Acne

चेहऱ्यावर ग्लो हवाय? या आयुर्वेदिक टीप्स करतील तुम्हाला मदत (Ayurvedic Tips For Glowing Skin In Marathi)

Leenal Gawade  |  Mar 25, 2019
Ayurvedic Tips For Glowing Skin In Marathi

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आपण कितीतरी पैसे खर्च करत असतो. कोणी सांगितल की, फेशियलने ग्लो येतो. तर आपण लगेच ते करण्यासाठी पार्लरमध्ये धाव घेतो. फेशिअल करुन चेहऱ्याला ग्लो येतो खरा. पण तो टिकतो किती दिवस फार- फार तर १५ दिवस आणि त्यानंतर पुन्हा तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते. आयुर्वेदात तुमच्या त्वचेवर नैसर्गिक पद्धतीने ग्लो आणण्यासाठी काही सोप्या उपाययोजना आणि सोप्या ब्युटी टिप्स सांगितल्या आहेत. यासाठी फार खर्च येणार आहे अशातला ही भाग नाही. त्यामुळे तुम्ही कितीही वर्षांचे असाल जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर ग्लो हवा असेल तर या आयुर्वेदिक टीप्स (Skin Glow Tips In Marathi) नक्की पाळा आणि मिळवा तुम्हाला हवी असलेली त्वचा… मग करायची का सुरुवात

Table Of Content

आयुर्वेदानुसार चेहरा निस्तेज असण्याची कारणे

चेहऱ्यावर ग्लो कसा आणाल

काय टाळाल

दिनचर्या कशी सुधाराल

चेहऱ्याची काळजी घेताना

आयुर्वेदानुसार चेहरा निस्तेज असण्याची कारणे (Reason For Dull Skin In Marathi)

आयुर्वेदानुसार तुमचा चेहरा निस्तेज असण्यामागेही काही ठराविक कारणं आहेत ती आधी जाणून घेऊया.

1. पोट साफ नसणे (Constipation)

आयुर्वेदातील सगळ्या गोष्टी तुमच्या पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असतात. जर तुमच्या पोटात बिघाड झाला तर तुमचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे तुमच्या त्वचेवर ग्लो नसण्याचे पहिले कारण आहे. तुमचे पोट साफ नसणे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुमच्या विष्ठेला खूप घाण वास येतो, शिवाय तुम्हाला शौचाला पटकन होत नाही. कारण तुमच्या पोटात विष्ठेचे खडे होतात. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यामुळे जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला कालांतराने चेहऱ्यावर मुरुमे येऊ लागतात.

2. खाण्याच्या चुकीच्या सवयी (Unhealthy Eating Habits)

आयुर्वेदानुसार तुमच्या पोटाच्या आरोग्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत म्हटल्यावर तुम्ही काय खाता त्यावरही तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून आहे. चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी खाणे, अतितेलकट पदार्थांचे सेवन करणे यामुळेही तुमच्या शरीरातील तेल वाढून तुमची त्वचा निस्तेज वाटू लागते.

3. उन्हाचा त्रास (Sun Exposure)

पहाटाचे ऊन तुमच्या शरीरासाठी जितके आवश्यक असते तितकेच सकाळी ९ ते १० नंतरचे ऊन तुमच्या शरीरासाठी घातक असते. जर तुम्ही उन्हात अति प्रवास करत असाल तर तुमच्या त्वचेवर वार्धक्याच्या खूणा लवकर दिसू लागतात. अति उन्हाच्या माऱ्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात.

4. अनियमित पाळी (Irregular Periods)

अनियमित पाळीचा त्रास अनेक महिलांना असतो. त्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आताच सावध राहा. कारण अनियमित पाळीमुळे तुमच्या चेहऱ्यावर सतत पुटकुळ्या येत राहतात. शरीरातून अशुद्ध रक्त बाहेर न पडल्यामुळे हा त्रास महिलांना होतो. त्यामुळेही तुमचा चेहरा निस्तेज दिसू शकतो. पाळी अनियमित असेल तर योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

5. मीठ आणि साखराचे अतिसेवन (Salt & Sugar Intake)

खूप जणांना जेवणात वरुन मीठ घालण्याची सवय असते. शिवाय साखरेच्या बाबतीतही काही जणांचे असेच आहे. मीठ आणि साखर वरचेवर खाण्याची ही सवय तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असते. मीठाच्या अतिसेवनामुळे रक्तदाब वाढते. साखर आणि मीठ या दोघांच्या अतिसेवनामुळे त्वचेसाठी आवश्यक असलेले कोलॅजन आणि इलॅस्टिन कमी होते आणि त्वचा अधिक निस्तेज दिसू लागते.

6. दिनचर्या (Daily Routine)

आर्युर्वेदात तुमच्या दिनचर्येला अधिक महत्व आहे. तुम्ही कधी उठता कधी झोपता यावर तुमच्या त्वचेचेही आरोग्य अवलंबून आहे.रात्री उशिरापर्यंत जागणे. सकाळी उशीरा उठणे किंवा लवकर उठणे त्यामुळे झोप अपुरी राहणे. जेवणाच्या वेळा चुकवणे. सकाळचा नाश्ता चुकवणे असे करत असाल तर तुमचा रक्तप्रवाह सुरळीत राहणार नाही. त्यामुळेही तुमची त्वचा निस्तेज होऊ शकते.

चेहऱ्यावर ग्लो कसा आणाल (Tips For Glowing Skin In Marathi)

आता समस्या जाणून घेतल्यानंतर त्या सोडवण्यासाठी आणि त्वचेवर ग्लो आणण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते आता जाणून घेऊया. चमकत्या त्वचेसाठी या सोप्या टिप्स वापरून पहा.

पोट साफ करण्यासाठी काय कराल (Keeps Your Stomach Clean)

पोट साफ ठेवायचे असेल किंवा पोटात विष्ठेचे खडे होऊ द्यायचे नसतील तर सगळ्यात आधी भरपूर पाणी प्या. पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात असेल तर तुम्हाला विष्ठा वेळेवर होईल.

पाणी पिऊनही जर तुमचे पोट साफ होत नसेल तर काही आयुर्वेदीक काढे तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता. (उदा. साफी, महासुदर्शन काढा, वैद्य पाटणकर काढा)

घरच्या घरीही तुम्ही काही काढे बनवू शकता. एका भांड्यात एक ग्लास पाणी गरम करुन त्यात एक चमचा धणे आणि एक चमचा जीरे घाला. पाणी चांगले उकळल्यानंतर तो काढा घ्या. पोट साफ होईल. हा काढा सकाळी उठव्यावर किंवा रात्री झोपताना घेतला तरी चालेल.

काय खाल आणि काय टाळाल (What To Eat & What To Avoid)

खाण्याच्या बाबतीत कितीही सांगितले तरी आपली गल्लत होते. पण जर तुम्हाला तुमची त्वचा चांगली हवी असेल तर तुम्हाला काही गोष्टींचे पालन केलेच पाहिजे. तुमच्या रोजच्या आहारात चांगल्या गोष्टी असतील तर तुमचा दिवस चांगला जातोच. शिवाय तुमचे आरोग्य सुधारते. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. आता तुम्ही काय खायला हवे आणि काय नको ते आपण पाहूया.

सुकामेवा (Dry Fruits)

सुकामेवा शरीरासाठी अत्यंत चांगला आहे. सुकामेव्यामध्ये असलेले फॅटी अॅसिड, ओमेगा ३ आणि फायबर हे तुमच्या त्वचेसाठी आवश्यक असते. पण त्यातही सरसकट सगळा सुकामेवा खाऊन चालत नाही. तर तुम्हाला बदाम, अळशी, पिस्ता,सूर्यफुलांच्या बिया यांचे रोज सेवन करायचे आहे. तुम्हाला त्याच्या रोजच्या सेवनाने त्वचेत झालेला बदल जाणवेल.

ग्रीन टी (Green Tea)

चहा आणि कॉफीपेक्षा तुम्ही ग्रीन टी प्याल तर ती तुमच्या त्वचेसाठी अधिक चांगली असते. ज्यावेळी तुम्हाला चहाची तल्लफ येईल त्यावेळी ग्रीन टी प्या. आता ग्रीन टी आयुर्वेदाचा भाग कसा असे तुम्हाला वाटत असेल तर ग्रीन टीमध्ये आले, लिंबू अशा पाचक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि पचनक्रिया सुधारली की, तुमच्या त्वचेवर चांगला ग्लो राहतो.

पाणीदार भाज्या आणि फळे (Veggies and Fruits)

पालेभाज्या आणि फळभाज्यांचा तुमच्या आहारात समावेश असायला हवा. पालक, मेथी, मुळा. फ्लॉवर, कोबी, भेंडी, लालमाठ. चवळी, शेपू यांसारख्या भाज्या आवर्जून करुन खा. तुम्हाला या भाज्या आवडत नसतील तरी तुमच्या त्वचेसाठी या आवश्यक आहेत म्हणून खा.

काय टाळाल (Foods To Avoid)

तुम्ही काय खालं याची जशी यादी आहे तसेच तुम्ही काय टाळायला हवे याचीही एक यादी आहे. तुम्ही चमकदार त्वचेसाठी काय खावे ते पाहूया.

चायनीज (Chinese)

सध्या सगळीकडे चायनीजचे फॅड असलेले पाहायला मिळते. नाक्यानाक्यावर हल्ली चायनीजचे ठेले असतात. त्यावर मिळणारी चायनीज भेळ, मंच्युरीअन भेळ कितीही खावीशी वाटली तरी खाऊ नका. याशिवाय न्युडल्स, चायनीज राईस जितके टाळता येईल तितके टाळा. कारण हे पदार्थ चकाकदार बनवण्यासाठी तेलाचा अधिक वापर केला जातो. हे तेल तुमच्या चेहऱ्यावर येते आणि मग तुम्हाला त्वचेशी निगडीत अधिक त्रास होऊ लागतात.

वेफर्स, समोसा, वडा (Fried Snacks)

जरा भूक लागली की, चीप्स, समोसा, बटाटा वडा, तळलेले अन्य काही पदार्थ खाण्याची ईच्छा अनेकांना होते. या पदार्थामध्ये मीठ आणि साखर यांचे प्रमाण जास्त असते.

चॉकलेट (Chocolates)

चॉकलेट खाण्याची सवय वाईट नाही. पण काही जणांना चॉकलेट सतत लागते. एकावेळी ते एक अख्खं चॉकलेट संपवतात. चॉकलेटमध्ये असलेली साखर आणि फॅट तुमच्या त्वचेवर येते. तुम्ही सतत चॉकलेट खात असाल तर तुमच्या त्वचेवरील नाक, हनुवटी, डोक्यावर तेल साचत राहते.त्यामुळे हे खाणे टाळा.

दिनचर्या कशी सुधाराल (How To Improve Your Routine)

तुमच्या त्वचेसाठी आहार जितका महत्वाचा आहे तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे दिनचर्या. तुमच्या दिनचर्येसाठी काही टिप्स.

सकाळी लवकर उठून करा मेडिटेशन (Morning Meditation)

सकाळी लवकर उठायची सवय लावली तर तुम्हाला रोज कामावर जाण्यासाठी होणारी घाई होणार नाही. सकाळी उठून मेडिटेशन करा. शक्य असल्यास साधारण ५ मिनिटे योगा करा. तुमचा रक्त पुरवठा सुधारेल.

जेवणाच्या वेळा (Lunch Time)

आयुर्वेदानुसार तुम्ही १२ ते २ या वेळेत जेवायलाच हवे. यावेळात जेवल्यानंतर जेवण पचायला सोपे जाते.

मध्यान्ह भूकेसाठी (Post Lunch Snack)

जेवणानंतर साधारण तासाभरातच आपल्याला भूक लागते अशावेळी तुम्ही सुकामेवा किंवा एखादे फळ खाल्यास उत्तम

रात्रीचे जेवण (Dinner)

तुमचे रात्रीचे जेवण हे ९ च्या आधी आटपायला हवे. रात्रीचा आहार हा कमी असायला हवा. झोपण्याआधी दोन तास जर तुम्ही जेवण केलेत तर ते पचायला सोपे जाते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

चेहऱ्याची काळजी घेताना (Ayurvedic Tips For Glowing Skin In Marathi)

चेहऱ्यावर ग्लो आल्यानंतरही तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक असतं. ही काळजी नेमकी कशी घ्यायची ते पाहुयात.

अभ्यंग (Abhyangsnan)

तुमचे पोटाचे आरोग्य सुधारले तर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला ग्लो दिसेलच. पण तुम्हाला काही अशा गोष्टीही करता आल्या तर उत्तम आहेत. आयुर्वेदात अभ्यंगस्नानाला फार महत्व आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा अभ्यंगस्ना करा. ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या त्वचेला साजेशा आयुर्वेदीक तेलाने मसाज करा. त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि तुमच्या त्वचेला चकाकी येते.

आयुर्वेदीक फेसपॅक (Ayurvedic Facepack For Skin)

तर असेही काही फेसपॅक आहेत जे तुमच्या त्वचेला ग्लो आणू शकतात. या वस्तू तुमच्या किचनमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात.

1. संत्रा फेसपॅक (Orange Face Pack)

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हा पहिला पॅक तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण संत्र्यातील व्हिटॅमिन C त्वचेसाठी चांगले असतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुम येण्याचे प्रमाणही कमी होते.

साहित्य (Ingredients)

१ मोठा चमचा वाळलेल्या संत्र्याच्या सालांची पूड, २ चमचा दही किंवा पाणी

कृती (Method)

मिश्रण एकजीव करुन तयार झालेला पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांसाठी ठेवा.

२० मिनिटांनी चेहऱ्याला पाणी लावून साधारण दोन मिनिटे मसाज करा. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा निघून जाईल.

थंड पाण्याने चेहरा धुवा.

2. बटाट मास्क (Potato Mask)

बटाट्यामध्ये मुरुमांच्या डागांना कमी करण्याची क्षमता असते. शिवाय भविष्या येणाऱ्या मुरुमांनाही ते रोखू शकतात.

साहित्य (Ingredients)

१ बटाटा आणि कापसाचा बोळा

कृती (Method)

एक बटाटा घेऊन त्याचा रस तुम्हाला काढायचा आहे. हा रस तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर कापसाच्या बोळयाने लावायचा आहे. हा मास्क तुम्हाला रात्रभर ठेवायचा आहे. सकाळी थंड पाण्याने तुम्हाला चेहरा धुवायचा आहे. तुम्हाला तुमचा चेहरा चमकदार दिसेल. कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय म्हणून हा उत्तम आहे.

3. तुपाचा मसाज (Ghee Massage)

तूप हे तुमच्या शरीरासाठी फार चांगले असते. तुमच्या चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी तुम्ही गायीच्या तुपाचा मसाज तुमच्या चेहऱ्यावर करु शकता. याशिवाय तुपामुळे तुमच्या त्वचेला चकाकी देखील येते. त्वचेसाठी आवश्यक कोलाजन मिळते आणि वार्धक्याची लक्षणेही कमी होतात.

4. तुळस फेसपॅक (Tulsi Facepack)

तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरीअल गूण असतात. शिवाय तुमच्या इव्हन टोनसाठीही तुळशीचा उपयोग होऊ शकतो.

साहित्य (Ingredients)

तुळशीची पाने, कच्चं दूध किंवा पाणी

कृती (Method)

तुळशीची पाने आणि कच्च दूध घेऊन वाटून घ्या. त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा. २० मिनिटे हा पॅक ठेवा. मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

5. केशर आणि अॅलोवेरा पॅक (Saffron & Aloe-Vera Pack)

मसाल्यामध्ये सगळ्यात महागडी असेल तर ती केशर. केशर तुमची काळवंडलेली त्वचा सुधारण्याचे काम करते तर अॅलोवेरा जेल तुमची त्वचा मऊ आणि तजेलदार बनवण्याचे काम करते. चमकत्या त्वचेसाठी कोरफड देखील वापरा.

साहित्य (Ingredients)

केशराच्या काही काड्या, १ चमचा दूध आणि १ मोठा चमचा अॅलोवेरा जेल.

कृती (Method)

केशर रात्रभर दुधात भिजवून ठेवा. दुसऱ्यादिवशी त्यात एक मोठा चमचा अॅलोवेरा जेल घालून ते मिश्रण तुम्ही किमान ३० मिनिटांसाठी चेहऱ्यावर असू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

6. चंदन आणि हळद फेसपॅक (Sandalwood & Turmeric Pack)

चंदन आणि हळदीला आयुर्वेदात चांगलेच महत्व आहे. दोघांमध्ये अँटी बॅक्टेरीअल गुण आहेत. शिवाय तुमच्या त्वचेवरील पोअर्स कमी करण्याचे काम करते.

साहित्य (Ingredients)

१ चमचा चंदन पावडर, १/२ चमचा हळद, आवश्यकतेनुसार मध.

कृती (Method)

एका भांड्यात चंदन पावडर, हळद एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार मध घाला. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवून घ्या.

*या काही सोप्या आणि स्वस्त आयुर्वेदिक टीप्समुळे तुमच्या त्वचेला चांगला ग्लो येऊ शकेल. फेक पॅकनी सुरु करण्याआधी तुम्ही आधीच्या कही टीप्स फॉलो करा मगच या फेसपॅकला सुरुवात करा.

सौजन्य – Giphy, Instagram

Read More From Acne