दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि ऐश्वर्याचा सण… कारण दिवाळीत आपण धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मी मातेची आराधना करतो. लक्ष्मीमातेचे स्वागत करण्यासाठी घर सजवलं जातं. ऐश्वर्याची पूजा करण्यासाठी घरातील चांदीच्या आणि इतर मौल्यवान वस्तू स्वच्छ करून वापरल्या जातात. देवपूजेचे साहित्य, स्वयंपाकाच्या भांड्यामध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यासाठीच या काळात कपाटात ठेवून दिलेली चांदीची मौल्यवान वस्तू आणि भांडी बाहेर काढून स्वच्छ करून ठेवली जातात. बाहेरील वातावरणामुळे आणि ठेवून दिल्यामुळे चांदीच्या भांड्यांना काळसरपणा येतो. यासाठीच जाणून घ्या दिवाळीआधी चांदीची भांडी कशी स्वच्छ करावी. त्यासोबतच दिवाळीला द्या तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
अॅल्युमिनियम फॉईल –
आपल्या घरात टिफिनमध्ये पदार्थ गरम राहण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईल वापरला जातो. तुम्ही या फॉईलचा वापर चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.यासाठी एका पातेल्यामध्ये थोडा बेकिंग सोडा मिसळा आणि त्यात अॅल्युमिनियम फॉईल चुरघळून टाका. या पाण्यात तुम्ही तुमची चांदीची भांडी स्वच्छ करू शकता. एक उकळ येईपर्यंत या पाण्यात चांदीची भांडी बुडवून ठेवा आणि मग गॅस बंद करा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर भांडी घासून स्वच्छ करा.
लिंबू –
घरातील देवपूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या वस्तू तुम्ही लिंबाने स्वच्छ करू शकता. यासाठी एक लिंबू चिरून घ्या आणि त्यावर थोडं मीठ लावा. या लिंबाने तुमच्या घरातील देवपूजेच्या वस्तू आणि चांदीची भांडी स्वच्छ करा. लिंबू आणि मीठ लावण्यामुळे या भांड्यावरचा काळसरपणा निघून जाईल. त्यानंतर भांडी स्वच्छ पाण्याने धुवा आणि सूती कापडाने पुसून ठेवा.
टोमॅटो केचप –
होय तुम्ही सॅंडविज, कटलेटसोबत खात असलेलं केचपदेखील चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी परिणामकारक ठरू शकतं. यासाठी एखाद्या टीश्यू पेपरवर टोमॅटो केचप घ्या आणि पंधरा ते वीस मिनीटे ते चांदीच्या भांड्यावर लावून ठेवा. पंधरा मिनीटांनंतर एखाद्या सॉफ्ट कापडाने ते भांड्यावर घासा. ज्यामुळे तुमच्या चांदीच्या भांड्याचा काळेपणा नक्कीच कमी होईल.
टुथपेस्ट –
चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरातील टुथपेस्टचा वापरही करू शकता. वापरून टाकाऊ झालेल्या टुथब्रशवर टुथपेस्ट लावा आणि त्याने तुमच्या घरातील चांदीची भांडी स्वच्छ करा. ज्या भांड्यांवर बारीक डिझाईन असेल त्या डिझाईनवरचा काळेपणा काढण्यासाठी तुम्ही ब्रश सर्क्युलर मोशनमध्ये फिरवू शकता. टुथपेस्ट लावल्यानंतर पाच मिनीटांनी भांडे स्वच्छ धुवून टाका आणि पुसून ठेवा.
व्हिनेगर –
चांदीच्या भांड्याचा काळेपणा कमी करण्यासाठी व्हिनेगर खूपच फायद्याचे आहे. कारण त्यामुळे तुमची काळवंडलेली भांडी आणि पूजेचे साहित्य चमकदार दिसू लागेल. यासाठी कोमट पाण्यात थोडं व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण भांड्यावर लावा आणि दोन ते तीन तास या पाण्यात चांदीची भांडी भिजत ठएवा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका आणि पुसून ठेवा.