प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित आणि मिरॅकल्स फिल्म निर्मित ‘युथट्युब’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ‘युथट्युब’ चित्रपट तरुणाईवर आधारित असून आजची तरुण पिढी आणि युवांचे आकर्षणाचे विषय या चित्रपटातून दाखवण्यात आले आहेत. कॉलेजचे अविस्मरणीय आणि मोहवणारे दिवस, त्यातून निर्माण होणारी प्रेमाची भावना या चित्रपटात आपल्याला पाहता येणार आहे. सध्याची तरुण पिढी आणि सोशल मीडिया यांचं असलेलं अतूट नातंदेखील या चित्रपटातून अगदी वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे. यासोबतच आधुनिक जगात वावरत असतानादेखील समाजाचा आजही स्त्रीकडे पाहण्याचा कलुषित दृष्टीकोन आणि त्यातून समाजाकडून स्त्रीवर वारंवार होणारा अत्याचार या ‘संवेदनशील’ विषयाला या चित्रपटात हात घालण्यात आला आहे.
शिवानी बावकर प्रमुख भूमिकेत
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत लागीरं फेम ‘शिवानी बावकर’ झळकणार आहे. छोट्या पडद्यावरील लागीरं झालं जी या मालिकेतून शिवानीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिवानी पहिल्यांदाच युथट्युबमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यामुळे “लाखात एक माझा फौजी” म्हणत प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी शिवानी आता मोठ्या पडद्यावर अभिनयाची काय कमाल दाखवणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवानी बावकरवर चित्रीत करण्यात आलेलं युथट्युबमधील प्रेमगीत रिलीज झालं होतं. या गाण्यामध्ये आपल्याला शिवानीचा अगदी रोमॅंटिक अंदाज पाहता आला. ‘रुमझुम रुमझुम स्वप्नांची झांजरं मनात रोजच शंभर पाखरं…’ हे प्रेमगीत गीतकार शिल्पा देशपांडेने लिहीलं आहे. या चित्रपटातील इतर गीतांना संगीतबद्ध केलं आहे ‘पंकज पडघण’ यांनी तर ‘मधुराणी प्रभुलकर, शिल्पा देशपांडे,सायली कुलकर्णी’ यांनी यासाठी गीतं साकार केली आहेत. या गीतांना आर्या आंबेकर,सायली पंकज, सागर फडके आणि शिखा अजमेरा यांनी या ‘स्वरसाज’ चढवला आहे.
सध्या कॉलेज जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती
कॉलेजच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट सध्या येत आहेत. कॉलेज जीवन हे आनंद आणि उत्सहाने रससलेलं असतं. त्यामुळे या काळात अनेक नवीन वळणांवर तरुणपिढीला सामोरं जावं लागतं. शिवाय काहिही कळत नसतानाच्या वयात आपल्याला सारं काही कळतं अशी भावना तरुणांमध्ये असते. करियर आणि प्रेम या आयुष्यातील अतिशय महत्वाच्या गोष्टींनादेखील याच काळात तरुणांना सामोरं जावं लागतं. कॉलेज जीवनात ‘मैत्री’तर अगदी ऑक्सिजनसारखं काम करत असते. कॉलेज डायरी आणि युथट्यूब हे तरुणांच्या जीवनावर आधारित चित्रपट सध्या प्रदर्शनच्या वाटेवर आहेत. भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्स फिल्मक्राफ्ट्स प्रस्तुत आणि अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित ‘कॉलेज डायरी’ हा मराठी चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉलेज डायरी चित्रपट 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तर युथट्युब एक फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या दोन्ही चित्रपटातून नेमकं काय तरुणपिढीला या फेब्रुवारीत गवसणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम