मुंबईत झालेला 26/11 चा भीषण दहशतवादी हल्ला कोण विसरेल! ती जखम आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. अशा जखमा आयुष्यभर भळभळत राहतात. खास करून त्यांच्या मनात, ज्यांनी स्वतः त्या हल्ल्याचा अनुभव घेतला किंवा ज्यांनी त्या हल्ल्यात आपल्या आप्तस्वकीयांना गमावले. या भयंकर घटनेवर आधारित आजवर अनेक चित्रपट देखील येऊन गेले. या हल्ल्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना हुतात्मा झालेल्या भारतमातेच्या सुपुत्रांची आठवण आजही भारतीयांच्या मनात ताजी आहे. त्यापैकी एक म्हणजे हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन हे होत. 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ चित्रपटाचा ट्रेलर काल 9 मे रोजी प्रदर्शित झाला आहे.
मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मेजर’
देशाच्या खऱ्या हिरोवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर 26/11च्या हल्ल्याचे भीषण चित्र दाखवण्यासाठी पुरेसा आहे. ट्रेलरमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणापासून ते मेजर बनण्यापर्यंत आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करण्यापर्यंतची झलक दिसते. मेजर संदीप उन्नीकृष्णनची भूमिका अभिनेता आदिवी शेषाने केली आहे. ज्याद्वारे मेजर संदीप यांच्या पराक्रमाची गाथा चित्रित करण्यात आली आहे.मेजर चित्रपटाचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का यांनी केले आहे आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिने एका प्रवासी भारतीय महिलेची भूमिका केली आहे जी त्या रात्री एका भयानक हल्ल्यात हॉटेलमध्ये दहशतवाद्यांना बळी पडते. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज या चित्रपटात मेजर संदीप यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत तर अभिनेत्री रेवती यांनी मेजर संदीप यांच्या आईची भूमिका साकारली आहे. मेजर हा आदिवी शेषाचा पॅशन प्रोजेक्ट आहे. मुख्य भूमिका करण्यासोबतच त्यांनी चित्रपटाचे लेखनही केले आहे. या चित्रपटात सई मांजरेकर आणि मुरली शर्मा यांच्याही भूमिका आहेत.
मेजर संदीप उन्नीकृष्णन
वयाच्या केवळ एकतिसाव्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे मेजर संदीप उन्नीकृष्णन हे कोझिकोडे येथे भारतीय सैन्य अधिकारी होते.त्यांनी नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सच्या एलिट स्पेशल ऍक्शन ग्रुपमध्ये अधिकारी म्हणून भारतीय सैन्यात सेवा दिली. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातून सर्वांना वाचवणाऱ्या नायकांपैकी ते एक होते. नोव्हेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्यात ते शहीद झाले. भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही त्यांची आठवण निघताच भारतीयांना एक थोर सुपुत्र गमावल्याचे दुःख होते.
थरारक चित्रपटाची झलक दाखवणारा ट्रेलर झाला लाँच
मेजरच्या ट्रेलरचे अनावरण करण्यासाठी महेश बाबू, सलमान खान आणि पृथ्वीराज सुकुमारन सोमवारी एकत्र आले होते. सोनी पिक्चर फिल्म इंडिया या यूट्यूब चॅनलवर ट्रेलर रिलीज करण्यासोबतच सलमान खान आणि महेश बाबू यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. ट्रेलर तीन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. मेजरचा ट्रेलर आधी 26 मार्चला रिलीज होणार होता, पण नंतर कोरोनामुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. “#MajorTheFilm चा ट्रेलर लॉन्च करताना मला प्रचंड आनंद होत आहे. हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा,” सलमानने चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचा ट्रेलर शेअर करताना लिहिले.
“मल्याळी सैनिक स्कूल कॅडेट म्हणून कायमच माझ्या मनात भारतीय सशस्त्र दलांविषयी आदर व मानाचे स्थान आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन हे एक शूरवीर नायक होते. ते धैर्य, शौर्य आणि निस्वार्थीपणाचे खरे मूर्त स्वरूप होते! त्यामुळे आपल्या देशाच्या अमर शूरवीरांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे,” असे पृथ्वीराज सुकुमारनने ट्रेलरची मल्याळम आवृत्ती शेअर करताना ट्विट केले.
3 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक