घर आणि बगीचा

किचनमधली लाकडी भांडी अशी करा स्वच्छ, वापरा या सोप्या टिप्स

Trupti Paradkar  |  Nov 27, 2020
किचनमधली लाकडी भांडी अशी करा स्वच्छ, वापरा या सोप्या टिप्स

स्वयंपाक घरासाठी बऱ्याचदा स्टील, काच, नॉनस्टिक, तांबे-पितळ आणि लाकडी भांडी वापरतो. अॅल्युमिनीअम अथवा स्टीलच्या भांड्यापेक्षा काच, माती आणि लाकडी भांड्यांमध्ये अन्न जास्त फ्रेश राहतं. शिवाय अशा भांडयातून पदार्थ सर्व्ह करणं खूप छानही वाटतं. आजकाल मार्केटमध्ये निरनिराळ्या शेपची लाकडी भांडी मिळतात. फोडणीचे  साहित्य ठेवण्याच्या अथवा पोळ्या ठेवण्याच्या डब्यापासून वेगवेगळ्या आकाराचे चमचे आणि पळ्या तुमचं मन आकर्षित करतात. डायनिंग टेबल सजवण्यासाठी आणि फूड फोटोग्राफीसाठी अशी लाकडी भांडी नक्कीच फायदेशीर ठरतात. मात्र ही लाकडी भांडी वापरल्यावर ती तेल आणि मसाल्यांमुळे चिकट दिसू लागतात. शिवाय वापर झाल्यावर धुवून ती कपाटात काही दिवस तशीच ठेवल्यास त्यावर हवामानातील बदलामुळे बुरशीचा थर जमा होतो. म्हणून घरातील लाकडी भांडी स्वच्छ कशी करायची हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. यासाठी जाणून घ्या या सहज करता येतील अशा किचन टिप्स 

मीठाचा करा वापर –

लाकडी भांडी साबण अथवा लिक्विड सोपने स्वच्छ करण्याऐवजी मीठाने स्वच्छ करा. ज्यामुळे ती स्वच्छ तर होतीलच शिवाय निर्जंतूकही होतील. मीठाने लाकडी भांडी स्वच्छ केल्यास त्यावर बुरशी जमा होणार नाही. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा आणि त्यात एक चमचा मीठ टाका. या पाण्यात काही वेळ लाकडी भांडी बुडवून ठेवा. थोड्या वेळाने ती बाहेर काढा आणि उन्हात सुकवा. या पद्धतीने स्वच्छ केल्याने तुमच्या घरातील लाकडी भांडी पुन्हा चमकू लागतील.

बेकिंग सोड्याने चमकवा भांडी –

बेकिंग सोडा घरातील अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता. लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घ्या आणि भांड्यांवर हे मिश्रण लावा. डाग घालवण्यासाठी ब्रशने थोडं चोळून घ्या. त्यानंतर साध्या  पाण्याने भांडी धुवा आणि सुकवा. या पद्धतीनेही तुमची लाकडी भांडी  पुन्हा पहिल्याप्रमाणे चमकू लागतील.

लिंबाचा रस –

लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असल्याने भांड्यावरील चिकटपणा निघून जातो. लाकडी भांडी  डाळ, भाजीतील तेलामुळे चिकट होतात. जर ही भांडी चांगली स्वच्छ केली नाही तर त्यावर ओलाव्यामुळे बुरशी जमा  होते. यासाठीच एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. या पाण्यात वापरलेली लाकडी भांडी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर भांडी घासून घ्या आणि पंख्याखाली अथवा उन्हात सुकवा. तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही आंबट फळाने जसं की, चिंच, आवळा, कोकम तुमची लाकडी भांडी स्वच्छ करू शकता. 

अॅपल सायडर व्हिनेगर –

अॅपल सायडर व्हिनेगरही लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण यामध्ये क्लिंझिंग घटक असतात. एका भांड्यात अॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि कापडाच्या मदतीने ते लाकडी भांड्यांवर रगडा. ज्यामुळे भांड्यांचा चिकटपणा कमी होईल आणि लाकडी भांडी चमकदार दिसू लागतील. 

आम्ही सांगितलेल्या या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या या आम्हाला कंमेट मधून जरूर कळवा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

नैसर्गिक पद्धतीने घर निर्जंतूक करण्याच्या सोप्या टिप्स

जाणून घ्या घरातील देवपूजेची भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

घरातील जुन्या काचेच्या भांड्याना द्या अशी चमक, घरगुती उपाय

Read More From घर आणि बगीचा