गुडीपाडवा अर्थात मराठी नववर्ष… महाराष्ट्रात नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागतयात्रा काढण्यात येते. पारंपरिक पद्धतीने नटून-थटून नववर्षाचं स्वागत करून गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने पेहराव करण्यासाठी महिला नऊवारी साडी आणि मोत्याची नथ आवर्जून घालतात. वास्तविक नथ हा पेशवाई संस्कृतीतील नटलेला एक अजरामर दागिना आहे. कारण प्राचीन काळापासून ते आजतागायत या दागिन्याचा नखरा मुळीच कमी झालेला नाही. महाराष्ट्रीयन नथींमध्ये पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, कारवारी नथ, बानू नथ असे विविध अनेक प्रकार आहेत. वास्तविक नाकात घाल्यासाठी चमकी, नथनी असे अनेक विविध दागिने आहेत. मात्र या सर्व नासिकाभूषणांमध्ये उठून दिसते ती नथच. नथीमुळे स्त्रीच्या मुळ सौंदर्यांमध्ये अधिकच भर पडते. नथ घालून नाक मुरडून दाखविण्यात एक वेगळीच मौज असते.
नथ एक पारंपरिक दागिना
पिवळेधम्मक मोती आणि लाल, हिरव्या आणि पांढऱ्या हिऱ्यांनी गुंफलेला एक अप्रतिम दागिना म्हणजे नथ. मात्र काळानुरूप नथीचे आकार आणि प्रकार यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या आकाराच्या आणि जड वजनाच्या नथी वापरल्या जायच्या. अनेकांच्या आजींची आठवण म्हणून या प्रकारच्या नथी जपून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र सोयीनुसार आता वापरण्यात येणाऱ्या नथींचा आकार नाकाला पेलवेल एवढ्या लहान आकाराचा झाला आहे. शिवाय आजकाल मोत्याऐवजी नुसत्या सोन्याच्या, हिऱ्यांच्या आणि चांदीच्या नथीदेखील उपलब्ध झाल्या आहेत. अमेरिकन आणि खऱ्या हिऱ्यांच्या नथीबाबत एकप्रकारचं आकर्षण महिलांमध्ये निर्माण होत आहे. काही ब्रॅंडनी बाजारात आणलेल्या चांदीच्या नथींना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नाकात नथ घालण्यासाठी नाक टोचणं गरजेचं असलं तरी आजकाल उपलब्ध असलेल्या प्रेसच्या नथींमुळे तुम्ही नाक न टोचतादेखील नथ घालण्याचा आनंद घेऊ शकता.
सेलिब्रेटीजनां देखील महाराष्ट्रीयन नथीचं वेड
बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये नथीचा फॅशन म्हणून अथवा भूमिकेची गरज म्हणून वापर केला आहे. बाजीराव मस्तानीमधील काशीबाई साकारण्यासाठी प्रियांका चोप्राने जी नथ घातली होती ती नथ नंतर फार लोकप्रिय झाली. मणिकर्णिकामध्ये कंगनाने वापलेली नथीमुळे देखील तिच्या रूपात आणखी भर पडली होती. शिवाय अनेक हिंदी गाण्यांमध्येदेखील अभिनेत्रींनी नथ घालून आयटम सॉंग्ज केले आहेत. चित्रपटातील नथीच्या क्रेझमुळे आता तर नऊवारी न घालता अगदी वेस्टर्न आऊटफीटवर नथ घालून मिरविण्याची फॅशन आली आहे. अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रींनी पारंपरिक नथी घातल्या आहेत. जय मल्हार मालिकेतून बानूची नथ प्रसिद्ध झाली. मराठी सिनेसृष्टीत तर ‘उंच माझा झोका’ मालिका असो अथवा नुकताच प्रदर्शित झालेला ‘आनंदीगोपाळ’ हा चित्रपट असो यांच्या प्रमोशनसाठी नथीचा वापर केला गेला होता. मराठी अभिमान, 132 वर्षांपूर्वीचा इतिहास असे हॅशटॅग आनंदीगोपाळ चित्रपटाच्या पोस्टसाठी वापरण्यात आले होते. शिवाय महाराष्ट्रीन निरनिराळ्या प्रकारच्या नथी घालून मराठी अभिनेत्रींनी आनंदीबाईंना मानवंदना दिली होती. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर,प्रिया बापट,सोनाली कुलकर्णी, प्रियांका बर्वे, दिप्ती देवी, आनंदी जोशी, स्पृहावरद, तेजश्री प्रधान, मृण्मयी देशपांडे, मनवा नाईक, स्नेहलता वसईकर या मराठी अभिनेत्रींनी आपआपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नथ घालून व्हिडिओ शेअर केले होते.
देखील वाचा –
मालिकांमुळे प्रसिद्ध झाल्या मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन्स
ज्वेलरी ट्रेंड 2019: सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी
Happy Gudi Padwa Wishes & SMS In Marathi
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम