जेवणात रोज गरमागरम पोळी अर्थात चपाती (Chapati) मिळणार असेल तर त्यापेक्षा जास्त सुख ते काय असणार. त्यातही पोळी जर अगदी मऊ आणि मुलायम असेल तर हे सुख अधिक वाढते. खाण्याचीही मजा वेगळी असते. पण काही जणांच्या घरात तक्रारी ऐकू येतात की, पोळी मऊ आणि मुलायम अशी बनत नाही. तर काही पोळ्या या भाजताना अधिक काळ्या होतात. तर काही जणांना पोळी दुपारची असेल तर रात्रीपर्यंत चिवट होते अशीही तक्रार असते. पोळ्यांची कणीक भिजवल्यानंतर काही वेळातच काळी पडते आणि मग पोळ्या उशीरा केल्यास, कडक होतात. पण तुम्हाला पोळी मऊ होण्यासाठी आम्ही काही सोपे हॅक्स सांगणार आहोत. याचा उपयोग केल्यास, तुम्हाला मऊशार आणि अप्रतिम पोळ्या रोज खाता येतील. पण त्याआधी पोळी नक्की किती फायदेशीर असते हे जाणून घेऊया. गव्हाच्या पोळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, तसंच यामध्ये कमी कॅलरी असतात. पोळी खाल्लामुळे तुमच्या शरीराला सोडियम, प्रोटीन, फायबर, कार्ब्स, पोटॅशियम असे आवश्यक पोषक तत्व व्यवस्थित मिळते. तसंच डाळ आणि भाज्यांबरोबर पोळीचे उत्तम मिश्रण असते आणि तुमच्या शरीरासाठी हा एक उत्तम आहार ठरतो. आता पाहूया काय आहेत हॅक्स –
1. कणीक भिजवताना कोमट पाण्याचा करा वापर
तुम्हाला हे वाचून नक्की आश्चर्य वाटलं असेल. कारण आतापर्यंत आपण कणीक भिजवताना केवळ थंड अर्थात नियमित साध्या पाण्याच वापर करतो. पण तुम्हाला मऊ पोळ्या हव्या असतील तर तुम्ही कणीक भिजवताना पाणी कोमट करून घ्या. तुमच्या पोळ्या जर मऊ होत नसतील तर तुम्ही या हॅकचा वापर नक्की करून पाहा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठामध्ये अर्धा चमचा तेल आधीच घालू शकता आणि मग कणीक भिजवा. ही अतियश उपयुक्त किचन हॅक आहे. लक्षात ठेवा. मऊ पोळ्या करण्यासाठी कशी कणीक भिजवावी हेदेखील महत्त्वाचे आहे.
2. कणीक भिजवल्यावर लगेच पोळी करू नका
पोळ्या अर्थात चपाती बनवायची घाई करू नका. तुम्ही कणीक भिजवल्यानंतर किमान 10 मिनिट्स तरी त्यावर कपडा घालून तिंबत ठेवा. कणीक थोडा वेळ तिंबत ठेवल्यास, तुमच्या पोळ्या अधिक मऊ होतात. त्यामुळे आधी पोळ्यांची कणीक भिजवा आणि मग भाजी करायला घ्या. तोपर्यंत कणीक व्यवस्थित भिजेल आणि मगच पोळ्या करायला घ्या. यामुळे तुमचा स्वयंपाकघरातील वेळही वाचेल आणि कणीकही व्यवस्थित भिजून पोळ्या मऊ आणि मुलायम होतील. जास्त वेळ नसेल तर किमान 5-7 मिनिट्स तरी तुम्ही कणीक भिजवून ठेवा. त्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो.
3. पोळीवरील अतिरिक्त पीठ भाजताना काढा
पोळी लाटताना चिकटू नये म्हणून आपण त्यावर अतिरिक्त पीठ लावतो. पण लाटताना काही पीठ तसंच राहते. भाजताना मात्र तुम्ही हे अतिरिक्त पीठ कपड्याने झाडून काढा. कारण हे पीठ भाजताना जळते आणि मग पोळी अधिक काळी होते. अशी पोळी कडवट लागते आणि नंतर चिवट होते. मऊ राहात नाही. त्यामुळे पोळ्या करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तसंच पोळी भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेऊ नका. त्यामुळे पोळ्या अधिक चिवट होतात. मऊ पोळ्यांसाठी गॅस नेहमी मोठा ठेवा आणि पोळी पटकन परता. गोल आणि मऊ पोळ्या करण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा.
4. कणीक स्टोअर करताना घ्या काळजी
कणीक स्टोअर करताना लक्षात ठेवा की, भिजलेली कणीक ही बंद डब्यात फ्रिजमध्ये ठेऊ नका. यामुळे कणीक काळी होते. तसंच या कणकेच्या पोळ्या हा चवीलाही चांगल्या लागत नाहीत. तसंच फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या सहसा करून नयेत. यामुळे शरीराला हानी पोहचते. सर्वात पहिले हे लक्षात ठेवा की, भिजलेली कणीक ही जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेऊ नका. दुपारची कणीक तुम्ही रात्रीसाठी वापरू शकता. मात्र आज भिजवलेली कणीक दुसऱ्या दिवशी अर्थात 24 तासानंतर वापरणे योग्य नाही. त्यामुळे कणीक भिजवून जास्त उरणार नाही याची काळजी घ्या.
अगदीच कणीक उरली आणि काही वेळासाठी ठेवायची असेल तर तुम्ही कणकेला तेल अथवा तूप लावा आणि मगच कणीक ठेवा. केवळ इतकंच नाही तर तुम्ही तेल वा तूप लावल्यानंतर अल्युमिनिअम फॉईलमध्ये ठेवा आणि मगच एखाद्या टाईट कंटेनरमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवा. असं केल्यामुळे कणीक काळी पडणार नाही आणि फ्रेश राहील.
5. पोळ्या करू शकता फ्रिज
तुम्हाला हे वाचून कदाचित धक्का बसेल. पण हो हे खरं आहे. तुम्ही पोळ्या फ्रिजमध्ये ठेऊ शकता. या पोळ्या साधारण आठवडाभर तुम्ही टिकवून ठेऊ शकता. यासाठी ट्रिक म्हणजे तुम्ही पोळ्या कोमट असतील तेव्हाच त्या फ्रिजमध्ये ठेवा. एकदम थंड झाल्यावर अथवा अगदी गरम असताना अजिबात ठेऊ नका. एखाद्या झिप लॉक बॅगमध्ये कोमट असणाऱ्या पोळ्या भरा आणि त्या फ्रिजमध्ये ठेवा. असं केल्याने तुम्ही जेव्हा खाण्यासाठी पोळ्या बाहेर काढाल तेव्हा त्या मऊच असतील. ओव्हनमध्ये गरम करून तुम्ही खाऊ शकता.
हे सर्व हॅक्स तुम्हाला तुमच्या धावपळीच्या आयुष्यात नक्की कामी येतील. तसंच तुम्हाला याचा नक्की चांगला अनुभव येईल. तुमच्या पोळ्या अर्थात चपाती नक्की मऊ राहतील आणि रोज त्रासही होणार नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक