ठेचा हा शब्द जरी आपण मनात आणला तरी तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य असणारा हा झणझणीत पदार्थ. तांदळाची भाकरी, झुणका आणि झणझणीत ठेचा असं ताट भरलेलं असलं की अजून कशाचीच गरज नाही. असा हा फक्कड बेत नेहमीच सर्वांना आवडतो. ठेचा हा वेगवेगळ्या पद्धतीने (Thecha Recipe) केला जातो. ठेच्याची रेसिपी (Thecha Recipe In Marathi) ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळी असते. या लेखातून तुम्हाला महाराष्ट्रातील विविध भागातील महाराष्ट्रीयन पद्धतीचे ठेचा कसे बनवायचे हे आम्ही सांगणार आहोत. ही ठेचा रेसिपी मराठी (Thecha Recipe) खास तुमच्यासाठी.
महाराष्ट्रीयन हिरवी मिरचीचा ठेचा रेसिपी मराठी (Maharashtrian Hirvi Mirchi Thecha Recipe In Marathi)
सगळ्यात जास्त ठिकाणी ठेचाचा मिळणारा प्रकार म्हणजे हिरवी मिरची ठेचा. हिरव्या मिरचीचा ठसका खूपच भारी लागतो. याची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते आणि तिखटपणा म्हणजे चटका. प्रवासात तुम्हाला महाराष्ट्रातील अनेक हॉटेल्समध्ये हिरव्या मिरच्या ठेच्याची (Maharashtrian Hirvi Mirchi Thecha Recipe In Marathi)चव चाखायला मिळते. जाणून घेऊया याची रेसिपी.
साहित्य
- 100 ग्रॅम हिरवी मिरची
- 1/2 कप शेंगदाणे
- 1/2 कप लसूण
- तेल आवश्यकतेनुसार
- 1/4 चमचे जीरे
- मीठ स्वादानुसार
- लिंबाचा रस
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या
- त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात हिरवी मिरची तुकडे, लसूण आणि शेंगदाणे घाला आणि नीट मिक्स करून भाजून घ्या
- हे मिश्रण थंड झाल्यावर खलबत्त्यात ठेचा (खलबत्त्यात ठेचून केला जातो म्हणूनच याला ठेचा म्हणतात) याचा तिखटपणा कमी करण्यासाठी वरून लिंबाचा रस घाला आणि मिक्स करा. तुमचा हिरव्या मिरचीचा ठेचा (Maharastrian Hirvi Mirchi Thecha Recipe In Marathi) तयार
- गरमागरम पिठलं भाकरी, कांद्यासह हा ठेचा खायला घ्या
वाचा – तोंडलीच्या काचऱ्या (Kachrya Tondlichi Bhaji Recipe In Marathi)
लसूण ठेचा रेसिपी मराठी (Lasun Thecha Recipe In Marathi)
लसणीचा ठेचादेखील चवीला अप्रतिम लागतो. लसणीचा ठेचा (Lasun Thecha Recipe In Marathi) सहसा विदर्भामध्ये केला जातो. विदर्भातील लोक तिखट खाण्याला अधिक प्राधान्य देतात. जाणून घेऊया याची रेसिपी.
साहित्य
- 4-5 हिरव्या मिरची
- 8-10 लसूण पाकळ्या
- 1 चमचा शेंगदाणे
- थोडीशी कोथिंबीर
- स्वादानुसार मीठ
- 1/2 चमचा लिंबाचा रस
- 1 लहान चमचा तेल
- मोहरी
बनविण्याची पद्धत
- एका कढईत शेंगदाणे भाजून घ्या आणि नंतर थंड झाल्यावर याची साले काढा
- लसूण आणि मिरचीचे लहान लहान तुकडे करून घ्या
- कढईमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी, लसूण आणि मिरची घालून साधारण 2-3 मिनिट्स भाजून घ्या. हे मिश्रण थंड होऊ द्या
- एका मिक्सरमध्ये लसूण, मिरची, शेंगदाणे, थोडेसे मीठ चवीनुसार घालून वाटून घ्या. हे थोडे जाडसरच वाटा
- यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका
- मिक्सरमधून बाऊलमध्ये काढा आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. लसूण ठेचा तयार
टॉमेटो ठेचा रेसिपी मराठीत (Tomato Thecha Recipe In Marathi)
काही जणांना कदाचित टॉमेटो ठेचा माहीत नसेल. पण टॉमेटोचा ठेचाही (Thecha recipe) चवीला मस्त लागतो. तुम्ही पोळी अथवा भाकरीसह हा ठेचा खाऊ शकता.
साहित्य
- बारीक चिरलेले टॉमेटो
- लाल मिरची पावडर
- तेल
- 25-30 लसूण पाकळ्या
- जीरे
- स्वादानुसार मीठ
- कोथिंबीर
- जिरे पावडर
- थोडेसे हिंग (चवीपुरते)
बनविण्याची पद्धत
- टॉमेटोचे तुकडे करून घ्या. मिक्सरमध्ये लसणीच्या 20 पाकळ्या घालून वाटून घ्या
- आता एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे घाला आणि उरलेल्या लसणीच्या पाकळ्या घालून भाजा. त्यात कापलेली कोथिंबीर, जिरे पावडर आणि हिंग घालून परता
- वरून टॉमेटोचे केलेले वाटण घालून परता आणि सतत ढवळत राहा
- उकळी आल्यावर त्यात लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करा आणि वरून झाकण लावा. तेल सुटेपर्यंत शिजवा. थंड झाल्यावर टॉमेटोचा झणझणीत ठेचा तयार.
कोल्हापुरी ठेचा रेसिपी मराठीत (Kolhapuri Thecha Recipe In Marathi)
कोल्हापुरी ठेचादेखील तितकाच प्रसिद्ध आहे. तसंच घरच्या घरी बनवायलादेखील सोपा आहे. याचा ठसकाच सर्व काही सांगून जातो.
- 100 ग्रॅम हिरवी मिरची
- 50 ग्रॅम शेंगदाणे
- 15 ते 20 लसूण पाकळ्या
- आवश्यकतेनुसार 2 मोठे चमचे तेल
- 1/2 चमचा जिरे
- स्वादानुसार मीठ
बनविण्याची पद्धत
- एक पॅन गॅसवर ठेवा आणि मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर हे शेंगदाणे एका भांड्यात काढून घ्या आणि थंड झाल्यावर त्याची साले काढून एका बाऊलमध्ये ठेवा
- हिरवी मिरची तुम्ही व्यवस्थित धुऊन घ्या आणि दोन ते तीन तुकडे करा आणि लसणीच्या पाकळ्या सोलून ठेवा
- एका पॅनमध्ये एक चमचा तेल घाला. गरम झाल्यावर त्यात जिरे घाला आणि मग लगेच त्यात लसूण घाला आणि मिरची घालून परता. त्यानंतर त्यात शेंगदाणे घालून परतवा. शेंगदाण्याचा रंग बदलला की, त्यात मीठ घाला आणि मग गॅस बंद करा
- हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर खलबत्त्यात ठेचा आणि मग एका भांड्यात ठेवा. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ठेचा जाडसर वाटून घ्या
- तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा ठेचा पुन्हा एकदा पॅन गरम करून त्यात तेल घाला आणि ठेचा त्यात घालून परतवा. अगदी मंद आचेवर साधारण पाच मिनिट्स तुम्ही हा ठेचा परता. तुमचा चटपटीत आणि झणझणीत कोल्हापुरी ठेचा तयार
झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत
दोडक्याची ठेचा रेसिपी (Dodkyachi Thecha Recipe In Marathi)
तुम्हाला पदार्थाचे नाव वाचून नक्की आश्चर्य वाटलं असेल ना? पण होय दोडक्याच्या सालीची चटणी तुम्ही करत असाल पण दोडक्याचा ठेचा कधी ऐकला आहे का? नसेल तर जाणून घ्या याची सोपी रेसिपी
साहित्य
- 2 दोडके
- 1 चमचा तेल
- 1 चमचे जीरे मोहरी
- पाव चमचा हिंग
- 1-2 मिरची
- 4-5 लसूण पाकळ्या
- 1/2 कप चिरलेला कांदा
- पाव चमचा हळद
- 1/2 कप शेंगदाणे कूट
- चवीनुसार मीठ
बनविण्याची पद्धत
- कांदा, लसूण आणि मिरची व्यवस्थित चिरून घ्या. शेंगदाण्याचे बारीक कूट करून घ्या
- दोडक्याची सालं काढा आणि सालं काढून दोडके किसून घ्या
- पॅनमध्ये तेल गरम करा. त्यानंतर त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, लसूण, मिरची, चिरलेला कांदा घालून परतून घ्या
- त्यामध्ये तुम्ही किसलेला दोडका घालून एकत्र करा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर 3-4 मिनिटे झाकण ठेवून वाफ द्या. सर्वात शेवटी शेंगदाणे कूट मीठ घालून एकत्र करा
- यानंतर 5-6 मिनिटे झाकण ठेवून शिजवा. तुमचा तयार झाला दोडक्याचा ठेचा
भेंडीचा ठेचा (Bhendi Thecha Recipe In Marathi)
भेंडीची भाजी सगळ्याना आवडते असं नाही. मग तुम्ही भेंडीचा ठेचा हा पदार्थ नक्की करून पाहायला हवा. हा पदार्थ बनवायला सोपा आहे आणि आवडीने तुम्ही अगदी चवीने खाऊ शकता.
साहित्य
- 200 ग्रॅम भेंडी
- 1/4 कप भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
- 10-12 लसणीच्या पाकळ्या
- 7-8 हिरवी मिरची
- 2 चमचे बारीक कापलेली कोथिंबीर
- 2 चमचे तेल
- 1 चमचा जिरे
- चवीनुसार मीठ
बनविण्याची पद्धत
- भेंडी धुऊन नीट पुसून घ्या आणि मोठी कापून घ्या
- कढईत एक चमचा तेल गरम करा आणि त्यात कापलेली भेंडी टाकून भाजून घ्या
- 2 मिनिटांनंतर कापलेली हिरवी मिरची आणि लसणीच्या पाकळ्या घाला आणि पुन्हा भाजून घ्या
- त्यात शेंगदाण्याचे कूट व्यवस्थित मिक्स करा आणि साधारण १ मिनिट परतून मग गॅस बंद करा
- थंड झाल्यावर चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि खलबत्त्यात कुटून घ्या
- ही सर्व प्रक्रिया करून झाली की, एका कढईत तेल घाला आणि गरम करा. त्यात जिरे घालून तडतडू द्या. त्यानंतर बारीक कोथिंबीर घाला आणि मग ठेचलेली भेंड, लसूण आणि मिरची पेस्ट घालून परतून घ्या
- काही मिनिट्स व्यवस्थित भाजून झाल्यावर गॅस बंद करा. तुमचा भेंडीचा ठेचा तयार आहे.
वऱ्हाडी ठेचा रेसिपी मराठीत (Varhadi Thecha Recipe In Marathi)
वऱ्हाडी ठेचा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थ आहे. सगळ्यांनाच याची चव आवडते. विदर्भातील हा प्रसिद्ध ठेचा आहे. एकदा हा ठेचा बनवून ठेवला तर साधारण 2 महिने हा टिकून राहतो.
साहित्य
- 15-20 कमी तिखट असणाऱ्या सुक्या लाल मिरची
- 10-12 लसणीच्या पाकळ्या
- 2 लिंबाचा रस
- 1/2 चमचा जिरे
- चवीनुसार मीठ
- 4-5 लहान चमचे तेल
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले मिरची व्यवस्थित दोन ते तीन वेळा धुवा आणि 3-4 तास थंड पाण्यात राहू द्या. त्यानंतर मिरचीचे देठ काढून घ्या
- आता मिक्सरमध्ये तेल घाला. त्यात वर दिलेले सर्व साहित्य टाका आणि मिक्सरमधून वाटून घ्या
- त्यानंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यामध्ये मिक्सरमधून वाटलेला ठेचा घ्या आणि मंद आचेवर साधारण 2-3 मिनि्टस भाजून घ्या. तेल सुटू द्या
- जेव्हा ठेचामधून तेल वेगळे होऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि लहान बाऊलमध्ये अथवा कोणत्याही काचेच्या बरणीत हा ठेचा ठेवा आणि महिनाभर तुम्ही याचा वापर करू शकता
- वऱ्हाडी ठेचा बनवताना तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर काश्मिरी लाल सुक्या मिरच्यांचा वापर करावा अथवा लिंबू, आमचूर पावडर अथवा व्हिनेगरचा वापर करावा
चटपटीत आणि स्वादिष्ट राजमा रेसिपीज
आलं लसूण ठेचा रेसिपी मराठीत (Ginger Garlic Thecha Recipe In Marathi)
आलं आणि लसणीचा ठेचा नेहमीच जेवणात वापरला जातो. पण हा ठेचा बाजारातून आणण्यापेक्षा घरी बनवणं अधिक सोपं आहे. आलं लसूण ठेचा रेसिपी जाणून घ्या मराठीत
साहित्य
- 100 ग्रॅम हिरवी मिरची
- 50 ग्रॅम आलं
- 50 ग्रॅम लसूण
- चवीनुसार मीठ
- 2 लिंबाचा रस
- 1 चमचा घरी तयार केलेला लोणच्याचा मसाला
बनविण्याची पद्धत
- सर्वात आधी आलं आणि लसूण व्यवस्थित सोलून घ्या
- खलबत्ता अथवा मिक्सरमधून आलं, लसूण आणि मिरची वाटून घ्या
- आता हे सर्व कुटलेल्या पदार्थांमध्ये मीठ, लोणच्याचा मसाला आणि लिंंबाचा रस घालून मिक्स करा
- त्यानंतर एका बरणीत भरा आणि दोन ते तीन दिवस ही बरणी उन्हात ठेवा. त्यानंतर तुमचा ठेचा तयार आहे. तुम्ही कधीही खाऊ शकता
शेंगदाणा ठेचा रेसिपी मराठीत (Shengdana Thecha Recipe In Marathi)
शेंगदाण्याचा ठेचादेखील तुम्ही अगदी घरातल्या घरात पटकन करू शकता. आवडीची भाजी नसेल तर तुम्ही अगदी त्वरीत तयार करून खाऊ शकता.
साहित्य
- 100 ग्रॅम हिरवी मिरची
- 50 ग्रॅम शेंगदाणे
- आल्याचे लहान लहान तुकडे
- चवीनुसार मीठ
- ½ चमचा लसूण पावडर
- 2 चमचे तेल
- पाव चमचा मोहरी
- चिमूटभर हिंग
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले आलं आणि मिरची स्वच्छ धुऊन घ्या
- मिक्सरमध्ये आलं, मिरची आणि भाजलेले शेंगदाणे घालून वाटून घ्या
- एका कढईत तेल घ्या. त्यात मोहरी, हिंग घाला आणि तडतडल्यावर त्यात मीठ आणि लसूण पावडर मिक्स करून घ्या. दोन मिनिट्स व्यवस्थित परतून घ्या. वरून वाटलेले मिश्रण घाला आणि परता
- गरम भाकरी आणि ठेचा खायला घ्या
काजू मिरची ठेचा रेसिपी मराठीत (Kaju Mirchi Thecha Recipe In Marathi)
काजू आणि मिरचीचादेखील ठेचा बनवता येतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा ठेचा नक्की कसा लागतो. तर हा ठेचादेखील चवीला अप्रतिम असतो. जाणून घेऊया रेसिपी
साहित्य
- 200 ग्रॅम हिरवी मिरची
- 100 ग्रॅम काजू
- चवीनुसार मीठ
- 1 लहान चमचा जिरे
- 1 मोठा चमचा तेल
बनविण्याची पद्धत
- काजू मिरची ठेचा बनविण्यासाठी सर्वात पहिले मिरची तुम्ही व्यवस्थित धुऊन घ्या. त्यानंतर त्याचे देठ काढून घ्या आणि मग मिरचीचे लहान तुकडे करा
- यानंतर बारीक केलेली मिरची मिक्सरमध्ये घाला आणि एकदा वाटून घ्या. सरसरीत वाटा. त्याची अगदीच पेस्ट करू नका
- आता काजू मिक्सरमधून ग्राईंड करून थोडेसे वाटून घ्या. बारीक करू नका. बस त्याचे लहान लहान तुकडे करा
- आता एका गॅसवर पॅन ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घाला आणि तडतडू द्या. यामध्ये बारीक मिरचीचे वाटण, मीठ घाला. परतल्यावर त्यामध्ये काजूचे वाटण घाला. साधारण 5 मिनिट्स मंद आचेवर भाजून घ्या
- त्यानंतर गॅस बंद करा आणि ठेचा एका काचेच्या जारमध्ये वा बाऊलमध्ये काढा. हा ठेचा पराठे, ब्रेड, पोळी कशाहीबरोबर तुम्ही खाऊ शकता
लाल मिरची ठेचा रेसिपी मराठीत (Lal Mirchi Thecha Recipe In Marathi)
बऱ्याच हॉटेलमध्ये लाल मिरचीचा ठेचा मिळतो. घरात फारच कमी वेळा लाल मिरचीचा ठेचा बनवला जातो. तुम्ही घरच्या घरीही हा ठेचा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
साहित्य
- 1/2 किलो ताज्या लाल मिरची
- 2 मोठे चमचे मोहरीचे तेल
- 1/2 चमचे मोहरी
- 2 लहान चमचे हिंग
- 1 लहान चमचे वाटलेली बडिशेप
- 1/2 लहान चमचा काळे मीठ
- 1 लहान चमचा मेथी पावडर
- चवीनुसार मीठ
- अर्धी लहान वाटी लिंबाचा रस
बनविण्याची पद्धत
- लाल मिरची ठेचा बनविण्यासाठी तुम्ही सर्व साहित्य एकत्र करून घ्या. लाल मिरची धुवा आणि सुकल्यावर त्यातील बी काढून मिक्सरमधून वाटून घ्या
- एका भांड्यात लिंबाचा रस काढून घ्या आणि मग मिरचीमध्ये घालून मिक्सरमधून वाटून घ्या. पेस्ट तयार करून घ्या
- आता एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा. धूर यायला लागला की गॅस बंद करा. कोमट तेल झालं की, त्यात मोहरी, बडिशेप, हिंग, मेथी पावडर, काळे मीठ, मीठ घालून मिक्स करा
- गॅस मंद आचेवर चालू करा आणि वाटलेली लाल मिरची – लिंबू रसाची पेस्ट त्यात घालून मंद आचेवर उकळी येईपर्यंत शिजवा
- मीठ चाखून पाहा. कमी असेल तर थोडेसे वाढवा आणि मग गॅसवरून उतरवा
- लाल मिरचीचा ठेचा थंड झाल्यावर तुम्ही पराठे, भात, भजीसह खाऊ शकता
- लाल मिरची नीट सुकवल्यानंतरच त्याचा ठेचा बनवा आणि स्वच्छ व सुक्या भांड्यातच हा ठेचा ठेवा अन्यथा खराब होतो
बटाटा ठेचा रेसिपी मराठीत (Aloo Thecha Recipe In Marathi)
बटाटा हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. बटाट्याचाही ठेचा करता येतो. हा लहान मुलांसाठीही उपयोग ठरतो. तुम्हीदेखील जाणून घ्या रेसिपी.
साहित्य
- 1 बटाटा
- 4/6 हिरवी मिरची
- 1 कांदा
- 5-8 लसणीच्या पाकळ्या
- चवीनुसार मीठ
- 1/2 चमचा लाल मिरची पावडर
- 1/2 लहान चमचा हळद पावडर
- अर्धा चमचा हिंग
- अर्धा चमचा जिरे
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले बटाटा आणि हिरवी मिरची उकडून घ्या
- उकडलेले बटाटे सोलून घ्या. कांदा चिरून घ्या. लसणीच्या पाकळ्या सोलून घ्या आणि मिरचीचे तुकडे करून घ्या
- कढईमध्ये तेल गरम करा आणि त्यात हिंग, जिरे घालून कांदा, लसूण, बटाटे, मिरची, मीठ, लाल मिरची पावडर, हळद पावडर घालून मिक्स करा. शिजल्यावर बाहेर काढा
- मिक्सरमधून हे वाटून घ्या मात्र पाण्याचा उपयोग न करता ताक वापरा
- बटाट्याचा ठेचा तयार आहे
तुम्हीही घरच्या घरी असे ठसकेबाज ठेचा तयार करा आणि मस्तपैकी गरमागरम भाकरीसह याची चव घ्या. तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा.