बप्पी लाहिरी हे बॉलीवूडच्या संगीत विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. परवाच बप्पी लाहिरी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 69 होते. एक आगळ्यावेगळ्या धाटणीचे संगीत आणि सोने यासाठी प्रसिद्ध असलेल्या बप्पीदा यांच्या बाबतीत आणखी एक जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ते त्या बॉलिवूड स्टार्सपैकी एक होते ज्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. चला जाणून घेऊया बप्पी लाहिरी यांचे नाव गिनीज बुकमध्ये कशामुळे पोहोचले.
अनेक भाषांमधील चित्रपटांना दिले संगीत
बप्पी लाहिरी यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी असे होते. पण सगळे त्यांना बप्पीदा म्हणूनच ओळखत असत. एका प्रदीर्घ आजारानंतर मंगळवारी मुंबईच्या रुग्णालयात त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी अमर संगी, आशा ओ भालोबाशा, आणि अमर तुमी अशा अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांना संगीत दिले होते.विशेष म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी तबला वाजवण्यास सुरुवात केली होती.
त्याकाळी असेही काही चित्रपट होते जे केवळ बप्पीदांच्या संगीतामुळे व गाण्यांमुळे बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले होते. त्यांनी अनेक तेलुगू सिनेमांनाही संगीत दिले होते आणि तमिळ, कन्नड व गुजरातीमध्ये काही काळ काम केले होते.1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या बप्पीदांच्या संगीताला 1980 आणि 1990 च्या दशकात भरघोस यश मिळाले आणि त्यानंतर त्यांनी शेकडो चित्रपटांना संगीत दिले.
अधिक वाचा – ‘लग्न सासूचं, पुन्हा करवली सुनबाईच’- अग्गबाई सासूबाई आता कन्नडमध्ये
कमी कालावधीत जास्त गाण्यांना संगीत देऊन एक रेकॉर्ड केला
बप्पीदांच्या संगीताचे देशभरात लाखो चाहते आहेत. गाण्यांना वैशिष्ट्यपूर्ण संगीत देणाऱ्या बप्पीदा यांनी 1986 साली सुमारे 33 चित्रपटांसाठी 180 गाणी रेकॉर्ड केली होती. एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येत गाणी रेकॉर्ड करणे सोपे काम नव्हते आणि त्यामुळेच त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.बप्पीदा यांनी दादू (1972) या बंगाली चित्रपटातून त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक नन्हा शिकारी (1973) या चित्रपटात मिळाला होता. ताहिर हुसैन यांच्या जख्मी (1975) या हिंदी चित्रपटाने त्यांना बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा यश मिळवून दिले.
ज्या बप्पीदांच्या तालावर संपूर्ण जग ठेका धरते ते या इंडस्ट्रीतील पहिले गायक होते ज्यांना खुद्द मायकल जॅक्सनने त्याच्या पहिल्या शोमध्ये बोलावले होते.बप्पीदा यांनी गायलेली ‘याद आ रहा है तेरा प्यार, बॉम्बे से आया मेरा दोस्त, यार बिना चैन कहां रे, आय ऍम अ डिस्को डान्सर, जुबी-जुबी, तम्मा तम्मा लोगे’ ही गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.त्यापैकी काहींचे तर रिमिक्स देखील तितकेच गाजत आहेत.काही काळापूर्वी त्यांनी डिस्नेच्या मोआनाच्या हिंदी-डब केलेल्या आवृत्तीमध्ये तामाटोआ या पात्राला आणि किंग्समन: द गोल्डन सर्कलच्या हिंदी आवृत्तीमध्ये एल्टन जॉनच्या पात्राला आवाज दिला होता.
अधिक वाचा – माझी तुझी रेशीमगाठमध्ये नव्या भूमिकेची एन्ट्री, कोण आहे जेसिका
बप्पी लाहिरी लतादीदींना माँ म्हणायचे
लतादीदी व बप्पी लाहिरी यांच्यात खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. बप्पीदा लतादीदींना माँ म्हणत असत. लतादीदींच्या निधनाला दोन आठवडेही उलटले नाहीत तोवर बप्पीदा सुद्धा हे जग सोडून गेले.दादू या बंगाली चित्रपटातील त्यांच्या पहिल्या रचनेला लता मंगेशकर यांनीच आवाज दिला होता. लतादीदींचे 6 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूने दुःखी झालेल्या बप्पीदा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचा एक अतिशय खास फोटो शेअर केला ज्यामध्ये ते लता दीदींच्या मांडीवर दिसत आहेत. हा खास फोटो शेअर करताना त्यांनी ‘माँ’ असे लिहिले आहे.
भारतीय डिस्को म्युझिकला नवी ओळख मिळवून देणारे प्रतिभावंत संगीतकार बप्पी लाहिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अधिक वाचा – संगीतकार – गायक बप्पीदा यांचे जगाला ‘अलविदा’
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje