हेअरस्टाईल सेट करण्यासाठीच नाही तर असाही करता येतो ‘हेअरस्प्रे’चा वापर

हेअरस्टाईल सेट करण्यासाठीच नाही तर असाही करता येतो ‘हेअरस्प्रे’चा वापर

निरनिराळ्या आऊटफिटवर निरनिराळी हेअर स्टाईल केल्यामुळे तुम्हाला एक हटके लुक मिळतो. मात्र आऊटफिटप्रमाणे आणि ऋतुमानानुसार नवनवीन हेअर स्टाईल करणं ही एक कला आहे. एखाद्या सणसमारंभाला अथवा कार्यक्रमाला तुमची हेअर स्टाईल काही तास तशीच राहावी असं तुम्हाला वाटत असतं. यासाठी हेअर स्टाईल सेट करण्यासाठी तुम्ही हेअर स्प्रेचा वापर करता.  आजकाल बाजारात निरनिराळ्या प्रकारचे हेअर स्प्रे मिळत असतात. मात्र या हेअर स्प्रेचा वापर फक्त हेअर सेट करण्यापुरता मर्यादित नक्कीच नाही. कारण त्याचा वापर तुम्ही केसांंवर आणखी अनेक गोष्टींसाठी करू शकता. यासाठी जाणून घ्या हेअर स्प्रेचा वापर तुम्ही केसांवर कोणकोणत्या गोष्टींसाठी करू शकता.

हेअरस्टाईल सेट करण्यासाठी -

हेअरस्टाईल केल्यावर ती दीर्घकाळ टिकण्यासाठी तुम्ही हेअरस्प्रेचा वापर करता. ज्यामुळे तुमचे केस व्यवस्थित सेट होतात. शिवाय यासाठी तुम्हाला खास पार्लरमध्ये जाण्याची गरज लागत नाही. कोणत्याही ब्युटी शॉपमध्ये हेअर स्प्रे तुम्हाला मिळू शकतात.

केस कर्ल करण्यासाठी -

जर तुमचे केस फारच सिल्की आणि सुळसुळीत असतील तर तुम्हाला नेहमीच एकच हेअर स्टाईल फॉलो करावी लागते. जरी  तुम्ही अशा केसांना कर्ल केलं तरी थोड्यावेळाने ते पुन्हा सरळ होतात. अशा सुळसुळीत आणि सरळ केसांना कर्ल करण्यासाठी तुम्ही हेअर स्प्रेचा वापर करू शकता. कर्ल केल्यावर त्यांच्यावर हेअर स्प्रे केल्यामुळे ते सेट होतात आणि तसेच राहतात.

Shutterstock

केसांना व्हॉल्युम देण्यासाठी -

जर तुमचे केस खूपच पातळ असतील तर हेअर स्प्रेने तुम्ही तुमच्या केसांना तात्पुरतं घनदाट करू शकता. आजकाल मार्केट मध्ये केसांना व्हॉल्युम देणाऱ्या हेअर स्प्रेची मागणी वाढत आहे. अशा प्रकारचे हेअर स्प्रे तुम्हाला केसांच्या आतील बाजूने स्प्रे करावे लागतात. ज्यामुळे तुमच्या केसांचा दाटपणा वाढल्यासारखा वाटतो. 

Shutterstock

हेअरस्टाईलमधून बाहेर येणारे छोटे केस लपवण्यासाठी -

हेअरस्टाईल केल्यावर तुमच्या हेअरस्टाईलमधून छोटे छोटे केस बाहेर डोकावू लागतात. ज्यामुळे तुमचा लुक बिघडण्याची शक्यता असते. मात्र जर तुमच्याकडे हेअर स्प्रे असेल तर त्याचा वापर करून हे केस तुम्ही पुन्हा सेट करून लपवू शकता. 

Shutterstock

केसांवर हिट प्रोटेक्टरप्रमाणे वापरण्यासाठी -

जेव्हा तुम्ही केसांवर स्ट्रेटनर अथवा कर्लरचा वापर  करता तेव्हा त्याआधी तुम्ही केसांना हिट प्रोटेक्टर, सिरम लावणं गरजेचं असतं. मात्र जर तुमच्याकडे कोणतंही हिट प्रोटेक्टर नसेल तर तुम्ही त्यासाठी हेअर स्प्रेदेखील वापरू शकता. कारण यामुळे तुमच्या केसांचं कमी नुकसान होऊ शकतं. वास्तविक हेअर स्प्रेमुळे केस सुरक्षित राहतात असं नाही मात्र त्यांचे नुकसान कमी होऊ शकतं हे मात्र नक्कीच. यासाठी या टिप्स फॉलो करा आणि निरनिराळ्या हेअरस्टाईल हटके लुक मिळवा.

लक्षात ठेवा - हेअर स्प्रेचा वापर केल्यानंतर केस स्वच्छ धुणं गरजेचं आहे. कारण हेअर स्प्रे बराच काळ केसांवर ठेवल्यामुळेही तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकतं.