सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी आयुष्य खर्च करणारे लोकनेते धर्मवीर आनंद दिघें म्हणजे ठाणेकरांचे दैवत… ठाण्यातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मनात आजही धर्मवीरांबद्दल तितकाच आदरभाव दिसून येतो. आता धर्मवीर आनंद दिघेंचा जीवनप्रवास लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबद्दल लोकांना उत्सकुता लागली होती. चित्रपट कसा असेल, यात आनंद दिघेंची भूमिका कोण साकारणार असे प्रश्न अनेकांना पडले होते. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडणार आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिका म्हणजेच आनंद दिघेंची भूमिका सर्वांचा आवडता अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चं टीझर प्रदर्शित
धर्मवीर चित्रपटाचा टीझर नक्कीच दमदार झाला आहे. त्यामुळे चाहत्यांना आता चित्रपट कधी प्रदर्शित होतोय याची उत्सुकता लागली आहे. टीझरची सुरुवातच “कुठल्याही बॅंकेचं साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही किसे रिकामे असलेला, जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राने पाहिलाय ” या दमदार वाक्याने होते. हळू हळू टीझरमधून आनंद दिघेंचं व्यक्तिमत्त्व उलगडू लागतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडेने केलं आहे. टीझरमध्येही प्रवीणच्या आवाजातूनच आनंद दिघेंची भूमिका साकारत असलेला प्रसाद ओक प्रेक्षकांच्या समोर येतो. प्रसादचं हे रूप पाहून अनेकांच्या अंगावरून अक्षरशः काटा उभा राहतो. ज्यांनी ज्यांनी आनंद दिघेंना अनुभवलं आहे त्यांच्या डोळ्यांत आठवणींचा पूर येतो. गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आनंद दिघेंनी स्वतःचं आयुष्य वेचलं होतं. प्रसाद ओक सारख्या दिग्गज अभिनेत्यासाठीदेखील हे उत्तुंग राजकारणी व्यक्तिमत्त्व साकारणं नक्कीच आव्हानात्मक ठरलं असणार. प्रसादने हे आव्हान किती लीलया पेललं आहे हे चित्रपटातून लवकरच पाहायला मिळेल.
कधी प्रदर्शित होणार ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाची निर्मिती अभिनेता मंगेश देसाई याच्या साहिल मोशन आर्टस आणि झी स्टुडिओने एकत्रित केलेली आहे. 13 मेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपट प्रदर्शित होत आहे. धर्मवीर आनंद दिघे आज शरीराने जरी या जगात नसले तरी ठाण्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनामनात ते वसलेले आहेत. त्यामुळे अशा उत्तुंग समाजकार्य असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करणं म्हणजे दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठी एखाद्या अवघड परिक्षेप्रमाणेच आहे. आनंद दिघेंसोबत आजही अनेकांच्या असंख्य भावनिक आठवणी जोडलेल्या आहेत. आता या परिक्षेत दिग्दर्शकापासून कलाकारांपर्यंत कोणकोण पास झालं आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे.