दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या इटलीतील ग्रॅंड लग्नानंतर आता लोकांना उत्सुकता आहे ती प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाची. सात समुद्र पार करून प्रियांकाचा होणारा नवरा निक आणि त्याच्या नातेवाईकांची मुंबईत यायला सुरूवात देखील झाली आहे.
फोटो सौजन्य : Instagram
प्रियांकाच्या लग्नाची घटिका जसंजशी जवळ येत आहे. तसतसं प्रियांकाच्या आई मधू चोप्रा यांचीही लगबग सुरू झाल्याचं दिसतंय. लव्हबर्डस् #Nickyanka यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस येथे पार पडणार आहे. एकेकाळी जोधपूरच्या शाही घराण्याचं घर असलेले उमेद भवन आता या लग्नासाठी सज्ज होत आहे.
जोधपूरच्या सर्वात उंच अशा चित्तर टेकडीवर 26 एकर जमिनीवर हा आलिशान पॅलेस असून त्याचं आता पंचतारांकित हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. जगातील सहाव्या नंबरची खाजगी मालमत्ता म्हणून ह्याची ख्याती आहे. हा सुंदर पॅलेस 1928 ते 1943 सालादरम्यान बांधण्यात आला असून यामध्ये एकूण 347 खोल्या आहेत. ज्या दोन भागांमध्ये विभागण्यात आल्या असून एका भागात जोधपूरचं शाही राठोड घराणं वास्तव्यास आहे. तसंच इथे एक कौटुंबिक संग्रहालय असून त्यामध्ये ब्रिटीशकालीन राणी व्हिक्टोरियाने 1877 साली महाराजा जसवंत सिंग यांना दिलेला मोठा झेंडाही आहे. एवढंच नाही तर महाराजांच्या काळातील अनेक क्लासिक गाड्या ही इथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. पॅलेसच्या दुसऱ्या भागाचं रुपांतर पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आलं असून त्यात अनेक डायनिंग हॉल्स आणि सुंदर बॉलरुम्स आहेत. हा पॅलेस म्हणजे स्वप्नातील विवाह सोहळा करण्यासाठी अगदी योग्य जागा आहे आणि निकयांका ह्यांच्या लग्नातील ग्रॅंड एन्ट्रीसाठी येथे तात्पुरतं हॅलिपॅड ही उभारण्यात येणार आहे. आहे ना लय भारी !
पाहूया सुंदर आणि मनमोहक पॅलेसचे काही खास फोटोज :
आग्र्याचा ताज महालासाठी ज्या संगमरवराचा वापर करण्यात आलाय. त्याच संगमरवराचा वापर ह्या हॉटेलमध्येही करण्यात आलाय. आहे ना खरंच शाही?
इथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये 64 खोल्या असून त्यांना पाच श्रेणींमध्ये विभागण्यात आलंय.
भारताच्या प्राचीन शाही कलेच्या अनुभवाबरोबरच इथे खास ग्रॅंड स्पा चीदेखील सोय आहे.
पहा किती मस्त पूल आहे…हा बघून जर तुम्हाला उडी मारावीशी वाटली नाही तर आश्चर्यच आहे?
नाचणारे मनमोहक सुंदर मोर दिसल्यावर मनाचा पिसारा ही नक्कीच खुलेल नाही का? या सुंदर पॅलेसमध्ये फिरताना हे मोरही तुमच्या सोबतीला असतील.
एवढ्या सुंदर अनुभवांना चारचांद लावायला आहे, येथील शेफनी तयार केलेलं खास राजेशाही जेवण.
हा पॅलेस बघितल्यावर ‘हृदयात वाजे समथिंग’ असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल.
फोटो सौजन्य : Instagram
लग्नाच्या सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच मधू चोप्रा यांनी जोधपूरला भेट दिली. आपल्या मुलीच्या लग्नसोहळ्याच्या तयारीची पूर्ण जवाबदारी आईने मधू चोप्रा यांनी घेतली आहे. हे सुंदर जोडपं 2 डिसेंबरला लग्नगाठीत अडकणार आहे. तर लग्नापूर्वीचे सर्व पारंपारिक विधी 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या शाही विवाह सोहळ्याची सुरूवात संगीत आणि मेंदीच्या कार्यक्रमाने होणार आहे.
वरील इतके सुंदर फोटो पाहिल्यावर कोणालाही ह्या पॅलेसमध्ये लग्न करण्याची इच्छा होणं साहजिक आहे. तुम्ही या पॅलेसचे अधिक फोटो त्यांच्या अॉफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटरवर पाहू शकता.