श्रावण महिन्यातील सोमवार उत्साहात साजरे केले जातात. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारांना इतकं महत्त्व असण्याचं कारण म्हणजे श्रावणी सोमवार, सोमप्रदोष, नागपंचमी आणि एक शिवरात्री असा योग फक्त श्रावणातच पाहिला मिळतो. यासाठीच श्रावणी सोमवाराचे व्रत अधिक फलदायी मानलं जातं. श्रावम महिन्यामध्ये शिवभक्त शिवपुराण, शिवलीलामृत, शिवकवच, शिवचालीसाचे पारायण आणि शिवपंचाक्षर मंत्राचा जप, शिव पंचाक्षर स्त्रोत्र जप, महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. श्रावणातील सोमवारी कडक उपवास केला जातो. शिवाय प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याचे व्रत केले जाते.
का वाहिली जाते शिवामूठ
प्राचीन कथा आणि पुराणानुसार असं मानलं जातं की श्रावण महिना भगवान शंकराला खूप प्रिय आहे. या काळात शंकराची पूजा विशेष फळ देणारी असते. या काळात शिव शंकर आणि माता पार्वतीचे व्रत केल्यास तात्काळ फळ मिळते. कारण या महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर उपासना केली होती. यासाठीच महिला आणि कुमारिका श्रावणात भगवान शंकराची विशेष पूजाअर्चा करतात. ज्यामुळे कुमारिकांना चांगला पती मिळतो आणि विवाहित महिलेच्या आयुष्यात सौख्य नांदते अशी धारणा आहे. या व्रताचा एक भाग म्हणून दर सोमवारी निरनिराळ्या धान्याची शिवामूठ वाहण्याची पद्धत आहे. लग्नानंतर सलग पाच वर्षे शिवामूठ वाहण्याचे व्रत महिला करतात. एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा नवीन घरी तिला अॅडजस्ट होण्यासाठी नेहमीच कष्ट पडतात. मात्र शिवामूठ व्रत केल्यामुळे महिलांना सासरी प्रेम आणि आदर मिळतो अशी मान्यता आहे. यासाठीच लग्न झालेल्या मुलींसाठी श्रावमातील सोमवारचे व्रत खूप फलदायी ठरते.
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा (Shravan Month Wishes In Marathi)
यावर्षी कसे करावे शिवामूठ व्रत
यंदाचा श्रावण महिना 9 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे या वर्षी श्रावणात पाच सोमवार येत आहेत. हिंदू पंचागानुसार पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू शिवामुठीतून वाहिले जाणार आहे.. भारतीय संस्कृतीमध्ये शिवामूठ वाहिल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते असा समज आहे. शिवाय भारतीय परंपरेत देण्याचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे चातुर्मासात दान धर्म केले जाते. असं म्हणतात की, दिल्याने आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये अधिक वाढ होत जाते. यासाठी मुठभर का होईना दान करावे हा हेतू या व्रतामागे असतो. शिवामूठीतून वाहिलेले धान्य दुसऱ्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला अथवा पक्षांना खाण्यासाठी देऊ शकता. शिवामूठ वाहण्यासोबत जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक, बेल वाहून शिवशंकराचे व्रत केले जाते.
श्रावणी सोमवारी भगवान शंकराला कोणती फूले वाहावी, होतात मनोकामना पूर्ण
मंगळागौर माहिती जाणून घ्या (Mangala Gauri Information In Marathi)