आपलं प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळ्या गोष्टींनी भारलेलं असतं. सुखही असतात आणि दुःखही. माझंही आयुष्य तसंच आहे. पण कधीतरी वाटतं की, सुख येताना त्याच्याबरोबर दुःखाची एक झालरही असते. कधीच माझ्या वाट्याला पूर्ण सुख आलं नाहीये. नॉर्मल आयुष्य नक्की कधी जगायला सुरुवात होणार असाही मला प्रश्न पडतो. घर आहे कुटुंब आहे, मित्रमैत्रिणी आहेत पण इतकं सगळं असूनही एकटेपणा काही सुटत नाही. इतक्या गुंतलेल्या वातावरणातही मी मात्र एकटी आहे. अर्थात त्याला कारणंही तशीच आहेत म्हणा.
खरं तर या गोष्टीला लहानपणीपासूनच सुरूवात झाली. घरात मोठी म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्यायल्या हव्यात. त्यातही मुलगी म्हणजे सगळं साहजिकच आलंच. वयात आल्यावर तर सवयच लागून गेली. इतर गोष्टींबरोबर समजूदारपणाची सवय लागली आणि ती अशी लागली की, त्याचा कधीकधी त्रासही होऊ लागला. कारण समजूतदारपणाबरोबर बऱ्याचदा घुसमटही वाढते. आपल्याला सगळेच गृहीत धरायला लागतात ना? तुम्हीही विचार करून पाहा. तुमच्याबरोबर पण हे नक्कीच झालं असेल. इतर मुलींचे बॉयफ्रेंड असताना आपल्याला कोणीच नाही हे विचार तर यायचे. पण त्याला काही पर्याय नव्हता. कुठे चुकतंय ते पण कळत नव्हतं. पण त्यावेळी आपल्याला आपलं असं प्रेम करणारं कोणीतरी हवं असं वाटायचं.
शाळा सरली कॉलेज आलं. वाटलं इथे कोणीतरी आपल्याला नक्की भेटेल. पण तिथेही तेच. त्याला खरं तर माझा स्वभावच कारणीभूत ठरला. मैत्रीच्या पलीकडे जायची हिंमतच नव्हती. पण तरीही मनात आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी हवं ही भावना कायम मनातच राहिली. वय वाढत गेलं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. पण स्वतःवर प्रेम करायचं आणि दुसऱ्याकडून करून घ्यायचं राहूनच गेलं. कदाचित म्हणूनच आजूबाजूला इतके मित्रमैत्रिणी असूनही सगळ्यांमध्ये असूनही मला एकटं वाटतं. भरभरून बोलत राहायचं पण ऐकायला कुणीच नाही अशी अवस्था आहे. प्रत्येकाला समजून घ्यायचं पण आपल्याला समजून घ्यायची वेळ येते तेव्हा इतरांना मात्र अनेक इश्यू असतात. त्यांचं मन ते मन आणि आपलं मन ते काहीच नाही. त्यांना जपलं नाही की, त्यांना त्रास होतो. पण मग आपण लहानशी अपेक्षा केली आणि ती पायदळी तुडवली गेली तर त्याचा त्रास आपण करून घ्यायचा नाही. कारण का? तर आपण मोठे आणि समजूतदार असतो. खरं आहे ना? तुमच्या बाबतीत पण हे असं घडलं असेलच. तुम्हालाही वाटतं ना तेव्हा की, सर्व असूनही आपण मात्र एकटेच आहोत.
विचार करते यावर नक्की काय करता येईल. आपल्यावर प्रेम करा हे कोणाला जबरदस्तीने नाही सांगता येत. ते समोरच्याला मनापासून जाणवायला लागतं. प्रेमाच्या बाबतीत माझं नशीब उजळेल का? असा प्रश्न किमान हजार वेळा तर माझ्या मनात येऊन गेलाय. पण जोपर्यंत मी माझा मनातला एकटेपणा सोडणार नाही तोपर्यंत काही खरं नाही असा निष्कर्ष मी आता काढला आहे. किमान या नवीन वर्षात तरी मला माझा एकटेपणा घालवणारा भागीदार हवा आहे हे नक्की. पण एकटेपणाच माझा साथीदार होणार की काय असंही वाटू लागलंय. तुम्हीही असाल माझ्यासारखे तर नक्की कमेंट करा.
हेदेखील वाचा –
#MyStory: PG मध्ये राहून बॉयफ्रेंड असणं म्हणजे…
#MyStory: ऑनलाईन झाली फ्रेंडशिप, प्रेमात पडले पण पुढे काय
#MyStory: आणि आम्ही Lovers न राहता पुन्हा एकमेकांसाठी….
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.