देश आपल्याला सर्व काही देतो,
मग आपण ही देशाला काही द्यावं
मार्गस्थाला जसं रणरणत्या उन्हात
छाया देणारं झाडं असतं……
तसंच आपणही आपल्या देशहितासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे.
खरंच देश आणि आपला समाज आपल्याला बरंच काही देत असतो. त्यामुळे आपण त्यांचे आजीवन ऋणी आहोत यात शंका नाही. 15 ऑगस्टला आपण एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दिवसभर देशभक्तीपर गाणी ऐकतो. पण आज परिस्थिती अशी आहे की, देशप्रेम, देशभक्ती यांसारखे शब्द जेव्हा आपल्या मनात येतात तेव्हा ते सैनिकांबद्दल असतात. म्हणजेच जेव्हा देशसेवेबाबत विषय निघतो त्याचा सरळ अर्ध सामान्य नागरिक सैन्यातील जवान असाच घेतात. हे खरं आहे की, आपले सैनिक देशाची सेवा करतात आणि आपल्या सीमेवर सदैव तैनात असतात. पण हेही तितकंच महत्त्वाचं आहे की, प्रत्येक नागरिकाने कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशाची सेवा केली पाहिजे. उदा. देशाच्या प्रगतीसाठी बाधक ठरणारी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणे. यामुळेही देशाची मोठी सेवा घडेल. याबाबत देशातील प्रत्येक नागरिक विचार आणि जनजागृती घडवू शकतो. यासोबतच काही अशा गोष्टी आहेत, ज्या दिसायला छोट्या असतात. पण जर आपण नीट लक्ष दिलं आणि त्या अंमलात आणल्यास आपल्याकडूनही देशसेवा नक्कीच घडू शकेल.
- पाणी वाचवा. जितंक शक्य असेल तेवढी रोजच्या जीवनात पाण्याची बचत करा. यामुळे ना फक्त आपलं तर प्राणीमात्र, येणारी पिढी आणि देशाचंही हित साधलं जाईल.
- वृक्षारोपण करा आणि वृक्षसंवर्धन करा. यादिवसाच्या निमित्ताने दरवर्षी किमान एक रोप तरी लावा आणि वर्षभर त्या रोपाचं संवर्धन आवर्जून करा. अशाप्रकारे भारतमाता आणि धरणीमाता दोघांना फायदा होईल.
- आपल्या वाहनाची नीट देखरेख करा. यामुळे देशात वाढणारी प्रदूषणाची समस्या थोडीफार दूर होण्यास मदत होईल. ज्यामुळे प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरणाचं संवर्धन होईल आणि देशही समृद्ध राहील.
- पॉलिथीन किंवा प्लास्टीकचा वापर करणं टाळा. आपल्या सर्वानांच माहीत आहे की, प्लास्टीकमुळे आपल्या देशातील प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळे पर्यावरणाला आणि देशाला नुकसानदायक ठरणाऱ्या प्लास्टिकचा वापर करणं टाळा.
- येणाऱ्या पिढीला सुशिक्षित आणि चांगले संस्कार द्या. कारण चांगले नागरिकच देशाचं चांगलं भविष्य घडवतील.
- सार्वजनिक ठिकाणांप्रती आपली जवाबदारी समजून घ्या. रस्त्यावर जर तुमच्यामुळे कचरा झाला तर त्याची साफसफाई आणि खर्च सरकारचा असतो. जो एकप्रकारे आपणच कररूपात देतो. ज्यामुळे देशाचं नुकसान होतं आणि इतर चांगल्या उपक्रमासाठी वापरला जाणार निधी स्वच्छतेच्या कामात वळवावा लागतो.
- देशाच्या चलनाला व्यवस्थित वापरा. तुम्ही देशाच्या चलनाला जितकं सुरक्षित ठेवाल तितका लांब काळापर्यंत त्याचा वापर होईल आणि देशाला फायदा होईल.
- सर्व कर वेळेवर भरा आणि देशाला समृद्ध बनवा.
- जिथे जिथे तिकीट खरेदी करणं अनिवार्य आहे, जसं प्लॅटफॉर्म किंवा इतर सार्वजिनक वाहतूक सेवा, पर्यटन स्थळं तिथे तिकीट खरेदी करा. कारण या तिकिट खरेदी टाळलेल्या छोट्या रकमांमुळे आपली बचत होते पण देशाचं नुकसान होतं.
- निवडणुकांमध्ये अवश्य मतदान करा. कारण तो फक्त आपला अधिकार नाहीतर आपलं कर्तव्य आहे आणि नेहमी लक्षात ठेवा की, दुर्जनांच्या सक्रियतेपेक्षा जास्त धोका हा निष्क्रियतेमुळे जास्त नुकसान होतं. जे देशहिताला धरून नाही.
- आपला देश सक्षम आहे म्हणून वीजेचा दुरूपयोग करू नका. तुम्ही जेवढी वीजबचत कराल तेवढी देशाच्या प्रगतीत सहाय्यता होईल.
- कधीही बंदमध्ये सामील होऊ नका किंवा त्याचं समर्थन करू नका. कारण अशाप्रकारे केलेले बंद हे देशाचं नुकसान करतात. बंद हे बंद करूनच देशसेवा करता येईल.
- कधीही कोणत्याही कामासाठी वरचे पैसे देऊ नका. यामुळे राष्ट्राच्या चरित्र निर्माणात सर्वात मोठी बाधा येते.
- कोरोना काळात देशात लागू असलेल्या प्रत्येक नियमाचं पालन करा. ज्यामुळे ही महामारी आपल्या देशातून लवकर हद्दपार होईल आणि आपलं जीवन पुन्हा एकदा सुरळीत होईल.
- सांप्रदायिक विचारांपासून दूर राहा आणि देशाच्या शेतकरी आणि सैन्याचा नेहमी आदर करा.
Read More From आपलं जग
नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi
Aaditi Datar