महाराष्ट्र म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो कडेकपाऱ्यांनी आणि सह्याद्रीच्या रांगांनी नटलेलं समृद्ध राज्य. इतर राज्यांमध्ये फिरायला जाण्याआधी आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चांगलं आहे हे पाहून घ्यायला हवं. खरं तर महाराष्ट्रातील विविध स्थळांचा, इथल्या गड, किल्ल्यांचा आणि नदी पर्वतांचा अनेक प्राचीन ग्रंथांमध्येदेखील उल्लेख आढळतो. इतकंच नाही तर महाराष्ट्र हा भौगोलिक, धार्मिक, आर्थिक आणि महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक या सर्वच दृष्टीने संपन्न आहे. महाराष्ट्रात प्रवासासाठी चांगले रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहं, धर्मशाळा या गोष्टी सहज प्राप्त होतात. मुंबई या राजधानीतही बरंच काही पाहण्यासारखं आहे. पण त्याशिवाय लेणी, थंड हवेची ठिकाणं, किल्ले आणि इतर ऐतिहासिक स्थळांनीही महाराष्ट्र नटलेलं आहे. आपण जाणून घेऊया की, महाराष्ट्रातील ती खास ठिकाणं जिथे तुम्ही जाऊन भेट द्यायलाच हवी. या ठिकाणी तुम्ही अगदी मनसोक्त फिरू शकता.
फिरण्यासाठी कुठे कुठे जायचं (Places To Visit In Maharashtra)
महाराष्ट्रात फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. पण त्यातही काही महत्त्वाची ठिकाणं जिथे तुम्ही जायलाच हवं. ही ठिकाणं तुम्हाला मनाला समाधान देतात. जाणून महाराष्ट्रात भेट देण्यासाठी रोमँटिक ठिकाणे.
1. मालवण (Malvan)
एखाद्या चित्रामध्ये दिसणारे समुद्रकिनारे मालवण तुम्हाला पाहायला मिळतात. मालवण ही कोकणची शान आहे. आता या ठिकाणी बॅकवॉटर अॅक्टिव्हिटीजदेखील पर्यटकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर मालवणच्या आसपास फिरण्याचीही अनेक ठिकाणं आहेत. चार दिवसांची एक चांगली पिकनिक तुम्ही इथे करून येऊ शकता. खरं तर इथले समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ असून इथे तुम्हाला कधीही गर्दी दिसणार नाही. कोणताही कलकलाट नाही. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणं अर्थात तुमचा थकवा घालवणं.
कोणासाठी – निसर्गप्रेमी, समुद्रप्रेमी,
काय करता येतं – साईटसीन, ट्रेकिंग, कार्ली बॅकवॉटर्समध्ये बोटिंग, स्कुबा डायव्हिंग, डॉल्फिन सफारी, स्नोरकेलिंग
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा अनेक बसचीदेखील सोय आहे. पटकन पोहचायचं असल्यास, ट्रेन अर्थात एक्स्प्रेस हा उत्तम पर्याय आहे. अगदी परवड्याजोगी पिकनिक होते.
आकर्षण – तारकर्ली बीच, मालवण समुद्रकिनारा, रॉक गार्डन, देवबाग समुद्रकिनारा, मालवण मरीन सँक्च्युरी, सिंधुदुर्ग किल्ला
वाचा – रत्नागिरी बीच
2. आंबोली (Amboli)
पश्चिम घाटातील सह्याद्रीवरील भेट देण्याजोगे अप्रतिम ठिकाण. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही या ठिकाणी ट्रीपची योजना आखू शकता. साधारण 2260 फूटावर असणारं हे ठिकाण थंड असून पावसाळ्यात संपूर्णतः निसर्गाने नटलेलं तुम्हाला दिसतं. महाराष्ट्रामधील थंड ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. बरेचदा पावसाळ्यात फिरण्यासाठी पर्यटक या स्थळाला प्राधान्य देतात. तर उन्हाळ्यात या ठिकाणी थंड हवामान असल्यामुळे या ठिकाणाला प्राधान्य देण्यात येतं.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, दुर्ग ढाकोबाला ट्रेकिंग, पक्षी पाहणं, कँपिंग
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा अनेक बसचीदेखील सोय आहे. पटकन पोहचायचं असल्यास, ट्रेन अर्थात एक्स्प्रेस हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय विमानाने गेल्यास, गोव्याला जाऊन पुढे आंबोलीला तुम्हाला गाडीने जाता येतं.
आकर्षण – आंबोली धबधबा, शिरगावकर पाँईंट, माधवगड किल्ला, नन्गर्ता धबधबा आणि सनसेट पाँईंट
3. काशीद (Kashid)
अलिबागच्या जवळच असणारा काशीद बीच हा अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे. मुंबईपासून जवळ असणारा हा परिसर तुम्हाला निसर्गाच्या अधिक प्रेमात पाडतो. महत्त्वाचं म्हणजे या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू ही अतिशय मऊ असून पांढरी आहे. पायातील चप्पल काढून इथे फिरण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. धावपळीच्या जीवनात तुम्ही तुमच्या माणसांबरोबर काही क्षण काढणार असाल तर हा पर्याय अप्रतिम आहे. इथे कोणत्याही प्रकारची धावपळ तुम्हाला दिसत नाही आणि मिळतो तो मनमोकळा निवांतपणा.
कोणासाठी – निसर्गप्रेमी, समुद्रप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, कँपिंग, फंसाड ट्रेक, स्कुबा डायव्हिंग
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा अनेक बसचीदेखील सोय आहे. पावसाळा नसताना तुम्हाला गेट वे ऑफ इंडियावरून लाँचनेही या ठिकाणी जाता येतं. अलिबागला उतरून पुढे बसने जाता येतं अथवा रिक्षा करूनही जाता येतं.
आकर्षण – रेवदंडा समुद्रकिनारा आणि किल्ला, मुरूड जंजिरा किल्ला, काशीद समुद्रकिनारा, फंसाड बर्ड सँक्युरी
Best Treks In India In Marathi
4. लोणावळा (Lonavala)
मुंबईपासून साधारण दोन तासांच्या अंतरावर असलेलं लोणावळा हे पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध स्थळ आहे. पण इतर वेळीदेखील तुम्हाला दोन दिवसाचा आराम हवा असेल तर तुम्हाला लोणावळा जाणं सोपं ठरतं. पटकन जाऊन पटकन येता येत असल्यामुळे लोणावळ्याला जाणं बरेच लोक पसंत करतात. मुळात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं लोणावळा हे पावसाच्या दिवसात अप्रतिम सौंदर्याने नटतं आणि त्यामुळेच इथे गेल्यानंतर सगळा थकवा निघून जातो. अगदी खालपर्यंत येणारे ढग तुम्हाला अधिक आकर्षित करतात. डोंगर, दऱ्या आणि धबधबे या सगळ्याचं एकत्रित मिश्रण म्हणजे लोणावळा. शिवाय इथे जाण्यासाठी तुम्हाला जास्त कोणत्याही योजना बनवाव्या लागत नाहीत. अचानक प्लॅन ठरला तरी पटकन इथे जाता येतं. लोणावळा हे कायमस्वरूपी फिरण्याचं ठिकाण आहे. उन्हाळ्यात पिकनिकसाठी तर पावसाळ्यातही इथलं सौंदर्य पाहण्यासाठी तुम्ही कधीही जाऊ शकता.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, कँपिंग, हॉर्स राईड, कोरेगड ट्रेक, राजमाची ट्रेक
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा अनेक बसचीदेखील सोय आहे. पटकन पोहचायचं असल्यास, ट्रेन अर्थात एक्स्प्रेस हा उत्तम पर्याय आहे. अगदी परवड्याजोगी पिकनिक होते.
आकर्षण – टायगर पॉईंट, कार्ला लेणी, बुशी डॅम, टागगर्स लीप, लोणावळा तलाव
Best Waterfalls In India To Explore In India In Marathi
5. खंडाळा (Khandala)
लोणावळ्याच्या थोडं अलिकडे असणारं हेदेखील महाराष्ट्रातील एक थंड हवेचं ठिकाण आहे. मुंबईपासून जवळ असल्याने या ठिकाणी पटकन जाता येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं खंडाळा हे अतिशय सुंदर आहे. इथल्या नैसर्गिक सौंंदर्यामुळे असलेला थकवा सहज निघून जातो. तसंच इथलं वातावरण अतिशय सुंदर असल्यामुळे इथे रमायला वेळ लागत नाही.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, कँपिंग, ट्रेकिंग, हायकिंग, कामशेतजवळ पॅराग्लायडिंग
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा ट्रेननेही जाता येतं. त्याशिवाय बसनेही जाता येतं.
आकर्षण – लोहगड किल्ला, बेंडसे लेणी, कामशेत, विसापूर किल्ला, शूटिंग पाँईंट
6. अलिबाग (Alibaug)
अलिबाग हे प्रत्येक ऋतूमध्ये फिरायला जाण्याचं खरं तर ठिकाण आहे. पण पावसाळ्यात इथे जास्त मजा येते. महाराष्ट्रातील जास्त समुद्रकिनारे हे अलिबाग या ठिकाणी आहेत असं म्हटलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व समुद्रकिनारे स्वच्छ असून इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. समुद्रकिनाऱ्यावर वाहणारी हवा आणि पावसामध्ये भिजण्याचा आनंद काही वेगळाच. कोकणातील हा भाग पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतो. समुद्रप्रेमींसाठी ही जागा खूपच सुंदर आहे. मुळात अलिबागला लाँचने जायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही पटकन प्लॅन बनवून अगदी विकेंडलादेखील अलिबागला जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आधीपासून प्लॅन करत बसण्याची गरज भासत नाही.
कोणासाठी – इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी, समुद्रप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, कँपिंग, जेट स्काईंग, बनाना स्काईंग, हॉर्स राईड
कसं पोहचता येतं – गाडीने जाता येतं अथवा अलिबागपर्यंत एस.टी. ची देखील सोय आहे. पावसाळ्याशिवाय जायचं असल्यास, गेट वे ऑफ इंडियावरून बोटीने प्रवास करता येतो.
आकर्षण – कुलाबा फोर्ट, अलिबाग बीच, मुरुड बीच, खंदारी, रेवस बीच, नागाव बीच, बिर्ला मंदीर
7. माथेरान (Matheran)
मुंबईच्या जवळ दोन तासावर असूनही हे हिल स्टेशन अतिशय सुंदर आणि प्रदूषणमुक्त आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गाड्या जाऊ शकत नाहीत. एका ठराविक अंतरापर्यंतच गाड्या नेता येतात. नेरळवरून सुटणारी खास मिनी ट्रेन तुम्हाला इथपर्यंत पोहचवते. पण इथला निसर्ग, दऱ्या आणि डोंगर हे तुमचं मन मोहून टाकतात. मुळातच इथे अजिबात गरम होत नाही. त्यामुळे हे हिल स्टेशन सर्वांना हवंहवंसं वाटतं. इथे अनेक प्रकारचे पाँईंट्स आहेत. पण फिरायला इथे खूपच जागा आहे. त्यामुळे तुम्ही इथे मनसोक्त फिरू शकता. महाराष्ट्रातील हे एक अप्रतिम आणि पाहण्यासारखं ठिकाण आहे.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, कँपिंग, हनीमून पाँईंट ते लुईसा पाँईंट वॅली क्रॉसिंग, नेचर वॉकिंग, हॉर्स रायडिंग
कसं पोहचता येतं – नेरळपर्यंत मध्य रेल्वेने प्रवास करून नंतर मिनी ट्रेनने माथेरान. नेरळला उतरून शेअर टॅक्सीदेखील आहे. पण मिनी ट्रेनने जाण्यात जास्त मजा आहे. पावसाळ्यात ही बंद असते तेव्हा चालत चढतदेखील जाता येतं.
आकर्षण – पनोरमा पाँईंट, एको पाँईट, सनसेट पाँईंट, वन ट्री हिल पाँईंट, हनीमून हिल, अलेक्झांडर पाँईंट
वाचा – जाणून घेऊया महाराष्ट्रातील अशीच काही अज्ञात आणि अविस्मरणीय ठिकाणं
8. पाचगणी (Panchgani)
निसर्गाने नटलेलं पाचगणी हे सर्वांनाच प्रेमात पाडतं. डोंगरदऱ्या आणि कडेकपाऱ्यांनी नटलेलं हे पाचगणी बरेचदा आपण सर्वांनी चित्रपटातही पाहिलं असेल. महाराष्ट्रातील थंड प्रदेश म्हणून याचा उल्लेख केला जातो. हे पूर्णतः निसर्गाने नटलेलं आहे. इथे पर्यटकांची ये – जा देखील जास्त प्रमाणात असते. शिवाय इथली शांतता ही प्रत्येकालाच भावते.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, नेचर वॉकिंग, हॉर्स रायडिंग, हायकिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, हँडीक्राफ्ट शॉपिंग
कसं पोहचता येतं – बसने जाता येतं.
आकर्षण – सिडनी पाँईंट, एको पाँईट, सनसेट पाँईंट, केट्स पाँईंट, टेबल लँड, मॅप्रो फॅक्टरी, भिल्लार धबधबा, एलिफंट्स हेड पाँईंट
9. रत्नागिरी (Ratnagiri)
रत्नागिरीला अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. समुद्रकिनाऱ्यांनी नटलेली विविधं गावं इथे आहेत. शिवाय अनेक प्राचीन मंदिराचा इतिहासही या गावांना लाभला आहे. तर गड आणि किल्ल्यांनीही रत्नागिरी नटलेलं आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याने भारलेलं रत्नागिरी ही कोकणची शान मानलं जातं. कोकणातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक रत्नागिरी आहे. समुद्रकिनारा असूनही रत्नागिरीमध्ये जास्त उकाडा होत नाही. शिवाय अनेक आंब्याच्या बागा हेदेखील इथलं एक आकर्षण आहे.
कोणासाठी – निसर्गप्रेमी, समुद्रप्रेमी
काय करता येतं – साईटसीन, नेचर वॉकिंग, किल्ले बघणं
कसं पोहचता येतं – गाडी, एस. टी, अथवा बस हे पर्याय आहेत. लवकर पोहचायचं असल्यास ट्रेनने प्रवास करून तिथून हव्या त्या ठिकाणी रिक्षाने जाता येतं.
आकर्षण – पूर्णगड किल्ला, मरीन फिश म्युझियम, सूर्यनारायण मंदीर, महाकाली मंदीर, कडेलोट पाँईंट, लोकमान्य टिळकांचं घर, रत्नदुर्ग किल्ला, भाट्ये समुद्रकिनारा
वाचा – कोकण दर्शन माहिती मराठी
10. हरिहरेश्वर (Harihareshwar)
चिंचोळे रस्ते, अजूनही शहरीकरण न झालेलं हरिहरेश्वर गाव आणि समुद्राची कानी पडणारी गाज. या गावात पोचताच इथलं साधेपणा तुम्हाला आपलासा वाटू लागतो. तसंही मुंबईकरांना गर्दीतून सुटका हवी असतेच. आता प्रत्येक घरात या सुट्ट्यांमध्ये कुठे जायचं याचं प्लॅनिंग झालं असेल किंवा सुरू असेल. दरवर्षी कुटुंबाला एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला नेणं जरा कठीणच आणि रिसोर्ट्स पिकनिक्सचाही कंटाळा आला असेल तर हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्यायला हवी.
कोणासाठी – निसर्गप्रेमी, समुद्रप्रेमी
काय करता येतं – साईटसीन,नेचर वॉकिंग, देवळांना भेट
कसं पोहचता येतं – हरिहरेश्वर हे मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव आहे. जे इथून जवळपास 60km अंतरावर आहे. एसटीच्या अनेक बसेस हरिहरेश्वरला जातात. तसंच तुम्ही खाजगी वाहनानेही इथे पोचू शकता. हरिहरेश्वरमध्ये अजून जास्त हॉटेल्स नाहीत पण तुम्ही होम स्टेचा ऑप्शन घेऊ शकता. जो चांगला आणि स्वस्तही आहे. एमटीडीसीची इकडे कॉटेजेस आहेत. हरिहरेश्वराला कधीही वर्षभरात कधीही भेट देऊ शकता पण जास्त उन्हाळा असल्यास मात्र टाळा.
आकर्षण – काळभैरव मंदीर, हरिहरेश्वर समुद्रकिनारा, बागमंडला
11. माळशेज घाट (Malshej Ghat)
‘घाटातली वाट वाट काय तिचा थाट’ ही कविता सर्वांनाच परिचयाची असेल. माळशेज घाट पाहिल्यानंतर ही कविता आठवल्याशिवाय राहात नाही. धबधब्यांनी सजलेला हा घाट पावसाळ्यात तर महाराष्ट्रातील फिरत्या ठिकाणांची एक शानच होऊन जातो. पाऊस आला आणि माळशेज घाटात गेलं नाही तर पावसाळा पूर्णच होत नाही. डोंगरदऱ्यांनी सजलेला हा घाट म्हणजे निसर्गाचा एक आविष्कारच आहे.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – साईटसीन,नेचर वॉकिंग, हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग,
कसं पोहचता येतं – कल्याण रेल्वेस्टेशनवरून बस अथवा रिक्षा, स्वतःच्या गाडीने
आकर्षण – अजूबा हिल फोर्ट, हरिश्चंद्रगड, माळशेज धबधबा, पिंपळगाव जोगळ धरण
12. महाबळेश्वर (Mahabaleshwar)
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण आहे. बरेच लोक उन्हाळ्यात या ठिकाणी फिरायला जातात. इथे अनेक पाँईंट्स असल्यामुळे आणि इथलं वातावरण अप्रतिम असल्यामुळे इथे गेल्यावर मन मोहून जातं. निसर्गाने नटलेलं महाबळेश्वर हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे.
कोणासाठी – निसर्गप्रेमी
काय करता येतं – साईटसीन,नेचर वॉकिंग, विल्सन पाँईंटवरील मॅजिकल सनराईज, रॉक क्लायबिंग, हॉर्स रायडिंग, बोटिंग, ट्रेकिंग
कसं पोहचता येतं – बस अथवा स्वतःच्या गाडीने
आकर्षण – महाबळेश्वर मंदीर, पंचगंगा, वेण्णा तलाव, मोरारजी कॅसल, प्रतापगड, मॅप्रो गार्डन, लिंगमाला धबधबा, लॉडविक पाँईंट, तपोला
काय काळजी घ्यायची (How To Care While Travelling)
- आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत या ठिकाणाची व्यवस्थित माहिती घ्यावी. आपल्या आधी जर कोणी या ठिकाणी जाऊन आलं असेल तर त्यांच्याकडून इत्यंभूत माहिती घ्यावी
- प्रवासाला जाताना तुम्हाला काय काय वस्तू हव्या आहेत ते ठरवून घ्या. आपल्या बॅग्जचं वजन आपल्यालाच सांभाळावं लागणार आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे तुम्ही सामान भरा
- प्रवासासाठी बस अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असल्यास, योग्य ऑथॉरिटीकडून पडताळून घ्यावं. स्वतःचं वाहन असल्यास, गाडीचं योग्य सर्व्हिसिंग झालं आहे की नाही हेदेखील नीट पडताळून घ्यावं
- निघण्यापासून परतीच्या प्रवासाचं वेळापत्रक आपल्याव्यक्तिरिक्त अजून एका विश्वासू व्यक्तीकडे देऊन ठेवावं. आपल्याकडून काहीही गहाळ झाल्यास, फजिती होणार नाही.
अशी करा केरळची तयारी (A Handy Guide To Kerala Tourism In Marathi)
कोणत्या गोष्टी कायम बरोबर असव्यात?
फिरायला जाताना काही गोष्टी कायम आपल्याबरोबर असणं आवश्यक आहे. पाहूया काय आहेत या गोष्टी –
- प्रवास करताना पुरेल इतकं पाणी आणि खाद्यपदार्थ
- औषधं आणि फर्स्ट एड बॉक्स
- खाली बसण्यासाठी आणि कचरा गोळा करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रं
- फिरताना काही लागल्यास, पटकन उपाय म्हणून हळदही कायम जवळ ठेवा
- पिशव्या (प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे त्यामुळे कापडी पिशव्या जवळ ठेवा)
प्रश्न – उत्तर
1. या ठिकाणी जायचा काही विशिष्ट काळ असतो का?
काही ठिकाणी जाण्यासाठी विशिष्ट महिने नक्कीच असतात. पण संपूर्ण वर्षभरात तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात कधीही जाऊ शकता. पण यापैकी काही ठिकाणी पावसाळ्यात तर काही ठिकाणी उन्हाळ्यात जाण्यासाठी प्राधान्य द्यायला हवं. उदा. महाबळेश्वर, पाचगणी – उन्हाळा तर माळशेज घाट, आंबोली – पावसाळा
2. यापैकी कोणत्या ठिकाणी एका दिवसात जाऊन येऊ शकतो?
मुंबई आणि पुण्यावरून काही ठिकाणी तुम्ही एका दिवसात जाऊन येऊ शकता. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट ही त्यापैकी ठिकाणं आहेत. पण तुम्हाला मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर वेळ काढून महाराष्ट्रातील या ठिकाणी तुम्ही जा.
3. महाराष्ट्रात ट्रीप कशी आखावी?
महाराष्ट्रात ट्रीप आखणं खूप सोपं आहे. कारण महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी बस आणि रिक्षाची सोय असून तुमच्या स्वतःची गाडी या ठिकाणापर्यंत पोहचण्याचीही सोय उत्तम आहे. शिवाय खर्चाच्या दृष्टीनेही ही ठिकाणं खिशाला परवड्याजोगी आहेत.
मग एक मे ला सुट्टी लागली की, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्या आणि वरील ठिकाणी सहलीसाठी लगेच निघा.
हेदेखील वाचा –
पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं
Weekend Gateway : शांत आणि नयनरम्य हरिहरेश्वर
मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं