व्हॅलेंटाईन डे ला येणार अभिनय बेर्डेचा ‘अशी ही आशिकी’

व्हॅलेंटाईन डे ला येणार अभिनय बेर्डेचा ‘अशी ही आशिकी’

आतापर्यंत प्रेमावर असंख्य चित्रपट येऊन गेले आहेत. तरीही प्रेम म्हटलं की, कोणताही चित्रपट बघावा वाटतोच. पण मराठीमध्ये असे चित्रपट फारच कमी प्रमाणात पाहायला मिळाले आहेत. वास्तविक 'आशिक' आणि 'आशिकी' हे दोन शब्द जरी उच्चारले तरी ‘लैला-मजनू’, ‘रोमिओ-जुलिएट’ यांसारख्या रोमँटिक आणि प्रेमळ जोड्या आणि त्यांची लव्हस्टोरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आशिकी म्हटलं की प्रेमातला वेडेपणा, जीव ओतून समोरील पार्टनरला खूष करण्याचे प्रयत्न या गोष्टी हक्काने येतातच. अशीच आशिकी आता मराठीत पाहायला मिळणार आहे. अभिनय बेर्डे या चित्रपटात प्रमुख भूमिका करणार असून सचिन पिळगावकर बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शन करत आहेत. ‘अशी ही आशिकी’ हा मराठी चित्रपट येत्या नव्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.


IMG-20181222-WA0066
गेल्या वर्षी केली होती घोषणा


गेल्यावर्षी सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रिटर्न गिफ्ट म्हणून या चित्रपटाची घोषणा केली होती. ‘अशी ही आशिकी’ हा चित्रपट अनेक कारणांसाठी स्पेशल ठरणार आहे. सचिन पिळगावकर जवळपास 5 वर्षांनी पुन्हा दिग्दर्शन करणार असून पहिल्यांदाच त्यांचा जवळचा मित्र लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात लक्ष्या यांचा मुलगा अभिनय बेर्डे याच्याबरोबर काम करणार आहेत. शिवाय या चित्रपटाचं टायटल हे रोमँटिक असून पहिल्यांदाच टी - सिरीजदेखील मराठीतून पदार्पण करत आहे. अभिनय हा हिरो असला तरीही या चित्रपटाची हिरॉईन कोण आहे हे मात्र अजून गुलदस्त्याच आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. मात्र यामध्येदेखील हिरॉईनचा चेहरा स्पष्ट दाखवण्यात आला नसल्यामुळे प्रेक्षक सध्या अंदाज बांधत आहेत. बऱ्याच जणांना ती केतकी माटेगावकर असल्याचंही वाटत आहे. सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनयने आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाची चुणूक दाखवून दिल्यामुळे त्याच्याकडूनही प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. शिवाय सचिन पिळगावकर यांचं दिग्दर्शन हे मराठी प्रेक्षकांना नेहमीच भावलं आहे. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये नक्की वेगळं काय असणार याचीही उत्सुकता आहे.


टी-सिरीजची निर्मिती


‘अशी ही आशिकी’ची निर्मिती टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या चित्रपटाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुद्धा या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शनासोबत सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर कथा-पटकथा-संवाद देखील सचिन यांनीच लिहिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट सर्वस्वी सचिन पिळगावकर यांचा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यापूर्वीदेखील असे बरेच मराठी चित्रपट सचिन पिळगावकर यांनी केले आहेत. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये पुन्हा काय धमाल असणार आहे हे लवकरच कळेल. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.