एकदा असाच मेट्रोने प्रवास करताना एक सून आपल्या आईकडे सासूची तक्रार करत होती. आता तुम्ही म्हणाल, सासू-सुनेची भांडणे यात नवीन ते काय? कारण 100 पैकी 80 तरी सासू-सूनांचे एकमेकांशी पटत नाही. सासूला सूनेने केलेला स्वयंपाक आवडत नाही.तिचं सतत बाहेर फिरणं आवडत नाही. तर सूनेला सासूने सतत या गोष्टींवरुन बोललेलं आवडत नाही. पण 100 पैकी उरलेल्या 20 सासू-सूना कधीच एकमेकांशी भांडत नसतील असे नाही. पण त्यांच्या सूना या परफेक्ट आहेत असे म्हणायला हवे. म्हणूनच त्या त्यांच्या सासूशी छान मिळून मिसळून राहतात. आयुष्यात सुखी राहायचं असेल तर नवऱ्यापेक्षा सासूला खूश ठेवणं फारचं गरजेचं असतं. तुम्हालाही असं आयुष्य हवं असेल तर तुम्हालाही व्हायला हवे ‘परफेक्ट सून’ . परफेक्ट सून होण्यासाठीच या खास टीप्स
आधी ऐका, मग बोला
सासू-सूनांमधील अर्धी अधिक भांडणं ही एकमेकांचे ऐकून न घेतल्यामुळे होतात. कारण प्रत्येकाला आपला मुद्दा पटवून द्यायची इतकी घाई असते की, समोरच्याचं आपण ऐकूनच घेत नाही. सासूच्या बाबतीतही तेच आहे. सूनांनी जर शांतपणे ऐकून घेतले तर हा वाद उद्भवणार नाही. आता आम्ही यात सूनेने प्रत्येकवेळी नमतं घ्यायला हवं असं अजिबात सांगत नाही. पण थोडा विचार करा सगळ्याचवेळी आक्रस्ताळपणा करुन भांडण्याची काहीच गरज नसते
उदा. तुमच्या सासूला एखादी गोष्ट आवडत नसेल. पण तुम्ही सतत करत असाल. तुमचे त्यामुळेच खटके उडत असतील. तर फक्त एकदा त्यांना शांत बसवून त्यांना काय आवडते काय आवडत नाही हे विचारुन घ्या. जर तुमचे नुकतेच लग्न झाले असेल तर तुम्ही सगळ्यात आधी म्हणजे नवऱ्याआधीही सासूशी सूत जुळवून घ्या. त्यांच्या आवडी निवडी जाणून घ्या. त्या तुम्हाला काही बाबतीत ओरडत असतील तर आधी ऐकून घ्या. दीर्घ श्वास घेऊन मग त्यांना गोड शब्दातच समजून सांगा. यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर तुमची चीडचीड होत नाही आणि काही गोष्टी घरातल्या पुरुषांपर्यंत न जाता तुम्ही तुमच्याच सोडवू शकता.
मुलीच्या दिवसाच्या भेटवस्तूबद्दल देखील वाचा
लग्न ठरवताना कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चौकशी करण्याची पद्धत आहे. असे करत असताना काही जण कुटुंबातील काही लोकांच्या स्वभावाबद्दल सांगतात. तुम्हाला त्यावेळी तुमची सासू खडूस आहे असे जर कोणी सांगितले. तर तुम्ही तुमच्या डोक्यात त्यांची तीच प्रतिमा ठेवता. त्यामुळे होत असं की, जरी सासू तुमच्याशी चांगली वागली तरी तुमच्या डोक्यात मात्र तेच विचार घोळत राहतात.
उदा. लग्नाआधी मला माझी सासू खाष्ठ आहे असे सांगण्यात आले होते. पण त्या माझ्याशी तशा कधीच वागल्या नाहीत. उलट आईहून जास्त प्रेम त्यांनी माझ्यावर केलं. त्यामुळे त्यांच्याबद्दल जे कोणी मला आधी सांगितलं ते मला खोटं वाटल. आज जर मी बाहेरच्या लोकांवर विश्वा, ठेवला असता तर माझ आणि सासूबाईंचे नाते कधीच खराब झाले असते.
कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आधीच करु नका गैरसमज
आदर द्या आदर मिळवा
आदर दिला तरच आदर मिळतो ते सासू- सुनेच्या नात्यातही लागू होते. तुम्ही तुमच्या सासूबाईंना आदर दिलात तरच त्या तुम्हाला देखील आदर देतील. तुम्ही त्यांचा मान न ठेवताय त्यांच्याकडून मान-सन्मानाची अपेक्षा करत असाल तर तसे होणार नाही. चार चौघात मान नाही. तर घरातल्या घरातही त्यांना मान द्यायला शिका.
उदा. चारचौघात जर तुम्ही तुमच्या सासूबद्दल वाईट बोलत असाल तर स्वाभाविकपणे त्याही त्यांच्या मैत्रिणीसमोर तुमच्याबद्दल काही ना काही बोलणारच. त्यामुळे तुम्ही त्यांचा आदर ठेवून तुमच्यात होणाऱ्या कुरबुरी बाहेर सांगितल्या नाहीत. तर त्यांनाही तुमच्याबद्दल नक्कीच आदर निर्माण होईल.
काही जणांची नाती याच आदर न दिल्यामुळे बिनसलेली असतात. एकदा का तुम्ही हा आदर घालवला की, पुन्हा नात्याची वीण गुंफताना फारच त्रास होतो. त्यामुळे तुम्ही कोणीही मोठ्या व्यक्ती असाल तरी तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सासूबाईंना त्यांचा आदर द्यायला विसरु नका. पटत नसेल तर बोलू नका. त्यांमुळे भांडण आणि आदर दोन्ही टिकून राहील.
सासूबाईंचा सल्लाही महत्वाचा
लग्न झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात अनेक बदल होतात. अनेक अनोळख्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही इतर कोणाचाही सल्ला घेण्यापेक्षा तुमच्या सासूबाईंचा घ्या. कारण त्या तुम्हाला अनेक ठिकाणी चांगल्या मार्गदर्शन करु शकतात . त्यांचा सल्ला तुमच्यासाठी सून म्हणून किती लाखमोलाचा आहे हे त्यांना कळले तर नक्कीच तुमच्याबाबत त्यांच्या मनात काळजी निर्माण होते. हीच काळजी प्रेमात बदलायला वेळ लागत नाही.
उदा. एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचे असेल तुम्हाला कळत नसेल किंवा नोकरीतील एखादा मोठा निर्णय घेताना तुम्हाला कोणीतरी जवळचे तुमचा विचार करणारे कुटुंबाचा विचार करणारे असे कोणी हवे असेल तर सासू यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत. जरी त्या तुमच्या तुलनेत कमी शिकलेल्या असतील तरी देखील त्या तुम्हाला चांगला सल्ला नक्कीच देऊ शकतात.
प्रेम दाखवा
तुमच्या मनात सासूबद्दल असलेले प्रेम दाखवण्याची देखील गरज असते. त्यांच्यासोबत बसून मनमोकळे करा. त्यांच्यासाठी कधीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रेमच त्यांच्यासाठी महत्वाचे असते.
उदा. सासूबाईंचा वाढदिवस.. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस घरच्या घरी का असेना साजरा करा. त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. तुम्ही त्यांच्यासाठी कायम उपलब्ध आहात याची जाणीव त्यांना करुन द्या. तुमच्या मनातील प्रेम त्यांना कळले तर त्यांच्या तक्रारी हळुहळू नक्कीच कमी होतील.
मुलगा कायम तुमचाच
अनेकदा असे दिसून आले आहे की, लग्न झाल्यानंतर मुलगा हा आपला नाही बायकोचा होतो असे म्हणतात. या भीतीनेच अनेकदा सासू- सूनांमध्ये भांडण होतात. सासू कधीही सूनेला जवळ करायला पाहात नाही. त्यामुळे होत असं की, सासू-सून यांमध्ये दुरावा येतो. असे होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर सून म्हणून तुम्हाला सासू नवऱ्यापेक्षाही किती प्रिय आहे ते दाखवून द्या. मुलाला प्रत्येक निर्णयात आईचा कायम सल्ला घ्यायला सांगा. सगळ्यात तुम्ही तिला सांभाळून घेतलं तर वाद होणार नाही.
उदा. साधा चौकशीचा एक फोनसुद्धा आईला अगदी खूश करत असतो. एखादा छानसा गजरा जरी तुम्ही संध्याकाळी सासूबाईंना घेऊन गेलात तरी त्यांना तुम्ही मुलापेक्षा अधिक प्रिय आहात हे दाखवून द्या. त्यांच्या मनातील मुलगा हा फक्त बायकोचे ऐकतो ही भीती कमी होईल.
किचनच्या ताब्यावरुन कशाला वाद. जबाबदाऱ्या घ्या वाटून
सासू- सुनेमध्ये होणाऱ्या भांडणाचे आणखी एक कारण म्हणजे स्वयंपाक घर.. सासूने राहत्या घरी किचनमध्ये इतके काम केलेले असते की, साहजिकच तिला नवी व्यक्ती आलेली पटकन कशी चालेल. आता हाच किचनचा ताबा मिळवताना अनेक सासू-सुनांची भांडण होतात. ही भांडण विकोपाला गेली की दोन चुली मांडल्या जातात. यात घरातल्या पुरुषांचे नाहक मरण होते. लहानाचे मोठे केलेल्या आईच्या हातचं खायचं की, भविष्याचा आधार असलेल्या बायकोच्या हातचं जेवायचं. सगळाच घोळ होऊन बसतो. तुम्हाला तुमच्या सासूबाईंच्या मनात ही भीती दिसली की, तुम्ही अगदी शांतपणे सासू सांगतील तसे काम करायला घ्या.आधी त्यांना कामात मदत करा. तुमचे उद्दिष्ट हे घरातील चाव्या, किचनचा ताबा मिळवणे हे नाही हे कळल्यानंतर सासू कधीच तुमच्याशी वाईट वागणार नाही.
सगळ्याच गोष्टी पुरुषांना सांगण्याची गरज काय?
आता इतके करुन तुमचे आणि सासूचे कधीतरी भांडण झाले तर काहीच हरकत नाही. आता तुमचे झालेले भांडण तुम्हाला प्रत्येकवेळी तुमच्या नवऱ्याला सांगण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर तुमची भांडण तुमच्यातच ठेवलीत तर त्यांनाही हक्काने तुमच्याशी भांडता येईल आणि हक्काने भांडण मिटवता येतील.
सासू नाही तर बनवा तिला मैत्रीण
सासूला जर तुम्ही तुमची मैत्रीण, शॉपिंग पार्टनर, मुव्ही पार्टनर बनवले तर तुम्हाला त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवता येईल.एकदा तुमची सासू तुमची मैत्रीण झाली की, तुम्हाला इतर कोणाची कधीच गरज भासणार नाही. कारण तुम्हाला समजून घेणारी, तुम्हाला सल्ला देणारी तुमची सासू आईनंतर तुमची बेस्ट फ्रेंड होऊ शकते.त्यामुळे सासूला तुम्ही तुमची मैत्रीण समजा.
या काही टीप्स आहेत. ज्या तुम्ही फॉलो करा आणि बना परफेक्ट सून.. तुमच्याकडेही काही टीप्स असतील तर आम्हालाही नक्की सांगा.