आयुर्वेदामध्ये आलं या मसाल्याच्या पदार्थाला औषधाचे स्थान देण्यात आलेलं आहे. कारण आल्यामध्ये अनेक गुणकारी घटक असतात. ज्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या घरच्या घरी कमी होऊ शकतात. आपण स्वयंपाकात आल्याचा वापर करताना आलं स्वच्छ धुवून ते सोलून घेतो. सोललेलं आलं किसून, ठेचून अथवा पेस्ट करून अन्नपदार्थांमध्ये घातलं जातं. सहाजिकच आलं सोलल्यावर त्याची साल टाकाऊ म्हणून कचऱ्यामध्ये फेकून दिली जाते. मात्र आल्याची ही साल मुळीच फेकून देऊ नका कारण आल्याप्रमाणेच आल्याच्या सालीमध्येही औषधी गुणधर्म दडलेले असतात. कोरोना महामारीच्या काळात चहा, काढा करण्यासाठी या सालींचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. यासोबतच जाणून घ्या आल्याच्या सालीचे इततर फायदे आणि कसा करावा वापर
जर तुम्हाला खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही औषधासाठी या सालींचा वापर करू शकता. कारण बऱ्याचदा जुनाट खोकला कितीही औषधं केली तरी लवकर बरा होत नाही. अशा खोकल्याला बरं करण्यासाठी वैद्यकीय उपचारांसोबत काही घरगुती उपाय नियमित करायला हवेत. यासाठी आलं सोलल्यावर त्याची साल उन्हात चांगली वाळवून घ्या. वाळलेल्या आणि कडक झालेल्या या आल्याच्या साली मिक्सरमध्ये वाटून त्याची पूड तयार करा. ही पूड तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. चहा अथवा काढ्यामध्ये या सालींची पूड नक्कीच वापरता येईल. खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही आल्याच्या सालीची पूड मधात घालून त्याचे चाटण नेहमी घेऊ शकता.
पोटदुखी, गॅस आणि अपचन अशा त्रासावरही आल्याच्या साली उपयुक्त ठरू शकतात. सोललेल्या आल्याच्या साली पाण्यात टाका आणि त्या वीस मिनिटं उकळून घ्या. आल्याच्या सालींचे हे पाणी पिण्यामुळे तुमच्या पोटाच्या अनेक समस्या दूर होतील. शिवाय आल्याचे पाणी पिण्यास चांगले लागते त्यामुळे तुमच्या तोंडाची चवही सुधारते आणि पोटाला आरामही मिळतो.
वातावरणातील बदलांचा परिणाम शरीरावर होतो आणि अशा काळात बऱ्याचदा सर्दी, तापाचा त्रास जाणवतो. प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे सर्दी अथवा ताप होण्याची शक्यता अधिक वाढते. मात्र जर तुम्ही नियमित चहामध्ये आल्याच्या साली टाकत असाल तर त्यामध्ये त्यांचा अर्क उतरतो. अशी आले घातलेली चहा पिण्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. वातावरणातील बदलांमुळे होणारे आजार असे उपाय केल्यामुळे दूर राहतात.
जर तुम्हाला आल्याचा उग्र वास आवडत नसेल तर भाजीमध्ये आल्याऐवजी आल्याच्या सालींची पेस्ट टाका. आल्याची साले आल्याचा रस अथवा पेस्टपेक्षा कमी उग्र असतात. शिवाय त्यामुळे तुमच्या भाजीला एक छान चव येते. भाजी कमी तिखट आणि चविष्ट करण्यासाठी ही युक्ती तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरेल.
तुम्हाला घरात बाग फुलवण्याची आवड असेल तरी तुम्हाला आल्याच्या सालींचा फायदा होऊ शकतो. आल्याच्या साली फेकून देण्यापेक्षा त्या झाडांच्या मुळाशी टाका. आल्याच्या साली हा विघटनशील पदार्थ असल्यामुळे त्या मातीत विरघळून जातात. झाडांच्या मुळांना पोषण मिळतं आणि झाडांची वाढ जोमाने होते. आल्यामधील फॉस्फरस झाडाच्या वाढीसाठी उपयुक्त असतं. त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
‘केळ्याची साल’ आहे एक नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन