‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकरच्या भूमिकेतून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविडची नुकतीच ‘Veerangna’ ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली. या शॉर्टफिल्मला पॅरिसमधील मानाच्या फिक्टिव्हा फिल्म फेस्टिव्हलकडून आमंत्रण आलं आहे. पॅरिस फिक्टिव्हा फेस्टिव्हलमध्ये सिलेक्ट झालेली Veerangna ही भारतातली एकमेव शॉर्ट फिल्म आहे.
देशासाठी स्वार्थत्याग करणाऱ्या ‘Veerangna’
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर युट्यूबवर आलेली Veerangna ही शॉर्टफिल्म सीमेवर धारातिर्थी पडणा-या सैनिकांच्या वीरपत्नींविषयीची आहे. जी गरोदर असून आपला पोटातील बाळासोबत संवाद साधते आणि अचानक दारावरची बेल वाजते. आपले पतीच आल्याच्या आनंदात ती वीरपत्नी दार उघडते. मात्र बातमी येते ती नवऱ्याच्या शहीद होण्याची. तिला आधी रडू येतं पण थोड्यावेळाने देशभूमीचा विचार करून तिच्या दुःखाचं रूपांतर आनंदात होतं. अशी ही शहीद झालेल्या सैनिकाची पत्नी म्हणजेच Veerangna. या शॉर्टफिल्मविषयी सांगताना आदिती म्हणाली,“Veerangna म्हणजे धाडसी स्त्री. मी या लघुपटात एका सैनिकाच्या पत्नीच्या व्यक्तिरेखेत आहे. देशाचं रक्षण करण्यासाठी भारतीय सेना अहोरात्र सीमेवर तैनात असते. आपल्या जीवाची तमा न बाळगता लढणा-या या सैनिकांना मानसिक बळ देण्याचं काम त्यांचे कुटूंबिय करतात. हे कुटूंबिय खरंतर आपले ‘अनसंग हिरोज’ आहेत. प्रत्येक सैनिक हा कोणाचा तरी पिता, मुलगा, पती असतो. पण आपली वैयक्तिक कर्तव्य बाजूला ठेवून देशरक्षणाचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडण्याऱ्या सैनिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असतात ते त्यांचे कुटुंबीय. देशासाठी स्वार्थत्याग करणा-या वीरपत्नींना आम्ही या शॉर्टफिल्ममधून श्रध्दांजली अर्पित केली आहे.”
संवादाविना व्यक्त होणारी ‘Veerangna’
मुख्य म्हणजे या लघुपटाची संपूर्ण संकल्पना ही अभिनेत्री आदिती द्रविडची आहे. फिक्टिव्ह फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाल्याबद्दल आदितीने आनंद व्यक्त केला. “ या लघुपटात एकही संवाद नाही. या शॉर्टफिल्ममध्ये पार्श्वसंगीताच्या अनुषंगाने अभिनय करायचा होता आणि जे काही होतं ते डोळ्यातून व्यक्त करायचं होतं. अभिनेत्री म्हणून हे एक चॅलेंज होते. प्रेक्षकांकडून युट्यूबवर रिलीज झालेल्या या फिल्मला भरघोस प्रतिसाद मिळाला. एवढंच नाही तर मानाच्या समजल्या जाणा-या फिक्टिव्हकडून आमंत्रण आल्याने मला अतिशय आनंद झाला आहे.”
यंदा 12 आणि 13 एप्रिलला फेक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलं आहे. टायनी टॉकीज आणि मुक्तायन निर्मित, आर आर व्हिजन प्रस्तुत सागर राठोड दिग्दर्शित ‘Veerangna’ या लघुपटाला सई-पियुषने संगीत दिलं आहे. पाहा ही अंगावर काटा आणणारी आणि त्याचवेळी डोळ्यात आनंदाश्रू आणणारी ‘Veerangna’.