फॅशन

उन्हाळ्यासाठी निवडा या प्रकारच्या फॅब्रिकचे कपडे, त्वचेसाठी ठरतील बेस्ट

Trupti Paradkar  |  Apr 4, 2021
उन्हाळ्यासाठी निवडा या प्रकारच्या फॅब्रिकचे कपडे, त्वचेसाठी ठरतील बेस्ट

उन्हाळा सुरू झाला की आपोआप आपली फॅशनदेखील बदलते. हिवाळ्यात खास हौसेने घेतलेले उबदार कपडे हळू हळू कपाटाच्या तळाशी जातात आणि जास्तीत जास्त हलके आणि आरामदायक कपडे आपल्या वापरात येतात. आपण जे कपडे वापरतो त्याचं फॅब्रिक म्हणजेच कापडही खूप महत्त्वाचं असतं. कारण उन्हाळ्यात नेहमी त्वचेला थंडावा देणारे, हवेशीर आणि आरामदायक कापडाचे कपडे वापरणं सोयीचं असतं. यासाठीच जाणून घ्या या काळात नेमक्या कोणत्या फॅब्रिकचे म्हणजेच कापडाचे कपडे वापरायला हवे.

कॉटन अथवा सुती फॅब्रिक –

उन्हाचा तडाखा सुरू झाला की अंगातून घामाच्या धारा येऊ लागतात आणि अंगाची काहिलीदेखील होऊ लागते. अशा काळात सुती कपडे वापरण्यासारखं दुसरं सुख नाही. कारण कॉटन अथवा सुती कपड्यामधून घाम लवकर शोषून घेतला जातो. ज्यामुळे घाम अंगात मुरत नाही. शिवाय सुती कापड हवेशीर असल्यामुळे त्यात हवा खेळती राहते. ज्यामुळे सुती कपडे तुम्हाला  उन्हाळ्यातही थंडावा देतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एखादा सुती कुर्ता, साडी, ओढणी अथवा जॅकेट घातल्यामुळे तुम्हाला सिंपल आणि कूल लुक मिळतो. 

instagram

लीनन फॅब्रिक –

उन्हाळ्यात कॉटनसोबतच लीननच्या कापडालाही खूप मागणी असते. वाढतं तापमान सहन करण्यासाठी कॉटनप्रमाणेच लीननलाही खरंतर कोणताच पर्याय नाही. वास्तविक लीननचे कापड कॉटनपेक्षाही जास्त हवेशीर असते. लीननमुळे तुमच्या अंगातील घाम शोषून घेतला जातो आणि तुम्हाला सतत थंडावा मिळतो. शिवाय लीननचे कापड दिसायलाही खूपच एलिगंट आणि क्लासी असते. लीनन तुम्ही फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्हीसाठी वापरू शकता. लीननमध्ये नैसर्गिक फायबर असल्यामुळे ते पटकन चुरघळतं, मात्र तुम्ही ते जस जसं वापरू लागता तस तसं ते अधिक मऊ आणि तलम होत जातं. आजकाल लीननचे कुर्ते, साड्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात खास लीननचे कपडे घेण्यास काहीच हरकत नाही. 

instagram

खादी फॅब्रिक –

हाताने कातलेल्या सुतापासून आणि हातमागावर विणलेल्या कापडाला खादी असं म्हणतात. खादीचे कापड ही भारताची परंपरा आहे. स्वदेशी चळवळीत खादीचे कापड भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जात असते. मात्र आजही या कापडाची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही. कॉटन अथवा लीननप्रमाणेच उन्हाळ्यात खादी वापरणे त्वचेसाठी अतिशय उत्तम ठरते. हे कापड हाताने कातलेले आणि हातमागावर विणलेले असल्यामुळे ते अतिशय नैसर्गिक असून त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. यासाठीच उन्हाळ्यात खादीचे कापड आवर्जून वापरायला हवे.

instagram

सिल्क फॅब्रिक –

सिल्कचे कापड हे  कॉटन, लीनन आणि खादीपेक्षा अतिशय महाग आणि नाजूक असते. मात्र सणसमारंभ अथवा लग्नकार्यात सिल्कचे कपडे उठून दिसतात. इतर आर्टिफिशिअल सिल्कपेक्षा प्युअर सिल्कमुळे त्वचेला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात लग्नकार्य आणि सणसमारंभाची रेलचेल असते. अशा काळात शोभिवंत आणि मऊसूत प्युअर सिल्कचे कपडे तुम्ही नक्कीच वापरू शकता. सिल्कचे कापडही हातमागावर विणलेले असते. त्यामुळे सिल्कच्या साड्या आणि इतर कपडे थोडे महाग असतात. मात्र वजनाला हलक्या असलेल्या या मऊसूत कापडामध्ये तुम्हाला उन्हाळ्यात गरम नक्कीच होणार नाही. त्यामुळे खास प्रसंगासाठी सिल्कचे कपडे तुम्ही उन्हाळ्यात वापरू  शकता. 

instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

हॅंडलूम इकत साडी आणि ओढण्यांची कशी घ्यावी काळजी

सिल्कचे कपडे घरीच ‘ड्राय क्लीन’ करण्यासाठी सोप्या टिप्स

खादी – कायम टिकणारी फॅशन, नेहमीचा ट्रेंड

Read More From फॅशन