शरीरातली ब्लड शुगर पातळी नियंत्रणात असली पाहिजे.
प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी, बॉलीवूड अॅक्ट्रेस करिना कपूर, करिश्मा कपूर, अनुपम खेर, रिचा चढ्ढा यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजच्या फिटनेस सल्लागार आणि न्यूट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर हे नावं आपल्यासाठी नवीन नाही. ऋजुता ह्या नेहमीच त्यांच्या फिटनेस आणि वेलनेससंबंधीच्या सोप्या आणि साध्या टीप्समुळे चर्चेत असतात. आज आपण त्यांनी सांगितलेल्या ‘5’ सोप्या पण अत्यावश्यक अशा मधुमेहासंबंधीच्या टिप्स पाहणार आहोत. त्या फॉलो केल्याने तुमचा मधुमेह नक्कीच नियंत्रणात येईल.
1. एखाद्या हंगामी फळाने किंवा सुक्यामेव्याने करा दिवसाची सुरुवात
सकाळी सगळ्यात आधी तुम्ही केळं किंवा कोणतंही हंगामी फळ खायला हवं. जर ते नसेल तर त्याऐवजी भिजवलेले बदामही तुम्ही खाऊ शकता. कारण जर तुम्ही दिवसाची सुरूवात चहाने केली तर तुमची ब्लडशुगर स्टेबल राहत नाही. याउलट जर तुम्ही एखादं फळ किंवा बदाम खाल्ल्यास संपूर्ण दिवस तुमची ब्लडशुगर स्टेबल रहाते.
2. सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान कंपल्सरी जेवा
तुम्ही अनेक वर्ष मधुमेहावर औषधं घेत असाल तर साहजिकच त्याचा तुमच्या पचन संस्थेवर परिणाम होईल. त्यामुळे तुमचं पोटही साफ होणार नाही. म्हणूनच तुम्ही नेहमी योग्यवेळी म्हणजेच सकाळी 11 ते 1 दरम्यानच जेवण करायला हवं. त्याचबरोबर जेवण झाल्यावर घरी बनवलेलं ताक प्या. जर ताक फुल फॅट दुधाच्या दह्यापासून बनवलं असेल, तर ते तुमच्या पचनासाठी फायद्याचं ठरेल. त्याचबरोबर ते तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी ला संतुलित ठेवायलाही मदत करेल. तुम्हाला जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते तीही होणार नाही.
3. दुपारी किंवा संध्याकाळी थोडे शेंगदाणे खा.
निरोगी शरीरासाठी अॅमिनो अॅसिड, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची गरज असते. त्यामुळे संध्याकाळी भूक लागल्यास फायबरयुक्त बिस्कीटस् खाण्याऐवजी थोडे म्हणजे अगदी मूठभर दाणे खाणं फायदेशीर ठरेल. शेंगदाणे तुमच्या हृदयासाठी चांगले असतातच, पण त्याचबरोबर तुमच्या सांध्यांसाठीही उपयुक्त ठरतात. दाणे खाल्ल्यावर काही तास भूकही लागत नाही.
4. चहात आर्टीफिशअल स्वीटनर टाकताय?
मधुमेहामध्ये बऱ्याचदा हाय ब्लडशुगरची समस्या उद्भवते. पण जास्त धोका वाढतो तो तुमच्या पेशींचे पुरेसे पोषण होतं नाही तेव्हा. त्यामुळे हृदय आणि किडनीच्या समस्यांबरोबरच न्युरोमस्क्यूलरचा धोका वाढतो. म्हणूनच ऋजुता दिवेकर सांगतात की, आर्टिफिशियल स्वीटनर वापरण्याऐवजी एक चमचा साखरच टाका. कारण त्यामुळे तुमची इन्शुलिनची पातळी वाढते. इन्शुलिनमुळे प्रतिकार क्षमता ही वाढते. ऋजूताच्या सल्ल्यानुसार मधुमेहाच्या रूग्णांनी रोज 2 ते 3 कप चहा किंवा कॉफी प्यायला हवी. ज्यामध्ये फुल फॅट मिल्क आणि गूळ असायला हवा.
5. आठवड्यातून दोनदा तरी व्यायाम करा.
स्नायूंची ताकद कमी झाल्याने इन्शुलिनची प्रतिरोधक क्षमता वाढते. ती कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम करणं फायद्याचं ठरेल. फक्त जिमच नाही तर हा व्यायाम तुम्ही घरीही करु शकता. तुम्ही जर रोज नियमित व्यायाम केला तर तुमच्या औषधाचा डोस लवकरच कमी होऊ शकतो. जर डॉक्टरांनी तुम्हाला चालण्याचा व्यायाम करण्याची परवानगी दिली असेल तर तेही तुमच्या हिताच आहे.
तुम्हीही हे मधुमेह घरगुती उपाय नक्की करून पाहा.