घरी कोणी पाहुणे येणार म्हटल्यावर आपण छान चमचीत पदार्थांचा बेत करतो. त्या दिवशी वाढलेले पान हे खास असते. कारण आपण अगदी स्टाटर्सपासून आपण सगळं सर्व्ह करतो. देशाच्या वेगवेगळ्या भागात थाळीची परंपरा आहे. थाळी ही परंपरा खरंतरं पंजाब, उत्तर प्रदेश भागाचे वैशिष्ट्य पण महाराष्ट्रीयन थाळीची चवच काही न्यारी आहे. व्हेज असो किंवा नॉन व्हेज सगळे पदार्थ एकदम खास असतात. तुम्ही ही अद्याप खरीखुरी महाराष्ट्रीयन थाळी खाल्ली नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रीयन थाळीबद्दल जाणून घेण्याची गरज आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रीयन व्हेज आणि नॉन व्हेज थाळीबद्दल . मग करुया सुरुवात
प्रसादाचा शिरा परफेक्ट तेव्हाच होतो जेव्हा…
भारताच्या वेगवेगळ्या भागात तुम्हाला वेगवेगळी खाद्य संस्कृती अनुभवता येईल. महाराष्ट्रातही अगदी काही फुटांवर तुम्हाला जेवण करण्याची वेगळी पद्धत दिसून येईल. जसे वेगवेगळे पदार्थ तसे ते खाण्याची आणि वाढण्याची पद्धत वेगळी. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे व्हेज (veg) आणि नॉन व्हेज (Non veg) असे थाळीचे दोन प्रकार मिळतात. व्हेज थाळीमध्ये तुम्हाला चटणी, पापड, लोणची ते वरण भातापर्यंत सगळे पदार्थ वाढलेले दिसतील. तर तुम्हाला नॉन व्हेज थाळीमध्ये कोशिंबीर, कांदा, भाकरी/ पोळी, फिश फ्राय, चिकन, मटण असे पदार्थ असतात. जरी आपण सांग्रसंगीत थाळी रोज वाढत नसलो तरी आपल्याकडे थाळीमध्ये असे वेगवेगळे पदार्थ असतात.
महाराष्ट्रात मिळणाऱ्या व्हेज थाळीमध्ये ही तुम्हाला विविधता दिसेल. कोकणात बनणारे आणि देशावर बनणारे पदार्थ हे चवीला वेगवेगळे असले तरी तुम्ही एकदा तरी चाखावे असे असतात. पाहुया महाराष्ट्रात मिळणाऱ्या या महाराष्ट्रीय व्हेज थाळी
सगळ्यात आधी सुरुवात करुया कोकणातील व्हेज थाळीने कारण सणांच्या दिवसांमध्ये कोकणातील थाळीमध्ये चमचमीत पदार्थ येतात. आता कोकण किनारपट्टी जितकी मोठी तितकीच तुम्हाला येथील खाद्यसंस्कृती दिसून येईल. पण सर्वसाधारणपणे कोकणातील थाळीमध्ये तुम्हाला दिसून येईल तो म्हणजे वरण भात. अगदी खोबऱ्याच्या चटणीपासून या थाळीची सुरुवात होते. कोकणात आंबे होत असल्यामुळे कैरी घालून ही खोबऱ्याची चटणी वाटली जाते. चवीसाठी लोणचं, बटाट्याची भजी/ केळीची काप/ सुरणाची काप किंवा तळणीचे पदार्थ असतात. सोबत उसळ एखादी पालेभाजी… त्या सोबत भाकरी,पुरी किंवा चपात्या असतात. भाताची मूद त्यावर डाळ आणि एखादा गोड पदार्थ आता गोड पदार्थ ही सणानुसार बदलतात. म्हणजे गणपतीच्या दिवसात या मोदक, इतर वेळी शिरा, गुळ खोबरं, पुरणपोळी, आम्रखंड, रस घावण, सातपाती घावणं, शिरवळ्या असे काही गोड पदार्थदेखील असतात.
कोल्हापूर ऐकल्यानंतरच तुम्हाला मिरचीचा ठसका बसायलाच पाहिजे. शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचा वापर करुन हे जेवण बनवले जाते. जर तुमचे कोणी कोल्हापुरी मित्र असतील तर तुम्ही त्यांच्या जेवणाच्या वेगळेपणाबद्दल नक्कीच ऐकले असेल. आता कोल्हापुरी थाळीमध्ये काय येतं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर यामध्ये कोल्हापुरी पद्धतीच्या भाज्या, ठेचा, भाकरी, कांदा, नावाला भात आणि आमटी असे पदार्थ तुम्हाला या सोबत मिळतील. अनेक ठिकाणी तुम्हाला शेगंदाण्याची चटणी, कारळाची चटणी असे काही पदार्थही मिळतील.
आता व्हेज थाळीमध्ये मिळणारा आणखी एक प्रकार म्हणजे उपवासाची थाळी. जर तुम्ही आतापर्यंत कोठेही उपवासाची थाळी चाखली नसेल तर आम्हाला सांगायला आवडेल की, इतर कोणत्याही दिवसांपेक्षा तुमची उपवासाची थाळी ही नेहमीच छान भरलेली असते. यामध्ये सात्विक आणि चविष्ट असे प्रकार येतात. उपवासाची थाळी तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला एकाचवेळी अनेक पदार्थ करावे लागतील. म्हणजे शेंगदाण्याची आमटी, वरी तांदूळाचा भात, साबुदाण्याची खिचडी, उकडलेले रताळे, केळे, तळलेला बटाटा, उपवासाचे थालीपीठ असे काही खास आणि चमचमीत (उपवासाचे) पदार्थ तुम्हाला यामध्ये वाढता येतील. अशा पद्धतीच्या थाळी अनेक ठिकाणी उपवासाच्या काळात मिळतात.
पुणेरी थाळीबद्दल तुम्ही अगदी हमखास ऐकले असेल. आता पुणेरी म्हटल्यावर त्यात संपूर्ण पुण्याची छबी उतरायलाच हवी. पुणेरी थाळीमध्ये इतर कोणत्याही थाळीसारखे तुम्हाला पदार्थ दिसतील. म्हणजे भाजी, पोळी, आमटी, भात वगैरे वगैरे. पण पुणेरी थाळीमध्ये तुम्हाला कडधान्यांच्या उसळी जास्त दिसतील. मटकी, मूग, चवळी यांच्या पातळ भाज्या आमटी सदृश्य भाज्या असतात. येथे डाळी फारच कमी वाढल्या जातात. त्यामुळे तुम्ही एक सुकी भाजी एक रस्सा भाजी पुणेरी थाळीमध्ये वाढू शकता.सोबत चपात्या किंवा भाकरी, कांदा, लिंबू, लोणचं, दही असे दिले जाते. पुण्यात अनेक ठिकाणी हल्ली मोठ मोठया थाळ्या वाढण्याची पद्धत आहे. पण तरी सुद्धा मूळ पुणेरी थाळी तुम्हाला अगदी साधी ठेवता येईल. विशेष म्हणजे तुम्हाला यात जर काही वापरावा लागेल तो म्हणजे पुणेरी मसाला.
गुढीपाडव्यासाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा
श्रावण थाळी हा प्रकार तुम्हाला थोडा नवा नक्कीच वाटला असेल.पण साधारण ऑगस्ट महिन्यात श्रावण सुरु झाला की, वेगवेगळ्या भाज्या बाजारात दिसू लागतात. कंटुळ,अळू, कुरडू, टाकळा अशा काही भाज्या येतात. या दिवसात तुम्ही सगळ्या हिरव्या भाज्या खाल्ल्या जातात. आता तुम्ही या भाज्यांपासून तुम्हाला आवडेल तशी रेसिपी करु शकता. म्हणजे अनेक जण अळूचे फदफदे तयार करतात. अळूची एकप्रकारे केली जाणारी ही रसभाजी या भाजीमध्ये शेंगदाणे, चणे, मके, काळे वाटाणे घातले जातात. अळू पासून अळू वडी केली जाते. श्रावण थाळी घरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सुकी पालेभाजी, रस्सा भाजी, एखादा तळणीचा पदार्थ उदा. कोथिंबीर वडी, मिरची वडा वगैरे, भाकरी किंवा पोळी असे वाढू शकता.
जळगावकडील पदार्थांची चवही फार न्यारी असते. जळगाव म्हणजे सगळे खान्देशी पदार्थ यामध्ये समाविष्ट करण्यात येतात. शेव भाजी, वांगी भात, खान्देशी खिचडी, वांग्याची भाजी, टोमॅटोची भाजी, शेंगदाण्याची चटणी, डाळ वाफळे, काळणची भाकरी (मिक्स भाकरीचा प्रकार), डाळ गंडोत्री असे वाढले जाते. तुम्ही गुगल केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट खान्देशी जेवणात दिसेल ते म्हणजे गोड जिलेबी. या ठिकाणी बनणाऱ्या मावाच्या जिलेबी फारच प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला कधी तरी खान्देशी चवीचे खायचे असेल तर तशा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करुन पाहा.
महाराष्ट्रात नॉन व्हेज (Non veg) पदार्थ बनवण्याचीही वेगळी पद्धत आहे. नॉन व्हेजमध्ये तुम्हाला मासे, चिकन आणि मटण असे प्रकार मिळू शकतात. प्रत्येक ठिकाणी हे पदार्थ बनवण्याची पद्धतही वेगळी असते. पण सर्वसाधारणपणे तुम्हाला नॉन व्हेज थाळीमध्ये काही खास पदार्थ वाढले जातात. हे पदार्थ कोणते ते देखील पाहुया.
चिकन म्हटले की, मालवणी चिकन हे पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येते. जर तुम्ही मालवणी चिकन खाळी चाखली नसेल तर तुम्ही चिकन प्रेमी असून काहीच खाल्ले नाही असे म्हणावे लागेल. ओल्या खोबऱ्याच्या वाटपामध्ये हे चिकन बनवले जाते. चिकन थाळीमध्ये तुम्हाला वडे, भाकरी, चपाती असा पर्याय असतो. कोकणात भात आवर्जून खाल्ला जातो. त्यामुळे सोबत भात, कांदा, लिंबू दिला जातो. या शिवाय तुम्हाला मालवणात सुकं चिकन आणि ग्रेव्ही अशा दोन स्वरुपातही ते सर्व्ह केले जाते. चिकन पचण्यासाठी सोलकढी सुद्धा या ठिकाणी दिली जाते. सोलकढी रेसिपी खरंतर नॉनव्हेज थाळीमुळेच प्रसिद्ध आहे. जी तुम्ही घरच्या घरी करु शकता.
तुम्ही बनवलेले कांदे पोहे होतील परफेक्ट तेही दोन मिनिटात, वाचा कसे
कोकण किनारपट्टी असल्यामुळे या ठिकाणी मासेही खूप मिळतात. जर तुम्हाला माशांची थाळी बनवायची असेल. तर तुम्ही तुमच्या थाळीमध्ये फिश फ्राय, माशांची कढी, चपाती किंवा भाकरी, कांदा लिंबू असे पदार्थ वाढू शकता. सर्वसाधारणपणे मालवणी फिश थाळीमध्ये सुरमई, बांगडा, कोळंबी, बोंबील,पापलेट, हलवा असे मासे असतात. या शिवाय तुम्हाला यामध्ये तिसऱ्या (शिंपल्या), खेकडे असे सीफूडही दिले जाते. त्यामुळे तुम्ही घरी एकाच वेळी अनेक पदार्थांचा घाट घालू नका. जर तुम्ही कोळंबी फ्राय करणार असाल तर दुसऱ्या लहान माशांची ग्रेव्ही करा. कोकणात शक्यतो लहान माशांची कढी केली जाते. तुम्ही कोळंबी, मोदकं अशा माशांची कढी करु शकता. तर दुसरे मोठे मासे तुम्ही फ्राय करु शकता. कोळंबी हा असा मासा आहे जो सगळ्यांना आवडतो तुम्ही कोळंबीपासून वेगवेगळ्या कोळंबी रेसिपी बनवू शकता.
कारवारी जेवणाचा प्रकारही थोडासा कोकणाकडे जाणारा असतो. या प्रकारामध्ये तुम्हाला खोबऱ्याचा वापर दिसेल खरा पण हे बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यामुळे याची चवही वेगळी लागते. मटण ग्रेव्हीमध्ये मॅरिनेट झालं की छान लागतं. भाकरी, चपाती कशासोबतही तुम्हाला ते खाता येईल. कारवारी मटणाचा रस्सा भातासोबत तर आणखी छान लागतो. चापूनचोपून मटणाचा रस्सा आणि भात खाल्ला की, पोटही भरल्यासारखे वाटते. जर तुम्ही कारवारी मटण खाणार असाल तर ते भातासोबत नक्की खा.
नागपुराची खासियत आहे ती म्हणजे सावजी मटण थाळी, सावजी चिकन आणि मटण दोन्ही मध्ये मिळते. सावजी या मसाल्याच्या नावावरुनच या पदार्थाला नाव देण्यात आले आहे. सावजी थाळी ही जास्त करुन पोळी सोबत सर्व्ह केली जाते. सोबत कांदा, मुळा दिला जातो. सावजी चिकनच्या थाळीमध्ये तुम्हाला रस्सा आणि फोडी दिल्या जातात. तुम्हाला एक्स्ट्रा ग्रेव्हीसुद्धा यामध्ये दिली जाते. सावजी चिकन किंवा मटणाचा रस्सा दिसायला काळा असतो. याची चव तुम्हाला थोडी मातकटआणि तिखट लागते. त्यामुळे तुम्ही तिखट खाणारे नसल तर जर बेतानेच तुम्हालाही ग्रेव्ही घ्यावी लागते. तुम्ही सावजी मटण करणार असाल तर तुम्हाला त्याचा मसाला योग्य जमायला हवा. या थाळीत तुम्हाला फार काही पदार्थ वाढायचे नसतात.
आता खरडा हा मिरचीचा असतो हे तुम्हाला माहीत असेलच. हे चिकन तुम्हाला थोडे तिखट लागेल. याची ग्रेव्ही फार जाड नसते. तर ती अगदी लाईट असते. म्हणजे तुम्ही ते स्टाटर्स सारखेही खाऊ शकता. जर हे थोडं ग्रेव्हीमध्ये असेल तर तुम्हाला ते पोळी किंवा भाकरीसोबत खाता येते. अस्सल गावरान अशी ही रेसिपी आहे. जी तुम्ही मस्त भारकीसोबत खाऊ शकता. खर्डा चिकन करायला फारच सोपे आहे. तुम्ही त्याची रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच. एखाद्या रविवारी अशा पद्धतीचे चिकन, भाकरी, कांदा यावर ताव मारा.
आता वऱ्हाडकडील स्पेशालिटी असलेले वऱ्हाडी चिकन तुम्ही अगदी आवर्जून खावे असे आहे. आपल्या येथे वेगवेगळ्या ठिकाणी मिळणाऱ्या मसाल्यांची चव ही वेगळीच असते. वऱ्हाडी चिकन बनवताना त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो. खोबऱ्यासोबत या मसाल्यामध्ये खड्या मसाल्याचा वापर केला जातो. त्यामुळे चिकनमध्ये याचा स्वाद पुरेपूर उतरतो. वऱ्हाडी चिकन भाकरी सोबत सर्व्ह केले जाते. गावरान चिकनचा हा दुसरा प्रकार आहे
बारामतीमध्ये मिळणारे मटणही खास असते बरं का. येथे बनणारा रस्सा हा तिखट असतो.मटण सुका, मटण ग्रेव्ही सोबत मस्त भाकरी दिली जाते. मटणासोबत कांदा असेल तर या थाळीची चव आणखीच वाढते.सुक्या खोबऱ्याच्या वाटपामध्ये असलेला हा मटण रस्सा चमचमीत असतो कारण यामध्य खड्या मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळेच त्याला एक तिखटपणासुद्धा येतो. चिकन किंवा मटणाच्या कोणत्याही रेसिपी खूप पदार्थांसोबत शेअर केल्या जात नाही. म्हणजे भाकरी, भात आणि सॅलेडशिवाय यामध्ये फार काही नसते. अनेक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बारामती पद्धतीचे मटण चाखायला मिळेल. पण तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करुन पाहा.
तुम्हाला उत्तम महाराष्ट्रीय थाळी कुठे मिळेल?
महाराष्ट्रात वेगवेगळे जिल्हे आहेत. या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात. त्यानुसार थाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ येतात. कोकणातील, घाटावरील थाळीमध्ये विविधता असते. मुंबई आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला अशा चांगल्या आणि उत्तम चवीच्या थाळी मिळू शकतील. मुंबईमध्ये सुजाता (गिरगाव), पणशीकर, गोमांतक(नॉनव्हेज), पंडीत किचन( डोबिंवली) अशी काही ठिकाणं आहेत.जिथे तुम्हाला उत्तम थाळी मिळू शकेल.
थाळी कशी वाढली जाते ?
तुम्ही जर कधी व्हेज थाळी खाल्ली असेल तर तुम्ही ही थाळी विशिष्ट पद्धतीने वाढताना पाहिले असेल म्हणजे चटणी, लोणचं, पापड,कोशिंबीर, भजी थाळीच्या डाव्या बाजूला वाढल्या जातात. भाज्या उजव्या बाजूला वाढली जाते. ताटाच्या मध्ये भाताची मूद, पोळी, लिंबू वाढले जाते. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रीयन थाळी वाढण्याची ही एक पद्धत आहे. पण तुम्हाला थाळी वाढण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती दिसतील.
गुढीपाडव्याची माहिती आणि महत्त्व
महाराष्ट्रीयन पदार्थ तिखट असतात का?
महाराष्ट्रातील सगळ्याच ठिकाणी तुम्हाला तिखट जेवण मिळेल असं नाही. देशावरील काही भाग वगळता तुम्हाला सौम्य जेवण चवीचे जेवणसुद्धा मिळू शकते. पण महाराष्ट्रातील काही पदार्थ हे झणझणीतच चांगले लागतात. त्यामुळे तुम्ही त्यांचा आहे तसा आस्वाद घ्यायला हवा. कारण तरचं तुम्हाला त्याची खरी चव चाखता येईल.
आता तुम्ही थाळी खायला जाणार असाल किंवा घरी बनवणार असाल तर या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.