भारतातील सर्वात ख्यातनाम शास्त्रीय संगीतकारांपैकी एक असलेले आणि ख्यातनाम संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या पाली हिल येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांचे वय 83 वर्षे होते. बुधवारी पवन हंस स्मशानभूमीत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पूर्ण शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गार्ड ऑफ ऑनरनंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. जिथे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय शबाना आझमी, गीतकार जावेद अख्तर, गायिका इला अरुण आणि इतर अनेकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी आपल्या मित्राला दिला अखेरचा निरोप
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या जवळचे मित्र आणि ख्यातनाम बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया हे देखील उपस्थित होते. पंडित शिवकुमार शर्मा यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतही महत्त्वाचे योगदान आहे. ‘सिलसिला’, ‘लम्हे’, ‘चांदनी’ आणि ‘डर’ यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. पंडित शिवकुमार शर्मा हे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबतच्या जुगलबंदीसाठी ओळखले जात होते. या दोघांनी शिव-हरी नावाचा क्लासिक अल्बमही तयार केला होता. पंडित शिवकुमार शर्मा यांनी भारतीय संगीतक्षेत्रात मोलाचे योगदान दिले. बॉलिवूडमध्ये ‘शिव-हरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया या जोडीने अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘चांदनी’ चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ’ हे यातील सर्वात प्रसिद्ध गाणे आहे.
संगीतक्षेत्रातील तसेच सिनेजगतातील दिग्गजांनी घेतले अंत्यदर्शन
तबलावादक झाकीर हुसेन यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या पार्थिवास खांदा दिल्याचे याप्रसंगी दिसून आले. उस्ताद झाकीर हुसेन आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे नाते होते. पंडित शिवकुमार शर्मा संतूर वाजवत असत, तर झाकीर हुसेन त्यांना तबल्यावर साथ देत असत. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचा मुलगा राहुल, रोहित, पत्नी मनोरमा तबलावादक झाकीर हुसेन आणि मित्र आणि जवळचे लोक उपस्थित होते. पंडितजींचे अंतिम संस्कार त्यांच्या मुलांनी केले.
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जाण्याने झाली मोठी पोकळी
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. याप्रसंगी पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व अंत्यदर्शन घेण्यासाठी बिग बींसोबत जया बच्चनही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. जावेद अख्तर यांच्यासह शबाना आझमी यांनीही पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.
पंडित शिवकुमार यांचे संगीतक्षेत्रात मोठे योगदान
पंडित शिवकुमार यांचे संगीत विश्वातील योगदान कधीही विसरता येणार नाही. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला नव्या उंचीवर नेण्यात पंडित शिवकुमार शर्मा यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1991 मध्ये पद्मश्री आणि 2001 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे लोकवाद्य असलेले संतूर जागतिक व्यासपीठावर नेण्याचे श्रेय त्यांनाच जाते. 15 मे रोजी पंडित शिवकुमार शर्मा यांची मैफल होणार होती. लाखो लोक शिव-हरी (शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया) यांची जुगलबंदी ऐकण्याची आतुरतेने वाट बघत होते. पण, या कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच शिवकुमार शर्मा यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
पंडित शिवकुमार शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक