लाईफस्टाईल

यंदा प्रजासत्ताक दिन असा साजरा करा

Aaditi Datar  |  Jan 24, 2019
यंदा प्रजासत्ताक दिन असा साजरा करा

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस खास आणि आदराने साजरा करण्याचा आहे. या दिवशी सगळीकडेच झेंडावंदन केले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. पण याशिवाय जर तुम्हाला हा दिवस अजून वेगळेपणाने साजरा करायचा असेल आणि युवा पिढीलाही या निमित्ताने सहभागी करायचं असल्यास हा लेख नक्की वाचा.

– जेष्ठ्य नागरिकांचा सन्मान
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या समाजातील जेष्ठ्य नागरिकांचा सन्मान करणं हे उत्तम कार्य आहे. त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल आणि त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल तुम्ही त्यांचा आदर सत्कार करू शकता. त्यांचं कौतुक करण्याची आणि त्यांच्या प्रती आदर दाखवण्याची ही योग्य संधी आहे. या निमित्ताने तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन जेष्ठ्य नागरिकांसोबत वेळ घालवू शकता.  

– सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान
समाजात अनेक व्यक्ती असतात, ज्या कोणत्याही मोबदल्याशिवाय आणि धैर्याने समाजासाठी अविरत झटत असतात. या लोकांच्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करणं आवश्यक आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्ही आपले सैनिक, त्यांचे नातेवाईक आणि समाजकार्य करणाऱ्या या व्यक्तींचा तुम्ही सन्मान करू शकता.

– सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करा


प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं हे सर्वोत्तम आहे. आपल्या देशाची संस्कृती आणि समृद्ध इतिहास हा आजच्या पिढीला कळलाच पाहिजे. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वृद्ध आणि युवा दोघंही सहभाग घेऊ शकतात. ज्यामुळे सकारात्मक संदेश दिला जाईल. या कार्यक्रमांमध्ये तुम्ही स्वातंत्र्यपर गीतांवरील कार्यक्रम, स्वातंत्र्याच्या लढ्याबाबत माहिती सांगणारा कार्यक्रम, भारतीय जवानांच्या कुटुंबियांसाठी गेट टू गेदर, स्वातंत्रसेनानीच्या आठवणी किंवा भाषणं असे कार्यक्रम आयोजित करू शकता. ज्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ पुन्हा नव्याने युवा पिढीला कळेल आणि त्यांनाही देशाबद्दल असलेला अभिमान द्विगुणित होईल.

– लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा
प्रजासत्ताक दिवस साजरा करायचा अजून एक चांगला पर्याय म्हणजे मुलांसाठी क्रीडास्पर्धांचं आयोजन करणं. मुलांच्या विकासात सकारात्मक बदलासाठी क्रीडाप्रकारासारखा चांगला पर्याय नाही. जी मुलं एखाद्या क्रीडा प्रकारात सक्रीय असतात, त्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि शारिरीक विकास उत्तम होतो. या निमित्ताने विविध वर्गातील आणि स्तरातील लोकं एकत्रही येतात आणि विचारांची देवाणघेवाणही होते. ज्यामुळे प्रजासत्ताक दिन चांगला साजरा होईल. असेच कार्यक्रम तुम्ही स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठीही आयोजित करू शकता.   

– स्वच्छता अभियान
आपल्या देशात सर्वात जास्त विविधता पाहायला मिळते. मग ती धर्माची असो वा नैसर्गिक स्त्रोतांची. आपल्याकडे घनदाट जंगलंही आहेत आणि लांबच्या लांब समुद्रकिनारेही आहेत. पण सध्या आपल्या नैसर्गिक संपत्तीला धोका आहे तो प्लास्टीकमुळे. प्लास्टीकमुळे झालेला कचरा आपल्याला जागोजागी दिसतो. मग ते रस्ते असो, बगीचे असो, समुद्रकिनारे असो वा नद्या असोत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुढाकार घेऊन तुम्ही स्वच्छता अभियान राबवू शकता. ही एक चांगली संधी आहे, जिचा वापर करून तुम्ही समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती घडवू शकता.   

– नाट्य किंवा एकांकिका स्पर्धा
जेव्हा मुलांना शाळांमध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एखाद्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित नाटकात भूमिका दिल्यास ती नेहमीच त्यांच्या लक्षात राहते आणि त्यांच्यात नवीन स्फूर्ती जागवते. आपल्या देशासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देणाऱ्या शहीदांबद्दल त्यांना कळलंच पाहिजे. त्यामुळे यावर आधारित विविध भूमिका विद्यार्थांना करायची संधी दिल्यास ते आपला इतिहास आणि इतर गोष्टी जवळून समजू शकतील.  

– आर्ट वर्कशॉप्स
सर्व वयोगटातील लोकांना एकत्र आणण्याची अजून एक चांगली संधी म्हणजे आर्ट वर्कशॉप आयोजित करणे. ज्यामध्ये संगीत स्पर्धा, निबंध लेखन, कविता स्पर्धा आणि चित्रकला वर्कशॉप प्रजासत्ताक दिनाची थीम ठेवून तुम्ही ठेऊ शकता.  

– प्रजासत्ताक दिनानिमित्त खास सजावट

प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही, त्यामुळे दिवाळीप्रमाणेच या दिवशीही तुम्ही आपल्या घर आणि ऑफिस छान सजवू शकता. या निमित्ताने तुम्ही ऑफिसची सुंदर गॅफ्रिटी, वॉल स्टीकर्स, आर्ट डेकल्स किंवा अॅबस्ट्रॅक्ट पेटींगने सजावट करू शकता. अगदी साध्या तीन रंगातील कागदाच्या डेकोरेशनचा वापर करूनही तुम्ही क्रिएटीव्ह टच देऊ शकता.

दुसरा चांगला पर्याय म्हणजे या दिवशी तुमच्या सोसायटीत खास रांगोळी काढू शकता. या सर्व सजावटीसाठी तुम्ही प्रजासत्ताक दिनाची थीम ठेवा.

– या दिनानिमित्त खास तयार व्हा


जर तुम्हाला या दिवशी खास झेंडावदनाला जायचं असल्यास तुम्ही खास तिरंगामध्ये ड्रेसअप होऊन जाऊ शकता. तुम्ही तिरंगामधील कुर्ता किंवा स्मार्ट टीशर्ट घालू शकता. जर ते शक्य नसल्यास तिरंगा अक्सेसरीजने वेगळा टच देऊ शकता. अक्सेसरीजमध्ये कानातले, गळ्यातले, बांगड्या आणि ओढण्यांचाही समावेश करता येईल.

– खास रेसिपीज


जर तुम्हाला वरील गोष्टी आयोजित करणं शक्य नसल्यास तुम्ही घरच्याघरी मित्रपरिवाराला बोलावून प्रजासत्ताक दिनानिमित्त खास रेसिपीज बनवू शकता. तसंही आपल्या देशातील प्रत्येक सण खास मेजवानीशिवाय अपूर्ण आहे. भारतातील विविध प्रांतात प्रत्येक सणाला खास आणि चविष्ट पदार्थ बनवले जातात. मग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हीही खास तिरंगा रेसिपीज बनवू शकता.

ज्यामध्ये तिरंगा बर्फी, केशरी बिर्यानी, तिरंगा पुलाव, तिरंगा हलवा, तिरंगा सॅलड किंवा तिरंगा सुंडेईसुद्धा बनवू शकता. आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी याहून सुंदर मेजवानी काय असू शकेल.

या आहेत काही आयडियाज ज्यांचा वापर करून तुम्ही प्रजासत्ताक दिन तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत साजरा करू शकता आणि चांगला विचारही मांडू शकता. आम्हाला खात्री आहे या आयडियाज तुम्हाला नक्कीच आवडतील.

फोटो सौजन्य : Instagram

Read More From लाईफस्टाईल