बॉलीवूडमध्ये क्वीनच्या भूमिकेने आपला ठसा उमटवणाऱ्या कंगना रणौतच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ चा ट्रेलर भव्यदिव्यपणे लाँच करण्यात आला.
भव्यदिव्य लाँचसाठी कंगनाची ग्रँड एंट्री
या ट्रेलर लाँचसाठी मुंबईत खास झाशीच्या किल्ल्याचा सेट उभारण्यात आला होता. या लाँचवेळी मणिकर्णिकेची भूमिका साकारणाऱ्या कंगनाने केली अशी ग्रँड एंट्री.
कंगनाने या लाँचसाठी नववारी साडी नेसली होती आणि पैठणीचा शेला घेतला होता. या लुकमध्ये कंगना एकदम मराठीमोळी वाटत होती आणि एखाद्या राणीसारखीच सगळीकडे वावरत होती.
या लाँचवेळी इथे दिसल्या त्या जुन्या बग्ग्या, दांडपट्टे खेळणाऱ्या महिला आणि सगळ्याला असणारा खास महाराष्ट्रीयन टच.
कंगनाचं दिग्दर्शन
या चित्रपटात कंगनाने अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाची ही धुरा सांभाळली होती. काही ना काही वादांमुळे निर्मितीकाळात हा चित्रपट चर्चेत होता. याच काळात दिग्दर्शकानेसुद्धा हा चित्रपट सोडला होता. त्यानंतर कंगनानेच याचं दिग्दर्शन केल्याचं कळतंय. त्यामुळे या चित्रपटाच्या सहदिग्दर्शनाचा मान कंगनाला मिळणार आहे.
कसं आहे ट्रेलर
ट्रेलरची सुरूवात इंग्रजांच्या काळातील लोकांवर होणाऱ्या अन्यायांने होते. मग लोकांना वाचवण्यासाठी एंट्री होते ती मणिकर्णिकेची. या चित्रपटात कंगना झाशीच्या राणीची भूमिका साकारत आहे. या अॅक्शन अवतारात कंगना छान वाटत असली तरी मुख्य संवाद हवे तेवढे प्रभावी वाटत नाहीत. गेटअप छान असला तरी पहिल्यांदाच योद्धाच्या भूमिकेतील कंगनासाठी हा चित्रपट नक्कीच चॅलेजिंग ठरणार आहे.
चित्रपटांमध्ये अनेक मराठी कलाकार
या चित्रपटाची स्टारकास्ट अगदी तगडी आहे. मुख्य म्हणजे अनेक मराठी चेहरेही या चित्रपटात दिसत आहेत. अंकिता लोखंड, अतुल कुलकर्णी आणि वैभव तत्त्ववादी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या सिरियलमुळे प्रसिद्ध झालेली अंकिता लोखंडे ही अभिनेत्री या चित्रपटात साहसी झलकारीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे.
तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंगच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. वैभवने या आधीही संजय लीला भन्साली निर्मित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात चिमाजी अप्पाची भूमिका साकारली होती.
हा चित्रपट 25 जानेवारी प्रदर्शित होत आहे. एवढ्या भव्यदिव्य ट्रेलर लाँचनंतर या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद ही तेवढाच चांगला असेल अशी आशा करूया.