लग्न हा असा सोहळा आहे ज्यादिवशी सुंदर दिसण्याचा अधिकार नवरीला असतो. तुमचा लुक सुंदर दिसेल यासाठी तुम्ही अगदी वेगळ्या आणि हटके गोष्टी आवर्जून ट्राय करायला हव्या. नवरीचा लुक जर कोणता दागिना खुलवत असले तर तो आहे नथ. नथीच्या अनेक डिझाईन्स आणि नथीचा नखरा या आधीही आपण पाहिला आहे. आता आपण अशा काही नथी पाहणार आहोत. ज्या तुमच्या लग्नाच्या साडीवर छान लुक देतील. या नथी सोन्याच्या नाही तर तुमच्या बजेटमध्ये येतील अशा आहेत. त्यामुळे तुम्हाला एकावेळी यातील अनेक प्रकार ट्राय करता येतील. चला एक नजर टाकूयात नवरीसाठी खास नथींच्या डिझाईन्सवर
पेशवाई लुक
लग्नात नऊवारी साडी नेसली की, नवरी सुंदरच दिसते. एक वेगळेच तेच त्या दिवशी तिला चढलेले असते. तुम्हालाही लग्नात पेशवाई लुक हवा असेल तर तो लुक तुम्हाला मोठ्या नथीशिवाय पूर्ण करता येणार नाही. पेशवाई लुक हवा असेल तर तुम्ही नथीचा आकार थोडा मोठा निवडा. पूर्वी बायका नथी या चांगल्या ओठांपर्यंत येतील इतक्या मोठ्या असतात. त्यामुळेच चेहऱ्याला एक वेगळाच लुक येतो. नथ मोठी म्हणजे तिचे वजन जास्त असते असे अजिबात नाही. उलट हल्ली चापाच्या नाकाला अगदी छान बसतील अशा नथी मिळतात. त्यामुळे तुम्ही शोधताना अशा प्रकारची नथ नक्की शोधा. त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच ग्रेस येतो.
पारंपरिक मोठी नथ
नथीचे कितीही प्रकार आले तरी देखील पारंपरिक नथ ही कधीच आऊट डेटेड होऊ शकत नाही. मध्यंतरीच्या काळात नथीचा आकार हा लहान झाला होता. खूप जणांना नथ या मोठ्या अजिबात आवडत नव्हत्या. पण आता पुन्हा एकदा मोठ्या नथी चांगल्या ट्रेंडमध्ये आल्या आहेत. आपल्या रोजच्याच नथीचे मोती मोठे केल्यामुळे साहजिकच त्याचा आकार देखील मोठा होतो. त्यामुळे ही नथ देखील ओठांपर्यंत जाते. ओठांवर ओघळणाऱ्या नथी या नेहमी सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्ही अशी नथ देखील निवडू शकता.
नथ विथ चेन
ट्रेडिशनल नथीला थोडी बगल देऊन काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुम्ही नथ विथ चेन असा प्रकार देखील ट्राय करु शकता. ज्याप्रमाणे पंजाबी लग्नामध्ये गोलाकार नाकातले आणि त्याला चेन असते. त्याचप्रमाणे हल्ली आपल्या मराठमोळ्या नथींना देखील अशाच प्रकारे चैन लावलेली असते. जी तुम्हाला नाकापासून जाऊन केसांना लावायची असते. तुम्हाला ऑनलाईन शोधल्यानंतर अनेक ब्रँडच्या अशा नथी नक्की दिसतील. त्या तुम्हाला तुमच्या लग्नाच्या साडीवर सुंदर दिसतील. विशेषत: नऊवारी साडीवर किंवा एखाद्या हेवी साडीवर ते अधिक चांगला लुक देऊ शकतील. त्यामुळे तुम्ही हा प्रकारही ट्राय करायला हवा.
फुल नथ
आता नथी जितक्या तितकी त्यांची नावे. फुल नथ असा प्रकार तुम्हाला सगळीकडे मिळेल असा नाही. पण ज्या नथींच्या खाली म्हणजे ओठांकडे येईल अशा भागाकडे फुल असेल तर त्याला साधारणपणे फुल नथ असे म्हटले जाते. नथीचा आकार हा बाकदार असा असतो. पण हल्ली गोलाकार नथ देखील अनेक ठिकाणी दिसतात. त्यामुळे फुल नथ तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवून देखील घेऊ शकता. या फुल नथ थोड्या वेगळ्या असतात. तुमचा लुक पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकेल.
कलरफुल नथ
आता नथीचे इतके प्रकार आले आहेत की, त्यामध्ये रंगाची विविधता मिळणार नाही असे कसे होईल नाही का? हल्ली नथीमध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. त्यातील एक म्हणजे रंगीबेरंगी नथ. म्हणजेच आता नुसती मोत्यांची गुंफण करुन नथ बनत नाही. तर तुमच्या साडीच्या थीमनुसार देखील तुम्हाला नथी बनवून दिल्या जातात. त्या देखील खूपच सुंदर दिसतात. तुमच्या साडीच्या रंगाला कॉम्पलिमेंट करेल अशा नथी निवडल्या तर त्या अधिक चांगल्या दिसतात.
आता नक्कीच होणाऱ्या नवरीन काहीतरी हटके करायचे असेल तर या सुंदर नथी नक्की ट्राय करा.