मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर, बबली व्यक्तीमत्त्व आणि पण तेवढीच मेहनती अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे(Prarthna Behre). सहज, सुंदर अभिनयाने प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांनीही प्रार्थनाच्या प्रत्येक परफॉर्मन्सला वेळोवेळी दाद दिली आहे. 2019 या नवीन वर्षातही प्रार्थना वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या वर्षातला प्रार्थनाचा पहिला चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती अभिनेता सचिन पिळगांवकर आणि कविता लाड-मेढेकर यांच्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. जाणून घेऊया प्रार्थनाच्या ‘लव्ह यु जिंदगी’ मधल्या भूमिकेबद्दल आणि इतर आवडी-निवडीविषयी.
‘लव्ह यु जिंदगी’ मधली रिया
रिया ही बिनधास्त आणि मनमोकळेपणाने आयुष्य जगणारी मुलगी आहे. ती खूप कॉन्फिडंट आहे. आपल्या आयुष्यावर प्रेम करणारी अशी ही रिया. रिया आणि अनिरूद्ध दाते (सचिन पिळगांवकर) यांची भेट होते. रिया त्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवते आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं, त्याची ही कथा आहे. सगळ्या वयाच्या लोकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. म्हातारपण तुमच्या वयात नाही तर तुमच्या मनात असतं. भरभरून जगा आणि आयुष्याचा आनंद घ्या, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.
प्रार्थनाने शेअर केल्या ‘लव्ह यु जिंदगी’ च्या सेटवरच्या आठवणी
‘लव्ह यू जिंदगी’च्या सेटवर कायम मजामस्तीचं वातावरण असायचं. सचिन पिळगांवकर सर आणि कविता लाड मेढेकर यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली आणि माझ्यासाठी हा एक वेगळा आणि सुंदर अनुभव होता.
प्रार्थनाची आवडती आणि आदर्श अभिनेत्री
बॉलीवूडची चांदनी म्हणजेच श्रीदेवी या माझ्या फेव्हरेट अभिनेत्री आहेत, मला त्या खूपच जास्त आवडतात. मी लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहत आले आहे. त्यांचा नॅचरल अभिनय आणि एक्सप्रेशन्स मी नेहमीचं फॉलो केलं आहे. श्रीदेवींच्या सगळ्या गाण्यांवर मी डान्ससुद्धा केला आहे. एक अभिनेत्री म्हणून मी आज इंडस्ट्रीत जे काम करतेय किंवा केलंय त्यात श्रीदेवी यांचा खूप जास्त वाटा आहे. माझ्या पहिल्यावहिल्या हिंदी फिल्ममध्ये मी एक लहानसा रोल केला होता, त्यांनी ती फिल्म पाहिल्यावर माझं कौतुक पण केलं होतं आणि तो क्षण माझ्यासाठी अनमोल आहे. माझ्यासाठी आणखी एक स्पेशल गोष्ट म्हणजे जेव्हा फिल्डवर काम करण्यासाठी मी सुरुवात केली त्यावेळी पहिली मुलाखत मी श्रीदेवी यांची घेतली होती. मी त्यांना आजही खूप मिस करते.
प्रार्थनाचं वॉर्डरॉब कलेक्शन आणि आवड-निवड
आधी मी शॉर्टस्, स्कर्ट, फ्रॉक, डेनिम घालायचे; पण लग्नानंतर मी ट्रेडीशनल आणि एथनिक असे इंडो-वेस्टर्न घालते. मुळात मी प्रत्येक स्टाईल मनापासून एन्जॉय करते. तरी देखील माझं फेव्हरेट आऊटफिट ‘वन पीस’ आहे. तसेच, माझ्या वॉर्डरॉबमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे परफ्यूम. मी नेहमीच माझ्या पर्समध्ये परफ्यूम कॅरी करते. त्याशिवाय मी घराबाहेर जातच नाही.
इंडस्ट्रीमध्ये येण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रार्थनाचा सल्ला
या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे ती म्हणजे ‘संयम’. सगळ्यांना आयुष्यात सगळ्याच गोष्टी सहज आणि लगेच मिळतात असं नाही. काहींना लवकर प्रसिध्दी मिळते पण ती प्रसिध्दी टिकवता पण आली पाहिजे आणि त्यासाठी गरजेचा असतो ‘संयम’. स्वत:च्या कामावर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि संयम ठेवा, अशी त्रिसूत्री प्रार्थनाने सांगितली आहे.
प्रार्थनाचा ‘हॅपिनेस मंत्रा’
माझा आनंदी राहण्याचा एकच मंत्रा आहे की, तुमच्याकडे आता जे काही आहे त्यात समाधानी राहा. प्रत्येक क्षण मनमुराद जगा.