संजय लील भन्सालीच्या चित्रपटांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान आहे. उत्तम कथानक, भव्य दिव्य सेट आणि अप्रतिम अभिनय करणारे कलाकार ही आजवर भन्सालीच्या चित्रपटांची ओळख आहे. भन्सालीच्या देवदासमधील चंद्रमुखी आणि तिचा मुजरा चाहत्यांच्या कायम लक्षात राहीला. उमरावजान मधील रेखाप्रमाणेच देवदासमधील माधुरी दीक्षितने सादर केलेल्या मुजऱ्याला इतर कोणाची सर नाही हे आजवर अनेकदा सिद्ध झालं आहे. आता पुन्हा एकदा माधुरी दीक्षित संजय लीला भन्सालीसोबत काम करणार आहे. शिवाय त्याच्या आगामी वेबसिरिजमध्ये माधुरीचा मुजराही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
काय आहे हीरामंडीचे कथानक
माधुरी दीक्षित एक उत्तम अभिनेत्री आणि अप्रतिम डान्सर आहे. एखादं नृत्य सादर करत असताना तिच्याकडे नुसतं पाहतच राहावं असं वाटतं. तिच्या दिलखेचक अदांचे चाहते जगभरात आहेत. माधुरीने सादर केलेल्या मुजऱ्याला तर तोडच नाही हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. म्हणूनच माधुरी पुन्हा एकदा संजय लीला भन्सालीच्या प्रोजेक्टमध्ये मुजरा सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. भन्साली प्रॉडक्शनची आगामी वेबसिरिज हीरामंडी ही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आधारित आहे. संजय लीला भन्सालीची ओळखच चित्रपटांचे भव्य दिव्य सेट उभारणं ही आहे. त्यामुळे वेबसिरिज असूनही भन्साली या प्रोजेक्टसाठी खूप मोठा सेट उभारणार आहेत. विशेष म्हणजे या वेबसिरिजमध्ये माधुरी मुजरा करताना दिसणार आहे. याआधी माधुरीने भन्सालीच्या देवदासमध्येय चंद्रमुखीची भूमिका साकारताना मुजरा केला होता. देवदासमध्ये संजय लीला भन्सालीने माधुरीमधील नृत्यकला इतक्या खुबीने प्रेक्षकांसमोर मांडली होती की आजही माधुरीचे मार डाला मार डाला आणि काहे छेडे मोहे असे नृत्यविष्कार प्रेक्षकांना लक्षात आहेत. देवदासप्रमाणेच हीरामंडीतही माधुरीच्या नृत्याची जादू संजय लीला भन्सालीला प्रेक्षकांना दाखवायची आहे.
माधुरी दीक्षित मुजरा सादर करण्यासाठी सज्ज
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय लीला भन्सालीच्या हीरा मंडीसाठी संपूर्ण स्टार कास्ट फायनल झाली आहे. संजयची ही वैबसिरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली जाणार आहे. शिवाय संजय लीला भन्सालीचा हा नेहमीप्रमाणेच एक भव्य दिव्य प्रोजेक्ट असणार आहे. या वेबसिरिजसाठी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीला आधीच साईन करण्यात आलेलं आहे. याव्यतिरिक्त आता माधुरीची या वेबसिरिजमध्ये आता मुख्य भूमिका असण्याची शक्यता आहे. माधुरीचा मुजरा ही या वेबसिरिजमधील एक खास गोष्ट असणार आहे. संजय लीला भन्सालीच्या चित्रपटात कॅमियोचं नेहमीच योगदान असतं. त्याच्या राम लीलामध्ये एका स्पेशल डान्ससाठी प्रियांका चोप्राने काम केलं होतं. त्याचप्रमाणे माधुरी आता या वेबसिरिजमध्ये दिसणार आहे. माधुरीनेही या प्रोजेक्टसाठी संजयला होकार दिला आहे. तिला ही कल्पना आणि गाणं दोन्ही पसंत पडलं आहे. संजय लीला भन्सालीच्या मते माधुरीप्रमाणे ग्रेस इतर कोणामध्ये नाही. त्यामुळे या प्रोजेक्टला तिच न्याय देऊ शकते. माधुरीचे यासाठी आठ ते दहा दिवसांचे शेड्यूल आयोजित करण्यात आलेले आहे. शिवाय माधुरीला संजयने या मुजऱ्यासाठी भलीमोठ्या रक्कमेची ऑफरदेखील दिलेली आहे. त्यामुळे आता संजयच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये माधुरीचा मुजरा चाहत्यांना नक्कीच पाहायला मिळेल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
तरीही मालिकांचा ‘शो मस्ट गो ऑन’….कलाकार करत आहेत अविरत काम
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं ‘लॉकडाऊन लग्न’, सोशल मीडियावर चर्चा
अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणतेय…क्या पता कल हो ना हो!!!