सध्या मराठी चित्रपटांना खूपच सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकामागोमाग एक हिट मराठी चित्रपट येत आहेत आणि मराठी प्रेक्षकही सध्या या चित्रपटांना भरभरून प्रेम देत आहे. विशेषतः लागोपाठ आलेले ऐतिहासिक चित्रपटांनाही मराठी प्रेक्षकांनी उचलून धरले. तर आता मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज (Sambhaji Maharah) यांच्या जयंती दिनी त्यांच्यावरील ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ या चित्रपटाचा मुहूर्त झाला. डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपट असणार आहे. मल्हार पिक्चर्स प्रस्तुत, वैभव भोर आणि सनी राजानी निर्मित आणि राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ संभाजी महाराजांच्या साहस आणि शौर्याची गाथा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
जाज्वल्य देशाभिमान आणि हौतात्म्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज
‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ” शंभूराजे खरे ‘युथ आयकॉन’ आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून राजकारणाचे धडे घेत असलेल्या स्वराज्याच्या पहिल्या युवराजांची फक्त युद्धकौशल्यावरच नाही तर चौदा भाषांवर आणि साहित्यावरदेखील मजबूत पकड होती. कल्पनेतल्या सुपरहिरोंपेक्षा वास्तवातील सुपरहिरोवर सिनेमा बनवण्याची इच्छा होती. जी छावा-दि ग्रेट वॉरियर मधून पूर्ण होतेय.” थोर इतिहासकार आणि कादंबरीकार लेखक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, “असिम त्याग, पराकोटीची सहनशीलता, जाज्वल्य देशाभिमान आणि हौतात्म्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. विविध विद्या, शास्त्रे आणि पुराणे यांचा गाढा व्यासंग असलेला हा मराठ्यांच्या छावा. आजच्या पिढीला शंभुराज्यांच्या कर्त्तृत्वाची प्रचिती या सिनेमातून येईल, असा मला विश्वास आहे.”
जगातील पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेटचा शोध संभाजी महाराजांनी लावला
चित्रपटाचे निर्माते सनी रजानी यांनी सांगितले की, “जगातील पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेटचा शोध संभाजी महाराजांनी लावला, सर्वात पहिली जैविक लढाई शंभूराजांनी बुद्धीने लढली. मोगलांना वाकवणारा, इंग्रजांना नाचवणारा, पोर्तुगीजांना झुकवणारा, सीद्दीला दर्यात बुडवणारा, एकाही लढाईत न हरलेला शेवटच्या श्वासापर्यंत अजेय ठरलेला शंभुराजांसारखा छत्रपती स्वराज्याला लाभला हे आपलं भाग्य. आणि त्यांच्या संघर्षमयी आणि गतीमान आयुष्यावर चित्रपट निर्मिती करण्याचं भाग्य आम्हांला मिळालं. ह्यासाठी आम्ही खूप खुश आहोत.” संभाजी महाराजांच्या तेजस्वी कारकिर्दीवरील मल्हार पिक्चर्स प्रस्तुत छावा-दि ग्रेट वॉरियर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.
कोण साकारणार प्रमुख भूमिका?
आतापर्यंत शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या मावळ्यांवरही अनेक चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत येऊन गेले. मात्र संभाजी महाराजांवरील आणि त्यांच्याबाबत प्रेक्षकांना माहिती पुरविणारा हा चित्रपट असेल. इतिहास ऐकणे आणि वाचणे अनेकांना आवडते आणि त्यामुळेच ऐतिहासिक चित्रपटांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. असंच प्रेम छावा या चित्रपटालाही मिळेल असा विश्वास टीमला वाटत आहे. तर या चित्रपटामधून प्रमुख भूमिका कोण साकारणार याचीही उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांना शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना पाहिले आहे. पण आता या चित्रपटातून नक्की ही भूमिका कोण साकारणार याबाबतही सर्वांना उत्सुकता आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक