कलाकारांना चित्रपट, मालिका, नाटक या तीनही माध्यमांमध्ये आपण लोकप्रिय असावं असं वाटत असतं. मात्र ते ज्या माध्यमातून अभिनयात पदार्पण करतात त्या क्षेत्रात त्यांना जास्त लोकप्रियता मिळते. एकदा मालिका आणि डेलीसोपमध्ये यश मिळवल्यावर जरी त्यांना बॉलीवूडमध्ये नशीब आजमावं असं वाटू लागलं तरी प्रत्येकाला या माध्यमात यश मिळेलच असं नाही. असे अनेक टीव्ही कलाकार आहेत ज्यांना मालिकांमध्ये प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं मात्र त्यांना बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान आजवर निर्माण करता आलं नाही. त्यामुळे अनेक कलाकारांनी चित्रपटात काम केल्यावरही पुन्हा मालिकांचा मार्ग स्वीकारलेला दिसत आहे.
अंकिता लोखंडे
अंकिता लोखंडे पुन्हा एकदा तिची पहिली टीव्ही मालिका पवित्र रिश्ता मधून झळकत आहे. या मालिकेने अंकिताला खरी ओळख मिळाली. मात्र यशाच्या शिखरावर असताना तिने बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. कंगना रणौतच्या मणिकर्णिकामधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलीवूड डेब्यूनंतर आता अंकिता पुन्हा मालिकांकडे वळेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्यानंतर अंकिता बागी 3 मध्येही झळकली. मात्र बॉलीवूडमध्ये अंकिताला फार यश आणि लोकप्रियता मिळाली नाही. म्हणूनच की काय तिने पुन्हा मालिका आणि त्यामध्येही तिची पहिली मालिका पवित्र रिश्ता करण्याचा निर्णय घेतला.
करण सिंह ग्रोव्हर
दिल मिल गये या हिंदी मालिकेतून करण सिंह ग्रोव्हरने अभिनयात प्रवेश केला. त्याच्या अभिनय आणि लुक्समुळे तो लवकरच घरोघरी लोकप्रिय झाला. लोकप्रियता मिळाल्यावर करणला आपण बॉलीवूडमध्ये जावं असं वाटू लागलं. बॉलीवूड अभिनेत्री बिपाशासोबत लग्न झाल्यावर तो स्वतःला बॉलीवूड स्टार्स समजू लागला. त्याने अलोन, हेट स्टोरी 3 सारख्या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये नशीब आजमावलं. पण हवं तसं यश त्याला मिळालं नाही. त्यामुळे त्याने पुन्हा आपला मोर्चा मालिकांकडे वळवला. कसौटी जिंदगी 2 या लोकप्रिय मालिकेत तो मिस्टर बजाजच्या भूमिकेत दिसला होता.
श्वेता तिवारी
श्वेता तिवारी नेहमीच तिच्या खाजगी आयुष्यासाठी चर्चेत असते. पण एक असा काळ होता जेव्हा कसौटी जिंदगी मालिकेतून ती घरोघरी प्रेरणा या नावाने प्रसिद्ध होती. तिची लोकप्रियता तिला यशाच्या शिखरावर घेऊन गेली. यश मिळू लागल्यावर श्वेताने बॉलीवूडमध्ये मदहोशी, आबरा का डाबरा आणि काही भोजपुरी चित्रपटामध्ये काम केलं. पण श्वेतालाही हवं तसं यश मिळालं नाही. ज्यामुळे मोठ्या गॅपनंतर श्वेता पुन्हा मालिकांकडे वळली. काही दिवसांपूर्वीच ती खतरो के खिलाडी च्या नव्या सीझनमध्ये झळकली होती. याशिवाय तिची मालिका मेरे डॅड की दुल्हनदेखील कमी वेळात लोकप्रिय ठरली होती.
आमना शरीफ
कही तो होगा या मालिकेतून आमना शरीफने हिंदी टेलीव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं. एक काळ असा होता की आमनावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. तिचे कपडे, दागिने, स्टाईल कॅरी केली जात होती. मिळालेली लोकप्रियता आमनाला बॉलीवूडमध्ये घेऊन गेली. आलू चाट या चित्रपटात तिने आफताब शिवदासानीसोबत काम केलं. मात्र त्यानंतर ती फार काळ बॉलीवूडमध्ये दिसली नाही. एक था व्हिलेनमध्येही तिने एक सहाय्यक भूमिका साकारली. शेवटी परत मालिकांमध्ये येण्याचा निर्णय घेतला. कसौटी जिंदगी की 2 मालिकेत तिने काही काळासाठी एक भूमिका साकारली होती.
अनिता हंसनदानी –
टीव्ही मालिकांमध्ये अनिता हंसनंदानी काही काळातच लोकप्रिय ठरली होती. एकता कपूरच्या काव्यांजलीमधून अंजली नावाने अनिता घरोघरी पोहचली. पुढे तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले. यश मिळू लागताच अनिता एकताच्या कृष्णा कॉटेज आणि कोई आप सा, कुछ तो है या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. मात्र मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये तिला हवं तसं यश मिळालं नाही. ज्यामुळे ती पुन्हा मालिकांकडे वळली. एकताच्या नागिन सिरिजमध्ये अनिता पुन्हा झळकली होती. सध्या ती तिच्या बाळाच्या संगोपनामध्ये व्यस्त आहे.