लॉकडाऊनमुळे सध्या घरात बसून सतत काहीतरी चमचमीत आणि स्वादिष्ट खाण्याची सवयच सर्वांना लागली आहे. खरंतर घरात असल्यावर साधं वरण भात, तूप, पापड आणि चटपटीत लोणचंही मस्त लागतं. ‘लोणचं’ असा शब्द उच्चारल्यावर अनेकांच्या तोंडाला सध्या पाणी सुटलं असेल. तोंडीलावण्यासाठी पानात आवडतं लोणचं असेल तर जीभ आणि पोट दोन्ही तृप्त होतं. पण तुम्हाला हे माहीत आहे का जीभेचे चोचले पुरवणारं हे लोणचं तुमच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. अगदी पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरात पणजी, आजी, आई वर्षभराचं लोणचं तयार करायची. त्यामागे अनेक शास्त्रीय कारणं दडली होती. यासाठीच जाणून घ्या घरी तयार केलेल्या या आंबट गोड चवीच्या लोणच्याचे नेमके काय आरोग्यफायदे आहेत.
Shutterstock
लोणच्याचे फायदे जाणून घ्या आहारतज्ञ्जांकडून
काही दिवसांपूर्वी सेलिब्रेटी आहारतज्ञ्ज रूतुजा दिवेकरने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ज्यात तिने घरी लावलेलं लोणचं खाण्याचे काही फायदे शेअर केले होते. तिच्या मते, “लोणचं तयार करणं ही एक पारंपरिक कला आणि शास्त्र आहे” कारण या पद्धतीने पूर्वीपासून अनेक फळं आणि भाज्या वर्षभर टिकवून ठेवली जायची. आपल्याकडे असलेला हा पारंपरिक आणि समृद्ध वारसा खरंतर आपण आजही जपून ठेवला पाहिजे. कारण घरी तयार केलेल्या या लोणच्यामध्ये अनेक पोषकतत्वं असतात. लोणच्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी लोणचं फार उत्तम असतं. लोणचं तयार होण्याच्या अथवा मुरण्याच्या प्रक्रियेत त्यात अनेक प्रोबायोटिक्स तयार होतात. जे शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात. लोणच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटिऑक्सिडंट मिळतात. लोणच्यातील हे प्रोबायोटिक जिवाणू शरीरातील हानिकारक विषाणूंना नष्ट करतात. ज्यामुळे आजारपणापासून तुमचं रक्षण होतं. मग एवढे आश्चर्यकारक फायदे असलेल्या लोणच्याचा आजपासूनच तुमच्या आहारात समावेश करताय ना… मात्र लक्षात ठेवा लोणचं हे फक्त लोणच्याएवढंच खा, भाजीसारखं नाही. नाहीतर त्याचा फायदा होण्याएवजी नुकसानच होईल. म्हणूनच दररोज जेवणासोबत अर्धा चमचा लोणचं खाण्यास काहीच हरकत नाही. अगदी मधुमेही आणि ह्रदयविकार असलेली व्यक्तीदेखील कमी प्रमाणात लोणचं नक्कीच खाऊ शकते. तेव्हा लोणचं खा आणि मजेत राहा.
तुमच्या आजीचीच रेसिपी आहे बेस्ट
लोणचं आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असलं तरी ते फक्त घरीच तयार केलेलं असावं बाजारातून आणलेलं लोणचं फायदेशीर असेलच असं नाही. यासाठी पारंपरिक पद्धतीने आणि घरी तयार केलेलंच लोणचं खा . शिवाय आता तर लोणचं घालण्याचा सिझनच सुरू आहे. उन्हाळ्यात लोणचं व्यवस्थित मुरतं कारण ते मुरण्यासाठी लागणारं वातावरण याकाळात मुबलक असतं. म्हणूनच आता लॉकडाऊनमुळे तुम्ही सर्व जण घरात आहातच… तर या वेळेचा मस्त सदुपयोग करा आणि यंदा घरीच लोणचं तयार करा. मात्र लोणच्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ आणि तेलाचा वापर करा. नाहीतर तुमचं लोणचं बिघडू शकतं. प्रत्येकाची लोणचं तयार करण्याची पद्धत निरनिराळी असू शकते. यासाठी हे प्रमाण तुमच्या आईला अथवा आजीला विचारून घ्या म्हणजे यावर्षी तुम्हाला अगदी परफेक्ट लोणचं तयार करता येईल.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
अस्सल हापूस आंबे ओळखण्याची ही योग्य पद्धत
नाचणीपासून तयार केलेल्या ‘या’ सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज
ओट्स पासून तयार करा सकाळच्या नाश्त्यासाठी ‘या’ स्वादिष्ट रेसिपीज