सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर चांगली नोकरी, पगार आणि सुखसुविधा असणे गरजेचे असते. सगळ्या चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी थोडी मेहनत आणि जास्तीचा वेळ हा द्यावाच लागतो. पण असे करताना अनेकांना वेळापत्रकाची सांगड घालता येत नाही. त्याचा परिणाम हा अनेकदा नात्यांवर होऊ लागतो. नात्यात असताना प्रत्येकाला जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा ती किंवा तो दोघांकडून पूर्ण होणे अपेक्षित असते. हल्ली पुरुषच नाही तर महिला सुद्धा करिअरमध्ये फार बिझी असतात. त्यामुळे दोघांकडूनही नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तुम्हालाही या सगळ्यामध्ये नात्यात तणाव किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी आता घ्यायला हवी.
काम ऑफिसमध्ये घरी नाही
काम हे ऑफिसमध्ये ठेवून घरी केवळ आराम करण्यासाठी येणे हे हल्लीच्या दिवसात खूप जणांना कठीण झाले आहे. पण तरी देखील कामांची विभागणी आणि त्याचे योग्य टाईमटेबल बनवून तुम्ही नक्कीच तसा प्रयत्न करायला हवा. काम संपत नाही असे अजिबात नसते. त्या कामाचे नियोजन नसल्यामुळे काम होत नाही हे आधी मनाला पटवून द्या. कारण कोणतीही काम ही करण्याची एक नियोजित वेळ असते. ते त्याच वेळी संपवले तर त्याचा ताण पुढे येत नाही. त्यामुळे घर आणि इतरांना वेळ देण्यासाठी तुम्ही टाईमटेबल आखा. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होण्यास मदत मिळेल.
एक वीकेंड फक्त बोलायला
वीकेंड हा आराम करायला असतो. पण ज्यावेळी आपण एखाद्या नात्यात असतो. तेव्हा केवळ तुमचा विचार करुन चालत नाही. तुम्हाला इतरांचाही विचार करणे फारच गरजेचे असते. त्यामुळे वीकेंडला तुमच्या शरीराला आराम मिळण्यासाठी तुम्ही झोपा काढण्याचा विचार करत असाल तर तर उरलेला वेळ तरी तुमच्या आवडीच्या लोकांना द्या. थोडासा वेळ जरी तुम्ही तुमच्या आवडीच्या लोकांना दिला तर त्यांना नक्कीच आनंद होईल. फोनला चिकटून राहण्यापेक्षा किंवा टीव्ही पाहण्यापेक्षा तुम्ही एकमेकांशी बोलण्यात वेळ घालवा. आठवड्याभरात काय केेले? काय घ्यायचे आहे? कुठे बाहेर जायचे आहे का? असे सगळे बोलण्यामुळे इतरांच्या इच्छा आणि आकांक्षा कळतात.
वॉक करा
तुम्हाला बाहेर जायला वेळ नसेल किंवा जायचे नसेल तर तुम्ही एकत्र वॉक करायला गेलात तरी अनेक गोष्टी बोलता येतात. थोडासा फोन बाजूला ठेवून इतरांशी थोडेसे बोलणे झाले किंवा हातात हात घालून जर तुम्ही थोडे जरी फिरलात तरी देखील एक कनेक्ट निर्माण होतो. त्यामुळे शक्य असेल तेव्हा रोज थोडासा वेळ काढून तरी वॉक करायला जा. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
आता तुमच्या बिघडलेल्या टाईमटेबलला दोष देण्यापेक्षा तुम्ही नक्कीच तुमच्यातील काही सवयी बदलण्याचा निर्णय योग्यवेळी घ्या.
अधिक वाचा
घटस्फोट नक्की का होतात, काय आहेत कारणे
आलेल्या स्थळातून तुमच्यासाठी परफेक्ट वर/वधू निवडताना