home / मनोरंजन
actress-sonalee-kulkarni-marriage-with-husband-kunal-benodekar-releasing-on-ott-platform-on-11-august-in-marathi

सोनाली कुलकर्णीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट

सनई चौघडे… फुलांच्या रंगीबेरंगी माळा… लग्नमंडप… जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा… पाहुण्यांची लगबग… जेवणात मराठमोळा बेत… हा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा रंगला होता लंडनमध्ये आणि तोही आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजेच सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि कुणाल बेनोडेकरचा (Kunal Benodekar). काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना या लग्नसोहळ्याला (Sonalee Weds Kunal) उपस्थित राहाण्याचे निमंत्रणही दिले होते. आता या लग्नसोहळ्याची (Sonalee Kulkarni Married With Kunal Benodekar) झलकही चाहत्यांच्या भेटीला आली असून कधी हा सोहळा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर पाहाता येईल, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार

खरंतर अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी पूर्ण करत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 11 ऑगस्ट रोजी झळकणारा हा लग्नसोहळा काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. सोनाली आणि कुणाल आतापर्यंत फिरायला गेले त्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ सोनालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले होते. पण तरीही यांचे लग्न नक्की कसे झाले याची उत्सुकता तर प्रेक्षकांना आणि चाहत्यांना होतीच. त्यामुळेच आता सोनालीचे लग्न पाहता येणार आहे. पहिल्यांदाच असं ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी अभिनेत्रीचं लग्न झळकताना दिसणार आहे. 

धुमधडाक्यात लग्न 

सोनाली कुलकर्णी म्हणते, “ आपले लग्न धुमधडाक्यात व्हावे, हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. माझेही होते. परंतु जागतिक महामारीमुळे आम्ही रजिस्टर लग्न केले. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आले नाही. त्यामुळेच सर्व काही आलबेल झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर आधुनिक पद्धतीने रिसेप्शनही केले. खरंतर कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यतील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे, म्हणूनच मी या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवले आणि यासाठी प्लॅनेट मराठीसारखे उत्तम ओटीटी मला मिळाले, ज्यामुळे माझा लग्नसोहळा जगभरातील मराठी प्रेक्षक पाहू शकतील.” 

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकरने सांगितले, “सातासमुद्रापार लंडनसारख्या देशात सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांचे लग्न पार पडले होते. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराच्या लग्नातील धमालमस्ती अनुभवायची असते. सोनालीचा चाहतावर्ग पाहता आम्ही तिचा संपूर्ण लग्नसोहळा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच तिच्या या सोहळ्याचे ट्रेलर झळकले असून ते प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे. लवकरच चाहत्यांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर लग्नाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.” चाहत्यांनाही एक वेगळाच अनुभव मिळणार हे नक्की!

08 Aug 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text