मराठी अभिनेत्री वीणा जामकर सध्या एका हिंदी चित्रपटामध्ये काम करत आहे. वीणाने नुकतंच इन्स्टावरुन तिच्या एका गंभीर फोटोसह “ती एका नवीन भूमिकेसाठी तयार होतेय” असं शेअर केलं आहे. या पोस्टवरुन सिनेमाचं नाव कदाचित ‘मयसभा’ असण्याची शक्यता आहे. हा चित्रपट हिंदी असून या पोस्टवरुन तो ‘राही अनिल बर्वे’ दिग्दर्शित असेल असं वाटत आहे. या पोस्टमधील वीणाचा लुक फारच गंभीर दिसत आहे. तसंच तिचे ‘हे’ गहिरे आणि घारे डोळे बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असं वाटतंय. वीणाच्या या गंभीर आणि नेहमीपेक्षा वेगळ्या लुकवरुन कदाचित हा सिनेमा भयपट अथवा रहस्यपट असेल असं वाटत आहे. मयसभा या नावावरुन कदाचित यात वीणाच्या भूमिकेला दुःखाची झालर देखील असण्याची शक्यता आहे. राही अनिल बर्वे यांचं नाव जोडल्यामुळे आणि वीणाच्या या गंभीर लुकमुळे हा सिनेमा कसा असेल आणि त्यामध्ये वीणाची नेमकी काय भूमिका असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
वीणाच्या भूमिकांमधील निराळ्या छटा
वीणाने अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. गाभ्रीचा पाऊस, जन्म, लालबागपरळ,वळू, विहीर अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाचं कौतुकच झालं आहे. वीणाच्या भूमिका नेहमीच वेगळ्या धाटणीच्या असतात. तिच्या ‘पलतडचो मुनिस’ या कोकणी चित्रपटाचं बर्लिन चित्रपट महोत्सवात कौतुक झालं आहे शिवाय टोरॅन्टो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचे पारितोषिकदेखील मिळाले आहे.वीणाची आता ‘मयसभा’मधील भूमिका देखील जरा वेगळीच असेल असं वाटतंय.
‘मयसभा’ भयपट असण्याची शक्यता
राही अनिल बर्वे हे बॉलीवूडचे एक सक्षम लेखक आणि दिग्दर्शक आहेत. ‘तुंबाड’ या भयपटाने त्याचं दिग्दर्शन कौशल्य जगासमोर आलं. तुंबाड हा सिनेमा तांत्रिकदृ्ष्या अतिशय उत्तम होता. शिवाय तो इतर भयपटांपेक्षा वेगळा देखील होता. तुंबाडनंतर आता राहीचा आगामी चित्रपट कोणता असेल असं वाटत असतानाच ‘या’ पोस्टमुळे मयसभाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ज्यांना चित्रपटांमध्ये नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी पाहायला आवडतं त्यांच्यासाठी हा सिनेमा नक्कीच खास असेल.
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम