हिंदीप्रमाणेच मराठीतही ‘गुड न्यूज’ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. प्रिया बापटनेही काही दिवसांपूर्वीच आपला नवरा उमेश कामतबरोबर एक फोटो पोस्ट करत ‘गुड न्यूज’ असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. मात्र आपल्याला हवी तशी ही ‘गुड न्यूज’ नसून प्रिया आणि उमेशसाठी ही नक्कीच ‘गुड न्यूज’ आहे. ‘सोनल प्रॉडक्शन्स’ ही प्रिया आणि उमेश स्वःताची प्रॉडक्शन कंपनी असून ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नावाचं नाटक घेऊन आले आहेत. प्रिया आणि उमेशने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून काम केलं आहे. मात्र आता पहिल्यांदाच उमेश आपल्या प्रॉडक्शन निर्मितीमधून काम करत असून यामध्ये त्याच्याबरोबर ‘फुलपाखरू’फेम ऋता दुर्गुळे दिसणार आहे.
काय म्हणाली प्रिया?
प्रियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून ही पोस्ट केली असून अंत्यत भावूक शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘तर ही आहे गुड न्यूज! आमची पहिली निर्मिती. खूप मनापासून, प्रेमाने जपलेली आणि वाढवलेली ही पहिली कलाकृती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजपर्यंत अभिनेते म्हणून तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत, तसंच आमच्या या नव्या प्रवासालासुद्धा तुमचं प्रेम आणि आशिर्वाद मिळू देत,’ असं प्रियानं म्हटलं आहे. प्रिया आणि उमेश दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं जोडपं आहे. आतापर्यंत उमेशनेही बऱ्याच नाटकांमधून काम केलं आहे. मात्र या नाटकामध्ये प्रियादेखील असणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही आणि नावावरून हे नाटक विनोदी असावं असं वाटत असून ऋताच्या दादाची भूमिका उमेश साकारत असावा असं सध्यातरी दिसून येत आहे. दरम्यान या नाटकाचं दिग्दर्शन मराठीतील नावाजलेला दिग्दर्शक अद्वैत दादरकर करत असून लेखन कल्याणी पाठारे यांचं आहे.
होकार-नकाराची गंमत
2003 साली प्रिया आणि उमेशची भेट झाली होती. त्यानंतर तब्बल 3 वर्षांनी म्हणजेच ऑगस्ट 2006 साली प्रियाने उमेशला लग्नाची मागणी घातली होती. मात्र लग्नासाठी होकार असूनही उमेशने महिनाभर तिला काहीच उत्तर दिलं नव्हतं. अखेर प्रियाच्या वाढदिवशी त्याने प्रियाला लग्नासाठी होकार दिला. उमेश 2006 सालापर्यंत चित्रपटसृष्टीत तसा स्थिरावला नव्हता. त्यामुळे प्रियाच्या घरातून त्यांच्या लग्नाला नकार होता. मात्र दोघांना ही आई-बाबांच्या विरोधात जायचं नव्हतं. त्यामुळे चार ते पाच वर्षे त्यांनी वेळ घेतला आणि आई-बाबांची समजूत घातली. अखेर 2011 च्या ऑक्टोबरमध्ये त्यांचं शुभमंगल झालं.
इमेज सोर्स – इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/priyabapat/