रोज काहीतरी नवं करणारी राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच पत्रकारांशी एका कार्यक्रमादरम्यान राखीने आपल्या नव्या बॉयफ्रेंडशी ओळख करून दिली आहे. ‘बिग बॉस’ (Big Boss) चे अनेक सीझन राखीने गाजवले आहेत. तर मागच्या सीझनमध्ये राखीचा नवरा म्हणून आलेला रितेशदेखील गाजला. तर अनेकांनी राखीचे लग्न आणि नवरा हा एक स्टंट असल्याचे सांगितले आणि तसंच घडलं. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर राखीचे नाते जास्त काळ टिकू शकलं नाही आणि आपण आपल्या ‘तात्पुरत्या नवऱ्यासह’ (आमच्या दृष्टीने राखीच्या रितेशसह नात्याची संकल्पना) वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तर आता पुन्हा एकदा आपल्या नव्या नात्याविषयी तितकेच बिनधास्तपणे राखीने बोलायला सुरूवात केली असून आता राखी कोणासह नात्यात आहे हेदेखील सांगितले आणि व्हिडिओ कॉलवरून ओळखही करून दिली आहे.
राखीने केला नव्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा
राखी नेहमीच आपल्या आयुष्याबाबत खुलेपणाने बोलत आली आहे. राखी कशीही वागली किंवा काहीही बोलली तरीही तिचे अनेक चाहते आहेत. नुकतीच एका कार्यक्रमात राखीने आपला बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याची पत्रकारांना व्हिडिओ कॉलवरून ओळख करून दिली आहे. त्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण सुरू झाले आहे. आता तरी राखी नात्यात गंभीर राहणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. राखी पुन्हा प्रेमात पडली असून तिने आपल्या प्रेमाची जाहीरपणे पुन्हा एकदा कबुली दिली आहे. रितेशपासून वेगळी झाल्यानंतर आपण नैराश्याच्या गर्तेत गेल्याचे राखीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं असून आदिलबद्दलही काही खुलासे केले आहेत. नैराश्यात असतानाच आपली भेट आदिलशी झाल्याचेही तिने सांगितलं. तर त्यानेच आपल्याला या नैराश्यातून बाहेर काढले आणि आमची ओळख झाल्यानंतर साधारण एक महिन्याने आदिलने प्रपोज केल्याचेही राखीने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
‘सुरूवातीला या नात्यासाठी मी अजिबात तयार नव्हते कारण आदिलपेक्षा मी 6 वर्षाने मोठी असून आदिलनेच मला या नात्यासाठी तयार केले. त्याने मला मलायका – अर्जुन, प्रियांका – निक यांची उदाहरणे दिली. तो माझ्यावर खूपच प्रेम करतो आणि त्यामुळे मी त्याच्या प्रेमात पडले’ असं राखीने म्हटलं आहे.
आदिलच्या कुटुंबीयाला मात्र आवडत नसल्याचे राखीचे म्हणणे
‘मी अशा क्षेत्रात आहे जिथे नेहमीच मला ग्लॅमरस अवतारामध्ये राहावे लागते आणि स्वतःला तसेच दाखवावे लागते. माझी या क्षेत्रातील जी प्रतिमा आहे, त्यासाठी आदिलच्या कुटुंबीयांचा मात्र विरोध आहे. जेव्हा त्यांना आदिल आणि माझ्या नात्याबाबत समजलं तेव्हा खूपच वाद झाले होते. तसंच मी जे कपडे घालते तेदेखील त्यांना आवडत नाहीत. मात्र या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी मी तयार आहे’ असंही आदिलच्या प्रेमात असणाऱ्या राखीने स्पष्ट केले आहे. आदिलची बहीण शैली ही राखी सावंतची चांगली मैत्रीण असून आदिल हा मूळचा म्हैसूरचा आहे. शैलीमुळेच या दोघांची ओळख झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान एकमेकांच्या प्रेमात असल्यापासून आदिलने राखीला गिफ्ट म्हणून बीएमडब्ल्यू दिल्याचेही सांगण्यात येत आहे. आदिल एक उद्योगपती असून आता राखी आणि आदिलनचे नाते टिकावे आणि राखीला एक चांगले आयुष्य मिळावे अशीच अपेक्षा आणि इच्छा तिचे चाहते करत आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक