Bridal Makeup

नवरीच्या मेकअप किटची खास यादी | Navricha Makeup Kit List

Trupti Paradkar  |  Feb 7, 2022
navricha makeup

प्रत्येक नववधूला तिने लग्नाच्या दिवशी सुंदर आणि सर्वांपेक्षा वेगळं दिसावं असं वाटत असतं. नवरीचा मेकअप (navricha makeup) पाहण्यासाठी सगळे उत्सुक असतात. कारण लग्नात नवरीच्या चेहऱ्यावर लग्नाचं तेज आलेलं असतं. नवरी मेकअप करून आली की लगेच लग्नाच्या विधींना सुरुवात होते म्हणून लग्नातील नवरीचा मेकअप पटकन करण्याचं कौशल्य गरजेचं असतं. वास्तविक आजकाल लग्नसोहळ्यात मेकअप करताना नवरीला मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसरची मदत होते.  मात्र लग्नसोहळ्याआधी आणि नंतरही असे अनेक विधी असतात. जेव्हा तिला स्वतःच तयार होण्यासाठी मेकअपचं बेसिक ज्ञान असणं गरेजेचं असतं. आजकाल लग्नानंतर माहेरी आणि सासरी रिसेप्शन देण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एखाद्या पार्टी, पाच परतावन, गेट-टूगेदर, मंगळागौर, पूजा-पाठ, घरगुती कार्यक्रम, मंगल सोहळे अशा कार्यक्रमात बऱ्याचदा पारंपरिक, एथनिक लुक केला जातो. अशा कार्यक्रमात सर्वांचं लक्ष नुकतच लग्न झालेल्या नवरीकडे जास्त असतं. यासाठी तुम्हाला स्वतःचा साजशृंगार (marathi shrungar) करता यायला हवं.  मेकअपसाठी गरजेचा असतो मेकअप किट म्हणूनच प्रत्येक नववधूकडे परिपूर्ण मेकअप किट तयार असायलाच हवं. ज्यामध्ये मेकअप करण्यासाठी काही खास उत्पादने तर असतीलच शिवाय काही गरजेच्या गोष्टीही ठेवता येतील.

चेहऱ्यासाठी मराठी ब्रायडल मेकअप कीट | Navricha Face Makeup Kit 

लग्नानंतर पटकन तयार होण्यासाठी तुम्हाला मेकअप किट नक्कीच उपयोगी पडू शकतं. यासाठीच लग्नाआधीच तुमच्या मेकअप किटमध्ये या गोष्टी ठेवा. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षणी स्वतःच नवरीचा मेकअप (navricha makeup) लुक सहज करता येईल.

प्रायमर

कोणताही मेकअप करण्यापूर्वी सर्वात आधी चेहऱ्यावर लावलं जातं ते म्हणजे प्रायमर. प्रायमरमुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, पिंपल्स, चट्टे झाकले जातात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळेपणा न दिसता तुमचा मेकअप बेस व्यवस्थित सेट होतो. मेकअप चांगला करण्यासाठी प्रायमरचा नक्कीच चांगला फायदा होतो. यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये एक चांगलं प्रायमर असायला हवं. 

फाऊंडेशन 

नवरीचा मेकअप करण्यासाठी किटमध्ये फाउंडेशन असायलाच हवं, कारण मेकअप करताना फाउंडेशन फेसवर सगळ्यात आधी  चेहऱ्यावर लावलं जातं. फाउंडेशन हा तुमच्या मेकअपचा बेस असतो. भारतीय स्कीनटोन साधारणतः नॉर्मल, ड्राय, ऑयली, मिक्स, डार्क आणि लाइट अशा असतात. फाउंडेशनची शेड ही स्किनटोन्स लक्षात घेऊन बनवल्या जातात. त्यामुळे फाउंडेशनची शेड निवडताना तुमच्या चेहऱ्याशी कोणती शेड ब्लेंड होईल ते पाहून घ्या. योग्य टोनचं फाउंडेशन खरेदी करताना सर्वात आधी आपल्या अंगठ्यावर किंवा हातावर थोडं फाउंडेशन लावून बघा. फाउंडेशन तुम्ही गालांवर देखील लावून बघू शकता की ती शेड तुमच्या स्कीनशी मॅच होते की नाही.

कन्सिलर

कन्सिलर तुम्हाला मेकअप करताना फारच उपयोगी पडू शकतं. कारण कन्सिलरचा वापर चेहऱ्यावरील डाग, व्रण आणि बरेच वेळा लाल चट्टे लपवण्यासाठी केला जातो. डोळ्याखालील डार्क सर्कल्स लपवण्यासाठीदेखील तुम्ही कन्सिलर ही वापरू शकता. कन्सिलरच्या वापराने चेहऱ्यावरील पिंपल्ससुध्दा दिसत नाहीत. त्यामुळे जर तुमच्या मेकअप किटमध्ये कंसीलर असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं मुळीच कारण नाही.

कॉम्पॅक्ट

कन्सिलर आणि फाऊंडेशनच्या बेसवर योग्य शेडचं कॉम्पॅक्ट लावलं की मेकअपचा बेसकोट परफेक्ट दिसू लागतो. यासाठी योग्य शेड कॉम्पॅक्ट निवडा. तुमच्या शेडचं कॉम्पॅक्ट तुमच्या मेकअप किट आणि पर्समध्ये असायलाच हवं. कारण अगदी घाईच्या वेळी नुकतं कॉम्पॅक्ट लावूनदेखील तुम्ही परफेक्ट दिसू शकता. 

हायलाईटर

हायलायईटरमुळे तुमच्या चेहऱ्यावरील काही भाग उठावदार दिसू लागतो.  जसं की, चिक बोन्स, भुवयांचे उंचवटे, नाकाचा शेंडा, हनुवटीवर उत्तम हायलाईटर लावल्यामुळे तो भाग उठून दिसतो. ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक आकर्षक नक्कीच दिसू शकतो. चेहऱ्यावर चमक येण्यासाठी चेहऱ्यावरील काही भाग हायलाईट करणं गरजेचं आहे.

ब्राऊंजर

आजकाल ब्लशरला ब्राऊंझर हे एक चांगला पर्याय निर्माण झालं आहे. ज्यामुळे तुम्हाला ब्राऊंझरमुळे तुम्हाला हायलायटर आणि ब्लश न वापरताही पटकन परफेक्ट ग्रॅमरस मेकअपचा लुक मिळू शकतो.  आजकाल असे दुहेरी परिणाम देणारे ब्राऊंझर्स बाजारात उपलब्ध असतात. जे तुमच्या बॅगेत अथवा मेकअप किटमध्ये असले तर तुम्हाला चिंता करण्याची मुळीच गरज नाही.

ब्लश

तुमच्या गालांना ब्लशरमुळे एक छान लुक येतो. जर तुमच्याकडे काही शेड्सचे ब्लशर हे असायलाच हवे.ब्लशरमध्ये गुलाबी, गोल्डन असे काही शेड्स मिळतात. ब्लशरचे पॅलेट तुमच्या  बॅग अथवा मेकअप किटमध्ये असेल तर क्या बात है.

मेकअप ब्रश सेट 

मेकअप करणं ही एक कला आहे. कारण मेकअपमुळे तुमचा लुक जसा चांगला दिसू शकतो तसा बिघडूदेखील शकतो. चांगला मेकअप करण्यासाठी मेकअप किटमध्ये चांगले मेकअप ब्रशदेखील असणं गरजेचं आहे. मात्र बऱ्याचजणी एखाद्या कॉमन ब्रशने अथवा हाताने मेकअप करतात. निरनिराळ्या मेकअप उत्पादनासाठी निरनिराळ्या मेकअप ब्रशची गरज असते. यासाठीच तुमच्या मेकअप किटमध्ये काही बेसिक ब्रश असायलाच हवे.

नवरी साठी लिप मेकअप कीट | Navricha Lip Makeup Kit

Navricha Lip Makeup Kit

कोणत्याही मेकअपमध्ये ओठांचा मेकअप खूप महत्त्वाचा ठरतो. कारण बेसिक मेकअप करताना तुम्ही फक्त लिपस्टिक लावुनही सुंदर दिसू शकता. पण आता तुम्हाला काही दिवस सतत नवरीचा मेकअप (navricha makeup) करायचा आहे. त्यामुळे लिपस्टिकसह लिप मेकअपसाठी लागणारं सर्व साहित्य तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हवं.

वाचा – हिवाळ्यात तेलकट त्वचेकरिता मेकअप टिप्स

लिप लायनर

लिपस्टिक लावण्यापूर्वी  त्या शेडच्या लिपलायनरने ओठांना आकार दिला जातो. नेहमीची गोष्ट वेगळी पण लग्नात तुमचा लुक हा परफेक्ट असणं गरजेचं आहे. लिप लायनरमुळे जाड अथवा पातळ ओठांना एक विशिष्ठ आकार देता येतो. ज्यामुळे तुमच्या ओठांवरील लिपस्टिकचा रंग नक्कीच खुलून दिसू शकतो. 

लिपस्टीक सेट

लिपस्टीक ही गोष्ट प्रत्येक मुलीच्या अगदी जिव्हाळ्याची असते. लिपस्टीक तुमचा लुक कंप्लीट तर करते. लिपस्टीक खरेदी करताना मात्र नीट काळजी घ्यायला हवी.  प्रत्येक शेड तुमच्या हातावर लावून बघा. ह्यासाठी तुम्ही शॉपकीपरची मदत पण घेऊ शकता. जर तुमचा रंग सावळा असेल तर रेड, मरून, ब्राऊनसारख्या थोड्या डार्क शेड्स तुम्हाला चांगल्या दिसतील. जर तुम्ही गोऱ्या आहात तर सॉफ्ट पिंक, ऑरेंज आणि निऑन कलर्ससुध्दा चांगले अॉप्शन आहेत. अशा तुमच्या रंग आणि आवडीनुसार कमीत कमी पाच-सहा शेड्स तुमच्या मेकअप किटमध्ये जरूर असायला हव्यात.

लिपग्लॉस 

आजकाल बाजारात विविध प्रकारचे लिप टिंट अथवा लिप ग्लॉस विकत मिळतात. तुम्ही ज्या रंगाची लिपस्टिक घेतली आहे त्याच रंगाचे लिप ग्लॉस लावून तुम्ही ओठ हायलाईट करू शकता. लिप ग्लॉसला एक प्रकारची चकाकी असते ज्यामुळे तुमचा लुक अधिक ग्लॅमरस होतो. लग्नासारख्या खास प्रसंगी तुम्ही लिप ग्लॉसचा वापर करायला हवा.

ब्रायडल आय मेकअप कीट | Navricha Eye Makeup Kit

Navricha Eye Makeup Kit

नवरीचा मेकअप (navricha makeup) करताना ओठांप्रमाणेच डोळ्यांच्या मेकअपवरही अधिक भर दिला जातो. कारण चेहऱ्यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतात ते डोळे… काळेभोर आणि रेखीव डोळे करण्यासाठी तुम्ही आय मेकअपच्या विविध प्रॉडक्टचा समावेश तुमच्या मेकअप किटमध्ये करायला हवा.

आय लायनर

डोळे व्यक्तिमत्त्वाचा चेहरा असतो असं म्हणतात. समोरच्या व्यक्तीची सर्वात आधी नजर जाते ती म्हणजे तुमच्या डोळ्यांकडे. डोळ्यांच्या सौंदर्याला अजूनच खुलवतं ते म्हणजे आयलायनर. आयलायनर वेगवेगळ्या पद्धतीने लावता येत असल्याने तुम्ही प्रत्येकवेळी आपल्या डोळ्यांना नवा लुक देऊ शकता. ह्यासाठी तुम्ही लिक्विड किंवा पेन्सिल आयलायनरचा वापर करू शकता. तसं तर सर्वात जास्त ब्लॅक आयलायनरचा वापर केला जातो. पण तुम्ही नेहमीपेक्षा हटके ब्लू, डार्क ग्रीन किंवा इतर ही कलर आयलायनरचा वापर करून नवा लूक ट्राय करू शकता.

आयशॅडो

डोळे उठावदार दिसण्यासाठी आयशॅडोचा वापर केला जातो. त्वचेच्या रंगसंगतीप्रमाणे आयशॅडोची शेड निवडायला हवी. जर तुम्ही सावळ्या असाल तर गोल्ड, कॉपर, मॅक्स ब्राऊन, ब्रॉंझ, मॅक्स बर्गंडी यासारख्या शेड्स वापरा. जर तुम्ही गोऱ्या असाल तर रेड, ब्लू, ग्रीन, पिंक, पर्पल, गोल्ड असे कलर डोळ्यांवर फार सुंदर दिसतात. यासाठीच विविध कलर्सच्या आयशॅडोच्या शेड्स असलेली एक दोन पॅलेट तुमच्या मेकअप किटमध्ये जरूर ठेवा.

आयब्रो पेन्सिल

भुवयांना परफेक्ट आकार देण्यासाठी आयब्रो पेन्सिल गरजेची असते. जर तुमच्या भुवया पातळ आणि विरळ असतील तर त्यांना काळ्याभोर आणि जाडसर करण्यासाठी आयब्रो पेन्सिल परफेक्ट ठरेल. यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये एक दुसरी आयब्रो पेन्सिल जरूर ठेवा.   

काजळ

डोळ्यांच्या मेकअपमध्ये आणखी एक महत्वाची आणि बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे काजळ. काजळमुळे तुमच्या डोळ्यांना एक पटकन आणि आकर्षक लुक मिळू शकतो. यासाठीच तुमच्या मेकअप किटमध्ये काजळ पेन्सिल जरूर ठेवा. आजकाल कलरफुल काजळची फॅशन आहे. काळ्या, रेड, ब्लू, ग्रीन अशा रंगांमध्ये काजळ उपलब्ध आहे. 

मस्कारा

डोळ्यांचे सौंदर्य आणखी वाढवतात त्या सुंदर, लांब आणि दाट पापण्या. जर तुमच्या पापण्या दाट दिसाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर मस्कारा योग्यरित्या लावता येणं गरजेचं आहे. मस्कारा लावण्याआधी पापण्यांचे केस आयलेश कर्लरने कर्ल करून घ्या आणि मग मस्कारा लावा. यामुळे पापण्या अजून छान दिसतात. मस्कारा लावलेले तुमचे काळेभोर, दिलखेचक डोळे त्यांची नजर तुमच्यावरून हलू देणार नाहीत. 

इतर मेकअप कीट साहित्य | Other Things For Marathi Bride Makeup Kit

Marathi Bride Make up Kit

नवरीचा मेकअप (navricha makeup) तुमच्या किटमध्ये फक्त मेकअपसाठी लागणारे साहित्य असून चालणार नाही. लग्नात तयार होताना तुम्हाला इतर कोणकोणत्या गोष्टी लागणार याचा विचार करून त्या सर्व गोष्टी तुमच्या मेकअप किटमध्ये असणं गरजेचं आहे.

मेकअप रिमूव्हर

मेकअप नक्की काढून कसा टाकायचा? हे अनेकांना माहीत नसते.  काहीजणी बऱ्याचदा पाण्याने अथवा साबणाने धुवून मेकअप काढतात. मात्र मेकअप हा नेहमी ब्रँडेड रिमूव्हरनेच काढायला हवा. नारळाचे तेल अथवा  बेबी ऑईलनेदेखील तुम्ही मेकअप काढू शकता. मात्र लग्नानंतर काही कार्यक्रमात तुम्हाला यासाठी जास्त वेळ नसेल तर एखादं चांगलं मेकअप रिमूव्हर नक्की ठेवा. 

नेलपेंट सेट

नेल पेंटमुळे तुमच्या हाताची बोटं आकर्षक दिसतात. लग्नानंतर वेगवेगळ्या लुकवर सूट करणाऱ्या काही नेलपेंट शेड्स तुमच्याकडे असायलाच हव्या. यासाठी मेकअप किटमध्ये काही बेसिक शेडच्या नेलपेंट जरूर ठेवा. मात्र यात पारदर्शक, सफेद, न्यूड, लाल, गुलाबी , पेस्टल आणि ग्लिटर शेड्स अशा काही बेसिक नेलपेंट ठेवा.

नेलपेंट रिमूव्हर

वेगवेगळ्या लुकसाठी निरनिराळ्या नेलपेंट शेड्स वापराच्या असतील तर तुमच्या बॅगेत चांगलं मेकअप रिमूव्हर असायला हवा. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षणी तुमच्या नखांवरील नको असलेली नेलपेंट काढून टाकू शकता. 

गुलाबपाणी

लग्नाची गडबड, निरनिराळे विधी, हेव्ही मेकअप, भरजरी साड्या, हेअरस्टाईल्स यामुळे लग्नात तुमची फारच दगदग होऊ शकते. अशा वेळी लग्नानंतर पुन्हा अनेक विधींसाठी तयार राहण्यासाठी गुलाबपाणी तुमच्या फायद्याचं ठरेल. कारण गुलाबपाण्यामुळे तुम्हाला पटकन फ्रेश वाटेल. शिवाय तुमची त्वचा फ्रेश दिसण्यास मदत होईल. एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरून ठेवा. ज्यामुळे तुम्ही कधीही गुलाबपाणी तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करणं तुम्हाला सोपं जाईल.

कॉटन पॅड किंवा टीश्यू पेपर

मेकअप रिमूव्हर, नेलपेंट रिमूव्हर आणि गुलाब पाणी वापरण्यासाठी तुम्हाला कधीही कॉटनपॅडची गरज लागू शकते. शिवाय टीश्यू  कोणत्याही कारणासाठी नेहमीच उपयोगी पडतात. यासाठी लग्नाची तयारी करताना कॉटनपॅड आणि टीश्यू पेपर तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवण्यास मुळीच विसरू नका.

आरसा

आरसा मेकअप किटमध्ये असणं अगदी गरजेचं आहे. कारण जर मेकअप केल्यावर तुमच्या जवळ मोठा ड्रेसिंग टेबल नसेल तर काहीच हरकत नाही. एक छोटासा आरसा तुमच्या कधीही उपयोगी पडेल. यासाठी तुमच्या  मेकअप किटमध्ये आरसा ठेवाच.

हेअर पिन्स आणि सेफ्टी पिन्स

लग्नात साडी, लेहंगा परिधान करताना आणि हेअरस्टाईल करताना सर्वात महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे हेअर पिन्स आणि सेफ्टी पिन्स. यासाठी लग्नाच्या तयारीत या गोष्टी आधीच समाविष्ठ करा. शिवाय खरेदी केल्यावर त्या तुमच्या मेकअप किटमध्ये लगेचच ठेवून द्या. ज्यामुळ वेळेवर त्या तुम्हाला मिळू शकतील. 

कंगवा आणि हेअर ब्रश

कंगवा आणि हेअर ब्रश ही प्रत्येकाची दैनंदिन गरजच आहे. मात्र लग्नानंतर सासरी जाताना तुमचा स्वतःचा कंगवा अथवा हेअर ब्रश तुमच्या जवळच असायला हवा. कारण कधी तुम्हाला तुमची हेअरस्टाईल नीट करण्याची वेळ येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे अशा वेळी कंगवा तुमच्या मेकअप किटमध्ये असेल तर फार शोधाशोध करावी लागणार नाही.

सिंदूर आणि टिकल्या

नववधूचं मुळ सौैंंदर्य अधिक खुलून येतं ते म्हणजे तिच्या डोक्यावरील सिंदूर आणि डोक्यावरील टिकली. कारण या गोष्टी सौभाग्याचं प्रतिक मानल्या जातात. म्हणूनच लगेच हातात याव्या यासाठी त्या तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवा. 

सॅनिटरी पॅड

प्रत्येक स्त्रीसाठी सॅनिटरी पॅड ही एक महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. लग्नाच्या गडबडीत तुम्हाला कधीकधी लवकर मासिक पाळी येण्याची गरज असते. यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये सॅनिटरी पॅड ठेवा.  

परफ्युम

लग्नासोहळ्यासाठी अथवा लग्नातील इतर विधींसाठी संपूर्ण तयारी झाल्यावर शेवटी तुम्हाला एखाद्या छान सुंगधित परफ्युमची नक्कीच गरज लागेल. त्यामुळे तुमच्या मेकअप किटमध्ये ते असणं गरजेचं आहे. लग्नाकार्यामध्ये अनेक लोकांची गर्दी असते. शिवाय तुम्हाला कितीवेळ एकाच ठिकाणी बसावं लागणार हे माहीत नसतं. लग्नासाठी वापरण्यात येणारे आऊटफिट जाड आणि हेव्ही डिझाईनचे असतात. त्यामुळे घामाचा वास येऊ नये आणि फ्रेश वाटावं यासाठी एक छान परफ्युम मेकअप किटमध्ये जरूर ठेवा. 

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खास गोष्ट आहे. मग ते मराठी उखाणे असोत वा मेकअप असो. तुमच्या जीवनातील या खास सोहळ्यासाठी तयार होताना आम्ही navricha makeup साठी दिलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

Read More From Bridal Makeup