Advertisement

Recipes

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)

Dipali NaphadeDipali Naphade  |  Nov 11, 2019
झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)

Advertisement

 

सकाळी उठल्यानंतर कडकडून भूक लागलेली असते आणि रोजचा प्रश्न असतो तो म्हणजे आजचा नाश्ता काय? तेच तेच पोहे आणि उपमा, डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरच्या घरी अगदी कितीही घाई असली तरीही पटकन असा नाश्ता बनवू शकता. सध्या आपण सगळेच घरी आहोत आणि त्यामुळे घरातून काम करत असलो तरीही सकाळचा नाश्ता (zatpat nashta in marathi) करणं हे आवश्यकच आहे. तोदेखील चविष्ट आणि तुमच्या आरोग्यासाठी उपयोगी असेल असा नाश्ता. सकाळी उठल्यानंतर नेहमी हेल्दी खावं असं सांगण्यात येतं. तसंच भरपेट नाश्ता केला तर दिवसभर तुम्ही उत्साही राहाता. ऑफिसला जातााना आपल्याकडे इतकी धावपळ असते की, सर्व साग्रसंगीत करायला वेळ नसतो मग अशावेळी कधीतरी केवळ ब्रेड बटर अथवा चहा, कॉफी आणि टोस्ट अशा प्रकारचा नाश्ता करून लोक घराबाहेर पडणं पसंत करतात. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे (coronavirus 2019) आपण सगळेच घरी आहोत. पण तरीही घरातून काम करत असल्यामुळे वेळ वाचवणंही आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशा झटपट नाश्ता रेसिपी (easy breakfast recipes in marathi) सांगणार आहोत. ज्या पटकन होतील. तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वही मिळतील आणि तुमचं पोटही भरेल. त्याशिवाय तुम्हाला स्वतःलादेखील या रेसिपी बनवून घेता येतील. नाष्टा पदार्थ अनेक असतात. पण गुगल सर्च करतानाही नाष्टा रेसिपी मराठी मध्ये आपण शोधतो. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ इथे देत आहोत जे घरात पटकन बनतात. चला तर मग वाट कसली बघताय? हे वाचून रोज करा वेगवेगळा नाश्ता. 

तांदळाची उकड (Tandalachi Ukad Recipe)

तांदळाची उकड - Tandalachi Ukad

Instagram

 

बऱ्याच जणांना हा प्रकार माहीत नाही. पण हा आंबटतिखट प्रकार सकाळी खाल्ल्याने पोट व्यवस्थित भरलेलं राहतं आणि तुमच्या जीभेवर चांगली चवदेखील तरळत राहाते. शिवाय हे पटकन तयार होतं आणि हे करत असताना तुम्ही तुमची इतर कामही बाजूला करू शकता. 

साहित्य – 

 • 2 ग्लास ताक
 • 2 मोठे चमचे तांदूळ पीठ
 • 2 हिरव्या मिरच्या
 • कोथिंबीर
 • चवीनुसार मीठ
 • 2-3 लसूण पाकळ्या 
 • थोडंसं किसलेलं आलं 
 • चिमूठभर साखर
 • फोडणी
 • तेल

उकड बनवण्याची पद्धत – 

Step 1: आलं – लसूण पाकळ्या आणि मिरच्या एकत्र ठेचून घ्या. 

Step 2: ताकामध्ये हे घाला. 

Step 3: त्यामध्ये मीठ, साखर आणि तांदूळ पीठ घालून नीट मिक्स करून घ्या.  

Step 4: हे मिश्रण जास्त घट्ट अथवा जास्त पातळ ठेवू नका. दुसऱ्या कढईत एक चमचा तेल घाला. 

Step 5: त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी द्या. 

Step 6: लगेच वरून हे तयार मिश्रण ओता आणि ढवळून झाकून ठेवा. 

Step 7: एक कड काढून त्यात कोथिंबीर घाला. थोडं पातळ आणि घट्ट असं हे मिश्रण ठेवा. 

Step 8: त्यानंतर शिजल्यावर काढून डिशमधून खायला घ्या.  

Step 9: खाताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा याबरोबर वरून कच्चं तेल घातल्यास, त्याची चव अधिक चांगली लागते. 

वाचा – रवा कसा वापरावा (How To Use Semolina In Marathi)

फोडणीचा पाव अथवा ब्रेड (Phodni Pav Recipe)

फोडणीचा ब्रेड आणि पाव

Instagram

 

ब्रेड अथवा पाव नुसता सकाळी नाश्त्याला खाण्यापेक्षा तुम्ही त्याला फोडणी देऊन खाल्लंत तर अधिक चांगली चव येते. शिवाय यामध्ये तुम्हाला हवे तसे हेल्दी पदार्थ तुम्ही घालू शकता. 

साहित्य – 

 • ब्रेड अथवा पाव (तुमच्या अंदाजाप्रमाणे)
 • तेल
 • कांदा
 • फोडणीचं साहित्य
 • चवीनुसार मीठ
 • मिरची
 • कोथिंबीर

फोडणीचा पाव बनवण्याची पद्धत – 

Step 1: ब्रेड अथवा पाव व्यवस्थित कुस्करून घ्या

Step 2: मीठ त्यावरच तुमच्या अंदाजानुसार घाला. 

Step 3: मिरचीचे तुकडे करून घ्या. 

Step 4: एका कढईत तेल ओता. 

Step 5: त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कडिपत्ता घाला, त्यात चिरलेला कांदा आणि मिरच्यांचे तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्या.  

Step 6: कांदा शिजत आल्यावर वरून ब्रेड अथवा पावाचा चुरा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. 

Step 7: चिरलेली कोथिंबीर वरून पेरा आणि एक वाफ काढून गरमगरम ब्रेड वा पाव सॉसबरोबर खायला द्या. 

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

मटर चाट (Matar Chaat Recipe)

मटर चाट - Matar Chaat Recipe

Instagram

 

सकाळी अथवा संध्याकाळी नाश्त्यासाठी मटर चाटसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. तेसुद्धा अशावेळी जेव्हा तुमच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. पटापट तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. हे चाट सगळयांनाच आवडतं. 

साहित्य – 

 • वाटाणे (रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा)
 • बटाटे (उकडवून घ्या)
 • कापलेला बारीक कांदा
 • कोथिंबीर
 • चवीनुसार मीठ
 • जीरे पावडर
 • धने पावडर
 • तिखट
 • लिंबू

मटर चाट बनवण्याची पद्धत

Step 1: रात्रभर पाण्यात वाटाणे भिजवून ठेवा. 

Step 2: नंतर बटाटे आणि वाटाणे वेगवेगळ्या भांड्यात ठेवून कुकरमध्ये शिजवून घ्या. बाहेर काढल्यावर व्यवस्थित बटाटे कुस्करून घ्या. 

Step 3: वाटाणे शिजवताना त्यात पाणी, हिंग आणि थोडंसं मीठ घालायला विसरू नका

Step 4: त्यानंतर वाटाणे आणि बटाटे मिक्स करा. 

Step 5: त्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, तिखट, लिंबाचा रस, धने आणि जिरे पावडर अथवा चाट मसाला घाला. 
हवं असल्यास, पापडाचा चुरा आणि गोड अथवा तिखट चटणीदेखील तुम्ही मिक्स करू शकता. याची अप्रतिम चव लागते.

वाचा – मालवणी मसाला वापरून तयार करा या रेसिपीज

व्हेज मेयो सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe)

व्हेज मेयो सँडविच

Instagram

 

या सँडविचसाठी आपण बरेच पैसे मोजतो. पण हे बनवायला अतिशय सोपं आहे आणि नाश्त्याला खाल्ल्यानंतर जास्त  भूक लागत नाही. याची रेसिपीदेखील क्विक आहे.  

साहित्य – 

 • ब्रेड
 • मेयो सॉस 
 • कांदा, टॉमेटो, काकडी, गाजर
 • काळी मिरी पावडर
 • चवीनुसार मीठ
 • केचअप

मेयो सँडविच बनवण्याची पद्धत – 

Step 1: एका बाऊलमध्ये मेयो सॉस काढून घ्या.  

Step 2: त्यात कापलेला कांदा, टॉमेटा, काकडी, गाजर हे सगळं मिक्स करा. 

Step 3: त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि हवं असल्यास, चाट मसाला घाला. 

Step 4: हे नीट मिक्स करून घ्या. 

Step 5: आता ब्रेडचे काप घ्या. त्याच्या कडा काढून टाका. 

Step 6 : नंतर वरील मिश्रण त्या स्लाईसवर नीट लावा. दुसरा ब्रेड त्यावर ठेवा. 

Step 7: दोन्ही बाजूने ब्रेडला बटर लावा आणि मग मायक्रोवेव्हमध्ये ग्रील करा अथवा तव्यावर दोन्ही बाजूने नीट भाजून घ्या आणि केचअपबरोबर खायला घ्या. 

वाचा – झटपट आणि पौष्टिक सँडविच रेसिपीज (Easy Sandwich Recipes In Marathi)

शेवयांचा उपमा (Vermicelli Upma Recipe)

शेवयांचा उपमा - Vermicelli Upma

Instagram

 

शेवयांचा उपमा हा अतिशय चविष्ट आणि हेल्दी नाश्ता आहे. तुम्हाला हा बनवणंदेखील अतिशय सोपं आहे. तसंच अगदी कमी वेळात हा नाश्ता तयार होतो. त्यासाठी जास्त वेळ घालवण्याची गरज भासत नाही. 

साहित्य – 

 • शेवया 
 • कांदा, टॉमेटो, सिमला मिरची, वाटाणे, फरसबी, गाजर
 • कोथिंबीर
 • मिरची
 • चवीनुसार मीठ
 • फोडणीचं साहित्य

शेवयांचा उपमा बनवण्याची पद्धत

Step 1: एका भांड्यात पाणी घेऊन उकळवायला ठेवा. 

Step 2: त्यात चार थेंब तेल घाला आणि शेवया शिजवायला ठेवा. पाणी उकळलं अर्थात शेवया शिजल्या की पाणी काढून टाका.  

Step 3: नंतर दुसऱ्या कढईत तेल घ्या. 

Step 4: त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची घाला आणि मग कापलेला कांदा परतावा. मग तुम्हाला हव्या त्या भाज्या त्यामध्ये कापून घाला. 

Step 5: वरून शेवया घाला. नीट मिक्स करून घ्या. त्यात थोडं पाणी घालून नीट शिजवून घ्या. 

Step 6: वरून मीठ आणि कोथिंबीर घाला. तुमचा उपमा तयार.

आप्पेपात्रात अगदी कमी तेलात बनवा असे स्वादिष्ट ‘बटाटेवडे’

इन्स्टंट रवा डोसा (Instant Rawa Dosa Recipe)

रवा डोसा - Instant Rawa Dosa

Shutterstock

 

रवा डोसा घरात बनवणं तसं तर अगदीच सोपं आहे. रवा भिजवून ठेवायचा असं तुम्हाला वाटत असेल तर तसं  करायची गरज नाही. तुम्ही अगदी दहा मिनिट्समध्ये रवा डोसा करू शकाता. इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी काय करायचं बघूया. रव्यापासून अनेक पदार्थ तयार होतात. त्यापैकीच एक म्हणजे रवा डोसा. 

साहित्य 

 • 1 कप बारीक रवा 
 • 2 ½ कप पाणी 
 • 2 चमचे तांदळाचे पीठ 
 • चवीनुसार मीठ 
 • कोथिंबीर
 • दही अथवा लिंबाचा रस 
 • हिरव्या मिरचीचे तुकडे
 • हवे असल्यास, जिरे
 • बटर 
 • तेल 

इन्स्टंट रवा डोसा बनवण्याची पद्धत 

Step 1: एका बाऊलमध्ये बारीक रवा घ्या.  

Step 2: त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. त्यात पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर चिरून घाला.

Step 3: दही अथवा लिंबाचा रस जे काही तुम्ही घेतले असेल ते मिक्स करा. मात्र दही अथवा लिंबाचा रस दोन लहान चमच्यांपेक्षा अधिक घालू नका. 

Step 4: मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे हे सर्व त्यात मिक्स करून व्यवस्थित ढवळा. रवा पटकन तळाशी बसतो.  त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. 

Step 5: पॅन गरम करा. डोसा करताना नेहमी काठ नसलेला पॅन वापरावा.  जेणेकरून डोसा काढणे सहज शक्य होते. मंद आचेवर गॅस ठेवा. अन्यथा डोसा जळण्याची शक्यता असते. 

Step 6: बॅटर पॅनवर टाकण्यापूर्वी ढवळून मगच टाकावे. हे बॅटर बऱ्यापैकी पातळसर असायला हवे. तरच त्याला व्यवस्थित जाळी येईल आणि पॅनवरूनही पटकन उकटेल. 

Step 7: पॅनवर आधी तेल लावा आणि मग हे बॅटर टाका. ते टाकल्यानंतर व्यवस्थित शिजू द्या. डोशाची वरची बाजू परवायची नाही हे नेहमी लक्षात ठेवा. खाली डोसा ब्राऊन व्हायला लागल्यानंतर तो व्यवस्थित उकटत आहे की नाही हे एकदा पाहा. 

Step 8: बाजूने तेल आणि बटर सोडा. त्यामुळे त्याला मस्त कुरकुरीतपणा येईल. हा व्यवस्थित शिजला की, चटणी अथवा सॉसबरोबर कुरकुरीत डोसा खायला द्या.  

वाचा – Pasta Recipe in Marathi

मिक्स पराठा (Mix Paratha Recipe)

मिक्स पराठा

Shutterstock

 

घरात बऱ्याचदा आदल्या दिवशीची भाजी, आमटी आणि भात उरलेला असतो मग अशावेळी तो नुसता खायला कंटाळा येतो.  पण तुम्ही हे सर्व मिक्स करून मिक्स पराठा करू शकता. त्यामध्ये शिळं अन्न आहे हे कळणारही नाही आणि पटकन तयार होईल. 

साहित्य 

 • उरलेली भाजी
 • उरलेला भात
 • उरलेली आमटी
 • गव्हाचे पीठ 
 • तांदळाचे पीठ
 • चवीपुरतं मीठ
 • जिरे
 • ओवा
 • हळद
 • तिखट
 • बटर

मिक्स पराठा बनवण्याची पद्धत 

Step 1: वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या. 

Step 2: यामध्ये पाण्याची गरज भासत नाही कारण तुम्हाला त्यात आमटी आणि भातामुळे आधीच नरमपणा आलेला असतो. 

Step 3: व्यवस्थित भिजवून घ्या आणि त्याला तेल लावून दोन मिनिट्स ठेवा. 

Step 4: पोळीप्रमाणे लाटा. तव्यावर बटर सोडून त्यावर हा पराठा भाजा आणि गरमागरम सॉस  आणि चटणीसह खायला द्या. यासाठी केवळ 10 मिनिट्स लागतात. 

दुधीचे थालिपीठ (Dudhi Thalipeeth Recipe)

दुधीचे थालिपीठ - Dudhi Thalipeeth

Instagram

 

दुधीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही.  पण तुम्ही दुधीचे थालिपीठ नाश्त्याला करून तुम्ही हेल्दी नाश्ता बनवू शकता. शिवाय हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो. त्यासाठी तुम्हाला जास्त त्रास घ्यायची गरज भासत नाही. 

साहित्य 

 • किसलेला दुधी 
 • ठेचलेली मिरची
 • जिरे
 • तांदूळ पीठ
 • बटर
 • ठेचलेली लसूण आणि आलं पेस्ट
 • चवीपुरते मीठ

दुधीचे थालिपीठ बनवण्याची पद्धत

Step 1: किसलेल्या दुधीमधून पाणी काढून घ्या. 

Step 2: त्यात तांदूळ पीठ, मीठ, जिरे, मिरची, आलं, लसूण पेस्ट मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्या. 

Step 3: त्यावर तेल लावून नीट पीठ तयार करा. त्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर गोळे बनवून थालिपीठीप्रमाणे थापा. 

Step 4: तव्यावर बटर सोडून थालिपीठ भाजा. तुम्हाला हवं असल्यास, बटरच्या जागी तेलाचाही वापर करता येऊ शकतो. पण बटर असेल तर त्याची चव अधिक चांगली लागते. 

मसाला पोळी (Masala Poli Recipe)

मसाला पोळी

Instagram

 

शिळी पोळी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही. पण बऱ्याचदा घरी शिळी पोळी उरल्यावर सकाळच्या नाश्त्याला चहा अथवा कॉफीबरोबर पोळी खावी लागते. मग नुसती पोळी खाण्यापेक्षा आपण मसाला पोळी करून खाऊ शकतो. 

साहित्य 

 • शिळी पोळी
 • कापलेला कांदा आणि टॉमेटो
 • चिरलेली कोथिंबीर
 • तिखट
 • चाट मसाला
 • चवीपुरते मीठ
 • लिंबू 
 • बटर

मसाला पोळी बनवण्याची पद्धत

Step 1: चिरलेला कांदा, टॉमेटो,  कोथिंबीर एकत्र करा. 

Step 2: त्यावर चाट पावडर, मीठ आणि तिखट करून नीट मिक्स करून एकत्र करून घ्या.

Step 3: शिळी पोळी तुम्ही तव्यावर बटर सोडून थोडी पापडाप्रमाणे कडक भाजून घ्या. जळू देऊ नका. 

Step 4: ती खाली उतरवल्यावर वर तयार केलेले मिश्रण त्यावर घाला आणि मस्तपैकी गरमागरम चहा अथवा कॉफीच्या घोटासह तुम्ही मसाला पोळीची चव घ्या.

व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe)

व्हेज कटलेट

Shutterstock

 

सकाळी तसं तर थोडं तेलकट खाणं टाळायलाच हवं पण जर शॅलो फ्राय असलेले चविष्ट व्हेज कटलेट असेल तर मग त्याची गरज भासत नाही. तुम्ही सकाळी पटकन हे बनवू शकता. 

साहित्य 

 • उकडलेले बटाटे
 • उकडलेली फरसबी आणि गाजर
 • तिखट
 • पातळ पोहे
 • गरम मसाला अथवा छोले मसाला
 • बारीक रवा 
 • मीठ
 • तेल

व्हेज कटलेट बनवण्याची पद्धत

Step 1: बटाटे उकडून ते मॅश करून घ्या. 

Step 2: त्यात उकडलेले गाजर आणि फरसबी घाला. 

Step 3: त्यावर पातळ पोहे,  तिखट, गरम मसाला अथवा छोले मसाला, मीठ घालून सर्व मिक्स करा. 

Step 4: गोळे बनवा तुम्हाला त्याचा हवा तसा आकार द्या आणि शॅलो फ्राय करा. 

Step 5: गरमागरम कटलेट सॉस आणि चटणीसह खायला द्या. 

वाचा – स्मूदी बनविण्यासाठी कशाचा उपयोग करावा

आप्पे अर्थात पानीयरम (Appe Recipe In Marathi)

आप्पे अर्थात पानीयरम

Shutterstock

 

आप्पे हा आपल्याकडील अतिशय प्रिय नाश्ता आहे. आप्पेपात्रातील गरम गरम आप्पे चटणीबरोबर खायला खूपच मजा येते.  पण बऱ्याचदा हे बनवणं कठीण वाटतं. पण हे सोपं आहे. 

साहित्य

 • जाड रवा
 • ताक
 • मीठ 
 • जिरे
 • ठेचलेल्या मिरच्या
 • आल्याची पेस्ट
 • चिरलेला कढीपत्ता
 • तेल
 • हवा असल्यास चिरलेला कांदा 

आप्पे बनवण्याची पद्धत

Step 1: रवा आणि ताक तासभर एकत्र भिजवून ठेवा.  

Step 2: त्यात जिरे, मिरची, कढीपत्ता, आल्याची पेस्ट, कांदा, मीठ सर्व मिक्स करून घ्या. तुम्हाला हवा असल्यास, अगदी चिमूटभर सोडा मिक्स करा. 

Step 3: आप्पेपात्र गरम करत ठेवा. 

Step 4: त्यावर तेल सोडा आणि चमच्याने हे मिश्रण थोडे थोडे त्यात घाला. 

Step 5: साधारण दोन ते तीन मिनिट्स झाल्यावर बाजू बदला  आणि शिजू द्या. काट्याने दुसरी बाजू पलटून शिजू द्या. तयार झालेले आप्पे नारळाच्या चटणीसह खायला द्या. 

इन्स्टंट रवा उत्तप्पा (Instant Rawa Uttapam Recipe)

इन्स्टंट रवा उत्तप्पा

Shutterstock

 

सकाळी झटपट तयार होणारा असा हा नाश्ता म्हणजे इन्स्टंट रवा उत्तप्पा. यामुळे पोटंही भरतं आणि हेल्दी नाश्ता केल्याचं समाधानही मिळतं. 

साहित्य 

 • रवा 
 • आंबट दही
 • बारीक कापलेला कांदा, टॉमेटो, भोपळी मिरची
 • चिरलेली मिरची
 • मीठ
 • आलं लसूण पेस्ट
 • कोथिंबीर

इन्स्टंट रवा उत्तप्पा बनवण्याची पद्धत

Step 1: सकाळीच लवकर उठून रवा आणि आंबट दही मिक्स करून ठेऊन द्या. 

Step 2: त्यानंतर सकाळी नाश्ता करण्याच्या वेळी त्यामध्ये चिरलेला कांदा, टॉमेटो, भोपळी मिरची, चिरलेली मिरची, मीठ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्या. 

Step 3: यात एक चमचा तेल घाला. यात थोडंसं पाणी घाला. त्यानंतर तव्यावर तेल सोडून उत्तप्पा बनवून घ्या. 

बेसन चिला अर्थात बेसन पोळा (Besan Chilla Recipe)

बेसन चिला अर्थात बेसन पोळा

Shutterstock

 

सर्वात सोपी आणि सकाळी व्यवस्थित पोट भरणारी अशी ही झटपट नाश्ता रेसिपी आहे. बेसनचा पोळा अर्थात चिला आपण नेहमीच घरी करतो. कसा झटपट बनवायचा बघूया

साहित्य

 • बेसन
 • ओवा
 • लाल तिखट
 • काळी मिरी पावडर
 • धने पावडर
 • हळद
 • मीठ
 • चिरलेला कांदा,  टॉमेटो, मिरची
 • कोथिंबीर
 • पाणी 
 • तेल

बेसन चिला अर्थात पोळा बनवण्याची पद्धत

Step 1: वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठात गुठळी राहणार नाही अशा तऱ्हेने पाण्याचा वापर करून भिजवून घ्या. 

Step 2: अति जाड अथवा अति पातळ भिजवू नका.  

Step 3: तव्यावर तेल सोडून त्यावर हे मिश्रण घाला आणि वरून झाकण ठेवून शिजू द्या. गरमागरम चिला तयार. सॉसबरोबर खायला द्या. 

ब्रेड उपमा (Bread Upma Recipe)

ब्रेड उपमा

Instagram

 

फोडणीचा ब्रेड अथवा उपमा आपण दोन्ही खाल्लं आहे. पण तुम्ही कधी ब्रेड उपमा बनवला आहे का? नुसता ब्रेड खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही घरच्या घरी ब्रेड उपमा पण ट्राय करकू शकता. हा नाश्ता झटपट बनतो. 

साहित्य

 • ब्रेड स्लाईस
 • चिरलेला कांदा, टॉमेटो, मिरची
 • कढीपत्ता
 • हळद
 • मीठ
 • जिरे
 • मोहरी 

ब्रेड उपमा बनवण्याची पद्धत 

Step 1: ब्रेडचे तुकडे करून घ्या. 

Step 2: तेल तापवा त्यात फोडणीासाठी जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता घाला. 

Step 3: त्यात चिरलेला कांदा, टॉमेटो,  हळद, मिरची सर्व घाला. 

Step 4: मिक्स करा. शिजल्यावर त्यात मीठ घाला. 

Step 5: नंतर त्यावर ब्रेड घाला आणि मिक्स करून घ्या तुमचा उपमा तयार. 

कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

पोहे (Poha Recipe)

पोहे - Poha

Shutterstock

 

पोहे तर सर्वच करतात. पण तुम्हाला फडफडीत पोहे नको असतील तर ते व्यवस्थित करणे गरजेचे असते.  पोहे हा सर्वात लवकर बनणारा असणारा झटपट नाश्ता आहे. 

साहित्य 

 • जाडे पोहे
 • ओलं खोबरं
 • कोथिंबीर
 • मिरची
 • जिरे
 • मोहरी
 • हिंग
 • हळद
 • लिंबू
 • मीठ
 • पाणी 

पोहे बनवण्याची पद्धत 

Step 1: पोह्यांसाठी फोडणीचे साहित्य एकत्र केल्यानंतर फोडणी घालण्याचा अगदी 2 ते 5 मिनिटं आधी तुम्ही पोहे भिजवा. अनेक जण पोहे तसेच भिजत ठेवतात. त्यामुळे त्यांचे पोहे पाणचट होतात. त्यामुळे पहिली महत्वाची टिप अशी की, पोहे जास्त वेळ आणि खूप पाण्यात भिजवू नका.  

Step 2: पोहे भिजल्यानंतर ते छान गाळून त्यातील पाणी काढून बाजूला मोकळे करुन ठेवा. म्हणजे पोह्यांचा गोळा होत नाही. त्यातच तुम्ही हळद घातली तर ती पोह्यांना चांगली लागते. फोडणीसाठी तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये कडिपत्त्याची पानं, मोहरी, मिरची, कांदा घाला.

Step 3: फोडणी करपू न देता त्यामध्ये हळद घातलेले भिजवलेले पोहे घाला.जर तुम्ही कांदा घालत नसाल तरी ठिक आहे. कांदा घालणार असाल तर तो पारदर्शक होईपर्यंतच परता. त्यानंतर पोहे घाला. पोहे फोडणीत परतून त्यात मीठ घाला. 

Step 4: पाण्याचा हबका देऊन त्यावर थोडी साखर पेरा. आणि गॅस मंद करुन पोहे साधारण 3 ते 4 मिनिटं शिजू दया. पाण्याचा हबका मारल्याने आणि साखर घातल्यामुळे पोह्यामध्ये ओलावा आणि आवश्यक असलेला थोडासा गोडवा येतो. 

Step 5: काहींना यामध्ये शेंगदाणे आवडतात. आता तुम्ही शेंगदाणे कढईत तेल घेतल्यानंतर फ्राय करुन घ्या. आच मंद करुन मग उर्वरित फोडणी घाला. पण शेंगदाणे आणि फोडणी दोन्ही करपू देऊ नका. 

Step 6: पोहे छान फुललेले दिसले की, गॅस बंद करा. पोहे वाढताना वर ओलं खोबरं, कोथिंबीर आवडत असल्यास भुरभुरा. 

देखील वाचा – 

मैद्याचे पदार्थ रेसिपी (Maida Recipes In Marathi)

तोंडली आणि बटाटा भाजी (Batata Tondli Chi Bhaji)