अनेक प्रसिद्ध अभिनेता अथवा अभिनेत्रींची मुले – मुली मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवत असतात. त्यातील काही खूपच प्रसिद्ध होतात तर काही एकाच चित्रपटानंतर गायब होतात. मराठी इंडस्ट्रीतही अनेक अभिनेते अथवा अभिनेत्री आहेत जे आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीमध्ये पाय रोवताना दिसतात. नुकतीच सुरू झालेली तू तेव्हा तशी (Tu Tevha Tashi) मालिका प्रेक्षकांना आता हळूहळू आवडू लागली आहे. शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar), स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) अशी तगडी कलाकार मंडळी या मालिकेतून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एक वेगळा विषय आणि सहज अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडू लागली आहे. तर यातील राधा अर्थात रूमानी खरे (Roomani Khare) देखील सर्वांना आवडू लागली आहे. पण रूमानी एका प्रसिद्ध कवीची मुलगी आहे हे फारच कमी जणांना माहीत आहे.
संदीप खरे यांची मुलगी रूमानी
संदीप खरे (Sandeep Khare) हे नाव नक्कीच महाराष्ट्राला नवं नाही. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे गेले अनेक वर्ष मराठी इंडस्ट्री गाजवत आहेत. तर रूमानी खरे ही संदीपची मुलगी आहे. राधा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूमानी ही संदीप खरे यांची मुलगी असल्याची माहिती फारच कमी जणांना आहे. सध्याच्या तरूण पिढीचं प्रतिनिधित्व करणारी ही भूमिका आहे आणि रूमानी ही भूमिका खूपच चांगली साकारत असल्याचं सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिसादावरूनही दिसून येत आहे. अभिनयाची आवड असल्यामुळे रूमानीने एस. पी. कॉलेजमध्ये (S. P. College, Pune) एकांकिकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. याशिवाय रूमानी एक उत्तम कथ्थक नृत्यांगनाही आहे. सहज ऑडिशनला गेल्यानंतर तिची या मालिकेसाठी निवड झाली. वडिलांना लहानपणापासून बघत आल्यामुळे तिच्या या करिअरला एक वेगळीच मदत मिळाल्याचे एका मुलाखतीमध्ये रूमानीने सांगितले आहे. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित पालक असल्यामुळे यातील कामाची वेळ, उत्पन्नाची अनिश्चितता, यातील विविध समस्या, तसंच अचानक एखादी मालिका बंद होणे अशा सर्व समस्यांबाबत आधीपासूनच माहीत असल्याने अगदी मनाची तयारी करूनच या क्षेत्रात आल्याचेही रूमानीने म्हटले आहे.
रूमानीने बालकलाकार म्हणून केले काम
मराठी चित्रपट ‘चिंटू’ मधून रूमानीने बालकलाकार म्हणून सुरूवात केली होती. यामध्ये नेहा नावाची भूमिका तिने साकारली होती. त्यामुळे तिला कॅमेऱ्यासमोर काम करण्याचा चांगला अनुभव आहे. तसंच तिचे या चित्रपटातील काम प्रेक्षकांनाही आवडले होते. वडील संदीप खरे आणि आई सोनिया या दोघांनीही तिला नेहमीच तिच्या कामासाठी प्रवृत्त केले असल्याचेही तिने सांगितले आहे. तर सध्या तिला राधा या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तरूणाईमध्ये असणारा अल्लडपणा आणि तितकाच राधामधील निरागसपणा आणि समजूतदारपणा या सगळ्याचा मेळ रूमानीने आपल्या अभिनयातून योग्य पद्धतीने मांडला आहे. त्यामुळे आजच्या पिढीतील मुली अशाच आहेत हे तिने या भूमिकेतून पक्के दर्शविले आहे. कवी आणि गीतकार असणाऱ्या संदीप खरेची अनेक गाणी मोठमोठ्या गायिकांनीही गायली आहेत. तसंच संदीप खरेचं नाव आता रूमानी मोठे करत आहे यात काहीच शंका नाही. पण केवळ संदीप खरेची मुलगी नाही तर रूमानी आपले स्वतःचे नावही तिच्या कामाने मोठे करत आहे हे नक्की!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक