स्कंदपुराणातील विवाह खंडात सत नारायण भगवान म्हणजेच सत्यनारायण देवाची कथा सांगितली आहे. ही कथा सांगणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. यासोबतच ही कथा आपली उपयुक्तताही अनेक प्रकारे सिद्ध करते. भगवान सत्यनारायण यांच्या कथेतून समाजातील सर्व घटकांना सत्याचे शिक्षण मिळते. संपूर्ण भारतभर असे असंख्य लोक आहेत जे पूर्ण भक्तिभावाने ही कथा करतात. जे या कथेचे नियम पाळतात आणि व्रत करतात. सत्यनारायण भगवानांची व्रत कथा गुरुवारी करता येते. असे मानले जाते की भगवान सत्यनारायणाची कथा ही भगवान विष्णूच्या वास्तविक रूपाची कथा आहे. पंचांगानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करता येते. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूच्या नारायण रूपाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात घरात काही शुभ कार्य संपन्न झाल्यावरही सत्यनारायण पूजा घालण्याची प्रथा आहे. लग्न, मुंज, वास्तुशांत किंवा इतर काही शुभ कार्य असेल तर ते कार्य संपन्न झाल्यावर सत्यनारायण पूजा आवर्जून घातली जाते. किंबहुना सत्यनारायण पूजा झाल्याशिवाय शुभ कार्याची पूर्तता होत नाही. सत्यनारायण पूजेला साधारणपणे घरातील नव्या जोडप्याला बसवले जाते जेणे करून त्यांच्या संसारात कुठले विघ्न येऊ नये. किंवा घरातील यजमान व त्यांची पत्नी असे जोडप्याने सत्यनारायण पूजा करतात. आपल्या महाराष्ट्रात शुभ प्रसंगी स्त्रियांनी उखाणे घेण्याची परंपरा आजही पाळली जाते. नव्या जोडप्याला तर आवर्जून उखाणे घेण्यासाठी आग्रह केला जातो. अशावेळी पटकन उखाणे सुचत नाहीत. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास मराठी उखाणे सत्यनारायण पूजा । Satyanarayan Ukhane आणले आहेत.
सत्यनारायण पूजेसाठी मराठी उखाणे । Marathi Ukhane Satyanarayan Pooja
नारायणाच्या रूपात सत्याची पूजा करणे हीच सत्यनारायणाची पूजा आहे. याचा अर्थ असाही होतो की जगात हरिनारायण हेच एकमेव सत्य आहे, बाकीची सगळी माया आहे. संपूर्ण जग केवळ सत्यामध्ये सामावलेले आहे. सत्याच्या साहाय्याने भगवान शिव पृथ्वी धारण करतात. समाजातील कोणत्याही घटकातील व्यक्तीने सत्याला देव मानून निष्ठेने ही व्रतकथा ऐकली तर त्याला त्याच्या इच्छेनुसार फळ मिळते. असे सत्यनारायण पूजेचे महत्व आहे. पूर्वी पती पत्नी एकमेकांचे नाव घेत नसत. म्हणूनच उखाण्यात पतीचे नाव घेण्याची पद्धत सुरु झाली. आज जरी पती पत्नी एकमेकांचे नाव घेत असले तरी अजूनही उखाणे घेण्याची परंपरा सुरूच आहे. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून घेण्यास आजही विवाहित स्त्रियांना आवडते.
माझ्या आयुष्याच्या अंगणात काढेन रांगोळीच्या सुबक रेषा, …..ने त्यात सुंदर रंग भरावे हीच माझी मनीषा
अधिकमासात आईने दिली चांदीची कळशी, ….. रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
नारळीपौर्णिमेला करतात नारळीभात, …. रावांसह घेतले मी फेरे सात
महादेवाच्या पूजेला बेलाच्या राशी, …रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
हंसराज पक्षी दिसतात खूप हौशी, … रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
लक्ष्मीनारायणाच्या पायांशी सोन्या मोत्याच्या राशी …रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
चांदीच्या वाटीत वाढलाय गाजराचा हलवा, …रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा
मंथरेमुळे घडले सगळे रामायण, … रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण
कोमेजू नये प्रेम, दरवळो सदा प्रीतीचा सुवास, … रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी तुमच्यासाठी खास
पाठीशी आहे जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची भवानी, …रावांची झाले मी अर्धांगिनी
वाचा – Dohale Jevan Ukhane | डोहाळे जेवण उखाणे
स्त्रियांसाठी सत्यनारायण पूजेचे उखाणे । Satyanarayan Ukhane For Ladies
लग्नानंतर नव्या जोडप्याला कुळाचारासाठी देवदर्शनाला जावे लागते तसेच अनेक ठिकाणी त्यांना पूजेसाठी बसवतात. अशावेळी जोडीने उखाणे घ्यायचे असतील तर ऐनवेळी उखाणे आठवत नाहीत. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास नवरीसाठी मराठी उखाणे व सत्यनारायण पूजेच्या दिवशी घेण्यासाठी सुंदर उखाण्यांचा संग्रह आणला आहे.
उखाणे घेऊन भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव, … आज आहे सत्यनारायण पूजा … रावांचे घेते मी नाव
वारुळाला जाऊन मी नागाची पूजा करते, … रावांचे नाव घेऊन सौभाग्याचा आशीर्वाद मागते
हरतालिकेला करतात पूजा करतात महादेवाची, …रावांचे नाव घेते आज पूजा आहे सत्यनारायणाची
रामनामाची ओवी आळवेन मी प्रातःकाळी, …रावांशी बांधली गाठ म्हणून मी ठरले भाग्यशाली
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा, …रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला सौभाग्याचा
धनत्रयोदशीला पूजा करतात ऐश्वर्य व धनाची, … रावांचे नाव घेते आज पूजा आहे सत्यनारायणाची
पुण्यकर्म केले असतील तर टिकतात जन्मोजन्मीच्या गाठी, … रावांचे नाव घेऊन जाते मी सत्यनारायण पूजेसाठी
श्रावणातल्या कृष्ण अष्टमीला पूजा करतात श्रीकृष्णाची, … रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेसाठी
चांदीच्या निरंजनात तुपाच्या वाती, … रावांची आहे माझ्यावर प्रीती
पती पत्नीच्या प्रेमावरच टिकून राहतो संसार, … रावांचे नाव घेते आज आहे _वार
वाचा – गृहप्रवेश उखाणे
सत्यनारायण पूजेचे उखाणे पुरुषांसाठी । Satyanarayan Ukhane For Men
नवी नवरी जसे उखाणे पाठ करून ठेवते तसेच नवीनच लग्न झालेल्या मुलांनाही उखाणे घेण्याचा आग्रह केला जातो. खास करून देवदर्शनाला गेल्यावर किंवा पूजा वगैरेला जोडीने बसावे लागले तर उखाण्यांची प्रॅक्टिस ठेवावी लागते कारण घरातील ज्येष्ठ मंडळी नव्या जोडप्याकडून उखाणे ऐकण्यास उत्सुक असतात. तुम्हाला ऐनवेळी उखाणे जुळवता आले तर ठीक नाहीतर वेळेवर काय बोलावे याची पंचाईत होते. म्हणूनच हे पुरुषांसाठी खास लिहिलेले उखाणे पाठ करून ठेवा. यात नवरदेवासाठी मराठी उखाणे देखील आहेत.
अंबाबाईच्या देवळात नैवेद्याच्या राशी, … चे नाव घेतो सत्यनारायण पूजेच्या दिवशी
वाल्मिकी ऋषींनी रचले रामायण, …चे नाव घेतो आज आहे सत्यनारायण
श्रीकृष्णाने सांगितली अर्जुनला भगवद्गीता, …चा आहे मी राम तर ती आहे माझी सीता
अश्विन शुद्ध प्रतिपदेला बसतात देवीचे घट, … करते सगळी कामे पटापट
सासूबाई आहेत सुगरण तर सासरेबुवा आहेत हौशी, … चे नाव घेतो सत्यनारायण पूजेच्या दिवशी
आषाढात आकाशात गडगडतात ढग आणि चमकतात विजा , …बरोबर करतो सत्यनारायणाची पूजा
श्रावणाच्या आगमनाने बहरली सृष्टीची कांती, … च्या येण्याने माझ्या आयुष्यात आली सुख-शांती
फुलांइतकीच सुंदर दिसते गुलाबाची कळी, हसल्यावर … च्या गालावर दिसते सुंदर खळी
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, … चे नाव घेतो सत्यनारायण पूजेच्या दिवशी
सत्यनारायणाच्या समोर प्रसादाला ठेवले केशरी पेढे, …चे नाव घ्यायला कशाला घेऊ आढेवेढे
वाचा – Dohale Jevan Ukhane for Male
सत्यनारायण पूजेसाठी सुंदर उखाणे । Beautiful Ukhane For Satyanarayan Pooja
सत्यनारायण व्रत कथा ही सनातन धर्माच्या भक्तांमध्ये सर्वात आदरणीय व्रत कथा मानली जाते. मान्यतेनुसार, ही भगवान विष्णूच्या वास्तविक रूपाची कथा आहे. भगवान विष्णूची अनेक रूपात पूजा केली जात असली तरी सत्यनारायण पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. म्हणूनच वर्षातून एकदा तरी घरात ही पूजा घातली जाते. या पूजेला जोडीने बसावे लागते आणि जोडीने उखाणेही घ्यावे लागतात. वाचा सत्यनारायण पूजेसाठी सुंदर उखाणे-
सत्यनारायणापुढे लावली समईची जोडी, … रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी
घातली आज मोत्यांची माळ आणि सोन्याचा साज, …रावांचे नाव घेते कारण सत्यनारायण पूजा आहे आज
सासरची मंडळी आहेत खूपच हौशी, … रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
सौभाग्याची ज्योत प्रेमाच्या दिव्यात तेवते, …रावांसाठी सत्यनारायण देवाकडे दीर्घायुष्य मागते
महादेवासाठी पार्वतीने केली तपश्चर्या उग्र, …रावांच्या सेवेत मी आयुष्यभर व्यग्र
महादेव-पार्वतीचा सारीपाट जसा उत्तरोत्तर रंगला, तसाच ….. चा संसार रंगेल खूप चांगला
वातीशिवाय दिवा, प्रकाशाशिवाय वाट खुलून दिसत नाही, … रावांशिवाय मला अजिबात करमत नाही.
महाराष्ट्राची परंपरा आहे मंगळागौरीचे खेळ, … रावांचे नाव घेते झाली सत्यनारायण पूजेची वेळ
दारावर लावले झेंडूच्या फुलांचे तोरण, … रावांचे नाव घेते आहे सत्यनारायण पूजेचे कारण
लक्ष्मीदेवीच्या कृपेने भरल्या आहेत घरात अठरा धान्यांच्या राशी, …रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
मंडळी तुम्हाला जर हे मराठी उखाणे सत्यनारायण पूजा । Satyanarayan Ukhane आवडले असतील तर नक्की सेव्ह करून ठेवा म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला उखाणे घेण्याच्या प्रसंगी शोधाशोध करावी लागणार नाही आणि वेळेवर उखाणे जुळवण्याचे टेन्शन येणार नाही.
Photo Credit – istock
अधिक वाचा – 170+ वटपौर्णिमा उखाणे