भारतीय क्रिकेट संघाचा ‘गब्बर’ आणि स्टार सलामीवीर शिखर धवन आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर आपल्या अभिनयाच्या जोरावर चौकार-षटकार मारताना दिसणार आहे. धवन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मुख्य प्रवाहातील चित्रपटातून तो आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार आहे. त्याने चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. सध्या या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आलेली नसली तरी चाहते मात्र ही बातमी ऐकून खूप खुश झाले आहेत आणि या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. त्यांना आता क्रिकेटच्या मैदानासह चित्रपटाच्या पडद्यावर त्यांच्या आवडत्या खेळाडूला पाहता येणार आहे.
शिखरने आनंदाने स्वीकारली भूमिका
सूत्रांनी माहिती दिली की शिखर धवनला अभिनेत्यांबद्दल खूप आदर वाटतो आणि जेव्हा त्याला ही भूमिका ऑफर करण्यात आली तेव्हा ती स्वीकारण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही आणि आनंदाने या प्रोजेक्टमध्ये सामील झाला. चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटते की धवन या भूमिकेसाठी योग्य असेल, म्हणून काही महिन्यांपूर्वी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात तो कॅमिओ नाही तर मोठी भूमिका साकारणार आहे.
शिखरने भेट दिली होती राम सेतूच्या सेटला
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शिखर धवन अक्षय कुमारच्या आगामी ‘राम सेतू’ चित्रपटाच्या सेटवर दिसला होता. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरुचा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तेव्हा अफवा पसरली होती की शिखर या चित्रपटात दिसणार आहे पण एका सूत्राने सांगितले की शिखर आणि अक्षय जवळचे मित्र आहेत. त्यामुळे तो सेटवर फक्त अक्षय कुमारला भेटायला गेला होता. शिखर धवन किंवा त्याच्या टीमकडून त्याच्या बॉलीवूड पदार्पणाबाबत अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिखर धवन सध्या इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये व्यस्त आहे. तो पंजाब किंग्ज संघाचा कर्णधारही आहे. यापूर्वी धवनने 2014 च्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा सांभाळली होती. पंजाब संघाने यावर्षी आयपीएलमध्ये 5 सामने खेळले असून त्यापैकी 3 जिंकले आहेत. सध्या तरी पंजाबला आयपीएलचे विजेतेपद मिळालेले नाही.
हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे
हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिखर धवन एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिखर धवनला चित्रपट किती आवडतात हे त्याने ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील एका संवादावर इंस्टाग्राम रील केले तेव्हाच दिसून आले होते.
आजवर या क्रिकेटपटूंनी अभिनयात नशीब आजमावले, ते फ्लॉप ठरले
आता शिखर धवन बॉलीवूडमध्ये आपले टॅलेंट दाखवू शकतो की नाही हे येणार काळच ठरवेल. शिखर धवनच्या आधी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनय विश्वात नशीब आजमावले होते, पण ते यात काही विशेष करू शकले नाहीत. यामध्ये माजी भारतीय यष्टीरक्षक आणि क्रिकेटपटू संदीप पाटील, अजय जडेजा, श्रीशांत, विनोद कांबळी, योगराज सिंग, सुनील गावस्कर, कपिल देव, युवराज सिंग, हरभजन सिंग, इरफान पठाण आणि सलील अंकोला यांचा समावेश आहे. पण यापैकी एकाही क्रिकेटपटूचा चित्रपट करिष्मा दाखवू शकला नाही आणि एकही क्रिकेटपटू अभिनयाच्या क्षेत्रात आपले बस्तान बसवू शकला नाही. आता शिखर हा रेकॉर्ड मोडतो की नाही याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक