सुंदर लांबसडक आणि काळेभोर केस कोणाला आवडत नाहीत. केस लांबसडक वाढवण्यासाठी आपण कितीतरी वेगवेगळ्या तेलांचा उपयोग करतो. पण नक्कीच तेलाने केसांची वाढ होते का? फक्त चांगल्या तेलाचा वापर केल्यामुळे केस वाढू शकतात का? तर मुळीच नाही. नुसत्या तेलाने नाही तर केसांच्या वाढीसाठी इतर काही गोष्टीही कारणीभूत असतात. जर तेलाच्या मालिशसोबत तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हालाही लांबसडक आणि सुंदर केस मिळतील. चला तर जाणून घेऊया ही अत्यंत महत्वाची माहिती
तेलाच्या वापरामुळे खरंच वाढतात का केस
आपण आतापर्यंत अनेक ठिकाणी वाचलं किंवा ऐकलं असेल की, अमुक तेलाच्या प्रयोगामुळे केसांची छान वाढ होते. केसांसाठी तेलाचा वापर हा चांगला असला तरी तुमच्या केसांची वाढ तेलामुळे होते हे अजिबात सिद्ध झालेले नाही. तेलामधील गुणधर्म हे स्काल्पला मॉश्चरायईज करण्याचे काम करतात. त्यामुळे कोरडी स्काल्प किंवा कोंडा असा त्रास कमी होण्यास मदत मिळते. स्काल्प जर चांगली राहिली तर केस वाढायला मदत होते. त्यामुळे तेल प्रत्यक्षात केस वाढवण्यासाठी मदत करत नाही. तर केसांची स्काल्प नरीश करण्याचे काम करते. त्यामुळे तेल हे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर नाही हे लक्षात ठेवा.
( पण स्काल्पसाठी तुम्ही अगदी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन वेळा तेलाने मालिश केली तरी तुम्हाला चालू शकेल)
जास्वंदीच्या फुलाने घरीच करा केस असे चमकदार
उत्तम आहार
तुमच्या शरीरात काय जातं? त्यावर बरेचदा तुमच्या केसांची वाढ अवलंबून असते. केस गळू नये किंवा केसांची वाढ व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही उत्तम आहार घ्यायला हवा. जर तुम्ही चौकस आहार घेत असाल तर आपल्या शरीरात तयार होणारे तेल अर्थात sebum योग्य पद्धतीने होईल. जर आपलं खाणं योग्य नसेल तर मात्र याची मात्र गडबडेल आणि त्याचा त्रास केसांना होईल. आहारात मासे, फळ, दूध, पालेभाज्या, डाळी, सलाद असे पदार्थ असायलाच हवे त्याने केसांच्या वाढीला चालना मिळेल.
घरच्या घरी कोणत्याही मशीनशिवाय केस असे करा सरळ
व्यायाम
आता तुम्ही म्हणाल केस आणि व्यायामाचा काय संबंध. पण केसांच्या वाढीसाठी केसांच्या अगदी टोकापर्यंत रक्तपुरवठा होणे गरजेचे असते. ज्यावेळी आपण व्यायाम किंवा योग करतो. त्यावेळी अनेकदा मानेच्या हालचालीमुळे केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत रक्तपुरवठा होतो. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दिवसातून एकदा तरी शिर्षासन हे आसन करा. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल.
केसांची निगा
केस वाढीसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे केसांची निगा. केसांची निगा राखणे म्हणजे केसांना तेल लावणे, मसाज करणे किंवा केस धुणे इतकेच नाही. तुम्हाला केसांची नेमकी कोणती समस्या आहे ते ओळखून केसांसाठी प्रोडक्ट निवडा. कोंड्यासारखा त्रास असेल तर त्याची योग्य वेळ काळजी घ्या. आठवड्यातून दोन वेळा केस धुवा. केस विंचरण्याचा कंटाळा असेल तर तो झटका केस विंचरणे हे देखील केसांच्या आरोग्यासाठी फारच महत्वाचे आहे. स्काल्प सतत तेलकट होत असेल तर ती स्वच्छ कशी करता येईल याकडे अधिक लक्ष द्या. याशिवाय शक्य असेल तर मल्टी व्हिटॅमिन्स घ्या (डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानिशी) त्यामुळेही केसांच्या वाढीला आतून चालना मिळते.
आता केस वाढवायचे असतील तर नुसता तेलाचा वापर करु नका. तर या काही गोष्टींची काळजीही घ्या.त्यामुळे केसांच्या वाढीला मदत मिळेल.