हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब, शिवसेना आणि मराठी माणूस हे एक घट्ट समीकरण आहे. मराठी माणसाचं दैवत असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं मराठी आणि हिंदी ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आलं. या लाँचवेळी चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. या चित्रपटाचं लेखन संजय राऊत यांनी केलं असून निर्मिती ही त्यांचीच आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलंय. हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार असून मराठी आणि हिंदी भाषेत पाहता येईल.
कसं आहे ट्रेलर
या ट्रेलरची सुरूवात होते ती मुंबईत 90 साली झालेल्या दंगलीच्या सीनने होते. यानंतर समोर येताे बाळासाहेब ठाकरेंच्या रूपातील नवाजूद्दीन सिद्दीकी. बाळासाहेबांच्या सुरूवातीचा काळ, शिवसेनेची मुहूर्तमेढ, बाबरी मशिदीबाबतचे त्यांचे विचार आणि बाळासाहेबांनी केलेली अनेक आंदोलन हे सगळं या 2 मिनिट 54 सेंकदाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी खूपच प्रभावशाली आहे. पाहा हे ट्रेलर
बाळासाहेबांच्या भूमिकेत नवाजुद्दीन
आपल्या मिळलेल्या प्रत्येक भूमिकेचं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने नेहमीच सोनं केलं आहे. कोणतीही भूमिका असो नवाजुद्दीन ती अक्षरशः जगताना दिसतो. हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. त्यात ही बाळासाहेबांची भूमिका असल्याने त्याच्यावर जास्तच जबाबदारी होती. माझ्या कारकिर्दीतील ही सर्वात कठीण भूमिका असल्याचं त्याने म्हटलंही होतं.
नवाजुद्दीनचा लुक अगदी हूबेहूब बाळासाहेबांसारखा झाला आहे. संपूर्ण ट्रेलरवर नवाजुद्दीनची छाप दिसते.
अभिनेत्री अमृता राव ही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.